संध्या 145
“परंतु संध्या तुम्हां सर्वांपेक्षां समाधान मानायला शिकली आहे. आशेवर जगायला ती शिकली आहे. कल्पनेंत रमायला शिकली आहे. प्रत्यक्ष परिस्थितीवर उड्डाण करून शांत राहायला ती शिकली आहे. अगस्तिऋषि सात खारे समुद्र प्याले. त्याप्रमाणं संध्याहि सर्व गोष्टी गिळायला शिकली आहे. हलाहल पचवायला शिकली आहे. संध्या म्हणजे प्रेमदेवता, शांतिदेवता, आशादेवता !” भाईजी म्हणाले.
“भाईजी, किती करुण प्रसंग हा, नाहीं का ?” विश्वास म्हणाला.
“संध्या सारखं खोल आवाजांत, क्षीण आवाजांत म्हणे, “द्या ना माझ्याजवळ बाळ, ठेवा ना कुशींत. माझ्या कुशींतील उबेनं तें हंसेल, रडेल; माझ्या कुशींतील उबेनं तें जिवंत होईल. आणा, माझ्याजवळ आणा बाळ.” भाईजी, किती करुण तें बोलणं. आणि नेण्यासाठीं बाळ उचलल्यावर तर ती निश्चेष्ट जणूं पडली. “अरेरे” हा एकच शब्द ती बोले. संध्येनं उच्चारलेला तो अरेरे शब्द आठवतांच हृदयाची कालवाकालव होते. त्या तीन अक्षरांत जणूं शोकसागर भरलेले होते; अनंत दु:ख त्यांत सामावलेलं होतं. खरंच; अति करुण प्रसंग.” कल्याण म्हणाला.
“होय हो कल्याण, खरोखर करुण प्रसंग ! परंतु तुम्ही धैर्यानं तोंड द्या. तोंड देतच आहांत. आपल्या सर्व संसारांचे बळी देऊन शेवटीं सर्व श्रमणा-या जनतेचे करुण संसार आपणांस आनंदाचे करायचे आहेत. आपण नवीन समाजरचना करूं. दारिद्रयाची हायहाय नष्ट करूं. सुख सर्वांच्या मालकीचं करूं. त्या नवसमाजांतील लहान मुलांचीं मुखकमळं तोंडासमोर आणा. मुलांची काळजी घेतली जात आहे; त्यांचीं जीवनं शास्त्रीय दृष्टीनं व प्रेमानं वाढवलीं जात आहेत असं चित्र आपण डोळयांसमोर खेळवूं या. त्या ध्येयासाठीं लढूं या, पडूं या, मरूं या, जगूं या. आपलीं सारीं दु:खं मग आपण सहन करूं. हे सारे करुण करुण प्रसंगहि मग आपण शांतपणं सोसूं. खरं ना ?” भाईजी म्हणाले.
“होय, भाईजी. सारे करुण प्रसंग सहन करूं; सा-या संकटांतून जाऊं. आमच्या जीवनप्रवाहांना थांबायला, थबकायला वेळ नाहीं. क्रांतीच्या सागराकडे जाऊं दे त्यांना वेगानं धांवत.” कल्याण म्हणाला.
“परंतु कांहीं झालं तरी हे व्रण बुजणार नाहींत. एकच दु:ख आपण विसरूं इच्छित नाहीं; विसरूं शकत नाहीं. तें नेहमीं हिरवं हिरवं राहतं. आपल्या अश्रूंनीं सदैव टवटवीत राहतं. आणि तें दु:ख म्हणजे प्रिय जनांचे विरह. आणि नवमातेच्या पहिल्यावहिल्या बाळाचं जन्मतांच मरण म्हणजे तर दु:खाची परम सीमा. तें दु:ख संध्येच्या जीवनांत अमर राहील, त्याची छाया सदैव राहील.” विश्वास म्हणाला.
“खरं हो विश्वास, खरं.” भाईजी म्हणाले.
“संध्ये, संध्ये !” असें म्हणून कल्याणनें उशीवर डोकें ठेवलें व ती उशी अश्रूंनीं भिजली. आणि तिकडे दवाखान्यांत खाटेवर दीनवाणी संध्या “कल्याण, कल्याण, कसं रे होतं बाळ, अरेरे, अरेरे !” असें म्हणून अखंड अश्रु ढाळीत होती ! केवढा करुण प्रसंग !