संध्या 91
“तिला संमति दिल्यावर माझंहि हृदय हलकं झालं. आई, आतां विधि केव्हां उरकायचा ? विरूपाक्षाच्या मंदिरांत जाऊन लग्न लावायचं असा आमचा कुलाचार आहे. बाबांसाठी तसं करायचं मीं ठरवलं आहे.”
“तुम्ही ठरवाल तें सारं मला मान्य आहे. संध्येचा सुखाचा संसार एकदां सुरू होवों, म्हणजे झालं.”
“आपण गाडया करून जाऊं. तुमच्या नि आमच्या गाडया त्या आमराईजवळ भेटतील. तिथून एकत्र पुढं जाऊं.”
“आई, लग्नाच्या आधींच यांची मिरवणूक ! “
“लग्नाच्या आधींच वरात ! “
“पण नळे-चंद्रज्योति कुठल्या ?”
“आकाशांतील चंद्र नि झाडांवरचे काजवे. “
“अनु, शरद्, तुम्ही बाहेर जा खेळायला. असं कांहीं तरी बोलूं नये. पाहुण्यांसमोर बडबड का करावी ?”
“आई, हे का पाहुणे ? हे तर ताईचे--”
“नवरे !”
“जातां कीं नाहीं बाहेर !”
शरद् नि अनु बाहेर गेलीं. टाळया वाजवीत, हंसत हंसत गेलीं. आई जरा गंभीर होऊन बसली होती. परंतु पुन्हा म्हणाली,
“लौकरच दिवस ठरवा. पुढं पाऊस पडला तर गाडया जायला त्रास होईल.”
“होय. लौकरच उरकून घेऊं.” कल्याण म्हणाला. इतक्यांत संध्या आली. ती फुलें घेऊन आली होती.
“फुलं कशाला ?” कल्याणनें विचारलें.
“तुला आवडतात ना !”
“मला वाटलं आजच माळ घालतेस कीं काय ?”
“माळ तर कधींच घातली होती. विसरलास वाटत ?”
“परंतु त्या वेळीं तुला का कांहीं कल्पना होती ?”
“देवाला माहीत; परंतु भविष्यकाळच्या छाया आधीं पडतात ना ?”
“संध्ये, मला भूक लागली आहे.”
“काय करूं, सांग ! “
“थालीपीठ लाव.”
संध्या घरांत गेली. थालीपीठ तयार झालें. कल्याणनें कढत कढत खाल्लें.
“इतकं थालीपीठ खाऊन जेवाल काय ?” आई हंसून म्हणाली.
“आई, कल्याणची भूक न शमणारी आहे.”
“मी जेवायला राहात नाहीं, मी आतांच जाणार आहें.”
“कल्याण, जेवून जा हो. जेवल्याशिवाय गेलास तर बघ !” संध्या प्रेमक्रोधानें म्हणाली.