संध्या 171
२२
प्रणाम त्या धीरगंभीर संध्येला
महायुध्दाचे रंग क्षणाक्षणाला पालटत होते. आश्चर्यकारक घटना होत होत्या. जर्मनी व रशिया यांचा करार हा पहिला मोठा धक्का होता. रशियानें पोलंडवर शेवटीं आक्रमण केलें हीहि एक चकित करणारी गोष्ट होती. युरोपांतील सारीं राष्ट्रें हळूहळू जर्मनीनें आक्रान्त केलीं. फ्रान्सचा चुटकीसरशीं फडशा उडाला. इंग्लंडवर भयंकर वैमानिक हल्ले सुरू झाले. परंतु एकाएकीं सर्वांना स्तंभित करणारी वार्ता आली. जर्मनीनें करार मोडून एकदम रशियावर स्वारी केली. सर्वांनीं तोंडांत बोटें घातलीं. पश्चिम व मध्य युरोप पायांखालीं तुडवून जर्मनी आतां रशियाकडे वळला. युक्रेनवर हिट्लरचा कधींपासून डोळा. रशियांतील प्रयोग म्हणजे संस्कृतीचा सर्वांत मोठा शत्रुं असें हिट्लर शेंकडों वेळां म्हणे. तो प्रयोग नष्ट करण्यासाठीं सर्व सामर्थ्यांसह हिट्लर रशियावर तुटून पडला.
हळूहळू इंग्लंड व रशिया यांचे सूर एक होऊं लागले. एकाच शत्रूविरुध्द ते आतां लढत होते. रशिया व इंग्लंड यांचें सहकार्य सुरू झाल्यावर कम्युनिस्टांनीं कोणतें धोरण ठेवावयाचे ? सर्व देशांतील कम्युनिस्ट पक्षांनीं कसें वागावयाचें ? हिंदी कम्युनिस्ट पक्षानें कोणत्या घोषणा करावयाच्या ?
महायुध्द सुरू झालें, तेव्हा काँग्रेसने एकदम लढा पुकारावा म्हणून हिंदी कम्युनिस्ट जोरानें सांगत होते. काँग्रेसनें राष्ट्रीय सरकारची मागणी केली, तेव्हां “असली भीक काय मागतां ? लढा पुकारा” अशा गर्जना करीत, त्यांनीं काँग्रेसवर मोर्चे आणले. परंतु आतां रशिया व जर्मनी यांचें रणकंदन सुरू झालें. आतां ब्रिटिश सरकारजवळ कसें वागावे हा हिंदी कम्युनिस्टांसमोर प्रश्न होता. आमचें धोरण पूर्वीचेंच राहणार असे ते प्रथम म्हणत होते. परंतु कोठून तरी किल्ली पिरगळली गेली आणि हिंदी कम्युनिस्टांनीं पवित्रा बदलला. हें युध्द आतां लोकयुध्द आहे असें ते गर्जूं लागले. “रशिया ब्रिटिशांच्या बाजूला येतांच युध्दाचें स्वरूप पालटलें. युध्दाचें साम्राज्यशाही स्वरूप जाऊन त्याचें लोकयुध्दांत परिणयन झालें--” असा सिध्दान्त ते सर्वत्र मांडू लागले.
काँग्रेसनें राष्ट्रीय सरकार मिळेना म्हणून तात्पुरता वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता. महात्माजी सरकारला फार अडचणींत आणूं इच्छित नव्हते. सत्याग्रही संकटाच्या वेळीं शत्रूवर हल्ला चढवीत नसतो. परंतु सरकारला आपला विरोध आहे, हें दाखविण्यापुरता प्रतीकात्मक सत्याग्रह महात्माजींनीं सुरू ठेवला होता.
परंतु महायुध्दांत आणखी चमत्कार झाले. जपाननें एकदम युध्द सुरू केलें. अमेरिकेशीं बोलणीं सुरू असतांनाच पर्ल हार्बरवर जपानने हल्ला करून अमेरिकेचें बरेंच आरमार नष्ट केलें. अमेरिका युध्दांत आली. जपाननें भराभरा सारें जिंकून घेण्याचा सपाटा चालविला. आशियाचा सर्व पूर्व भाग जपाननें अति अल्प काळांत ताब्यांत घेतला. आणि तें सिंगापूर ? कोटयवधि, अब्जावधि रुपये ज्या सिंगापुरला बळकट करण्यासाठीं खर्च झाले, तें सिंगापूर क्षणांत पडलें ! ब्रिटिशांचा कधीं झाला नव्हता असा पराजय जपाननें केला. आणि मलाया पडला. ब्रह्मदेश चालला. आणि हिंदुस्थानचे काय होणार ?
जपानची स्वारी आली, तर हिंदुस्थान स्वत:चें संरक्षण कसे करणार ? ज्या देशांतील सरकार व जनता हीं परस्परविरोधी आहेत, तो देश परिणामकारक प्रतिकार कसा करणार ? हिंदुस्थानांत राष्ट्रीय सरकार स्थापन झालेंच पाहिजे. एरवीं तरणोपाय नाहीं.