Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 30

सारीं लहानमोठीं माणसें जेवलीं. परंतु आजी आज जेवली नाहीं. नारायणराव घरी नव्हते म्हणून का आजी जेवली नाही ? परंतु असें आजपर्यंत झालें नव्हतें. आजचें लक्षण कांही निराळेंच होतें. मधूनमधून म्हातारी सद्गदित होई. तिचे डोळे ओले होत.
मुलेमुली दुरून बघत. आजी आज रडते कां, असें म्हणत.

“काय होतं तुम्हांला ?” सुनांनी येऊन विचारले.

“कांहीं नाहीं; आनंद आहे.” म्हातारी म्हणाली.

“काकू, सांगा ना काय होतं तें ?” संध्येचे वडील म्हणाले.

“कांहीं नाहीं हो.”

“काकू, तूं आमची आई, सर्व काहीं. सांग ना काय होत तें. तू रडतेस कां ? काय दुखतं ? कोणतं दु:ख ?” पुंडलिकरावांनीं विचारलें.

“पुंडलिक, कांहीं नाहीं हो. तुम्ही सुखांत राहा.” ती म्हणाली.

“आजीला त्रास नका देऊं. जा बाहेर सारीं !” भीमराव मुलांना म्हणाले. मुलें निघून गेली. भीमराव आपल्या खोलींत गेले.
पुंडलिक मळयांत निघून गेला. सुना कामाला निघून गेल्या. आजी रामनाम जपत बसली. होतां होतां तिसरा प्रहर टळून गेला. सायंकाळ झाली. दिवे लागले. नारायणराव सायंकाळीं गांवाहून येणार होते. का बरें अद्याप आले नाहींत ! कोठें कामांत गुंतले, कोठें अडकले ?

रात्रीं आठ वाजायची वेळ होती. एका गाडींतून नारायणराव घरीं आले. ते वास्तविक पायी यायचे. परंतु आज गाडी कां ? ते घरीं आले ते अत्यवस्थ स्थितींत आले. त्यांचा जीव घाबरत होता. हृदय उडत होतें. काय झालें कळेना. अंथरुणावर त्यांना निजविण्यांत आले. वैद्य आले. उपाय सुरू झाले. परंतु रोगाचें निदानच होईना.

“काकू” नारायणरावांनीं हांक मारली.

“काय बाळ?”

“माझ्याजळ बस. तूं आई, तूं सर्व कांही. माझे प्राण ओढले जात आहेत. सर्वानीं बोलल्याचालल्याची क्षमा करा. सारीं आनंदांत राहा. काकू ?”

काकूच्या मांडीवर त्यांचें डोकें होते. त्यांनीं एकदां वर बघितलें व “राम” म्हटला. ते जणू काकूच्या मांडीवर मरण्यासाठीं घरीं कसे तरी आले. घरांत शोकपूर उसळला. मुलें रडूं लागलीं. सुना रडूं लागल्या. नारायणरावांची पत्नी तर दु:खाने वेडी झाली. भीमराव व पुंडलिकहि स्फुंदू लागले. आणि भागीरथीकाकू एकाएकीं उठली.

“रडूं नका. शांत राहा. मृतात्म्याला त्रास नका देऊं. तुम्हीं सारीं नीट राहा म्हणजे झालं.” ती म्हणाली.

तिनं एकदा तेथें सर्वांकडे पाहिलें व ती मागील दारीं गेली. एकटीच गेली. बाहेर अंधार होता. आजी एकटीच कोठें जात होती ? हातांत ना दिवा ना कांही. इकडे सोप्यांत माणसांची गर्दी झाली. नारायणराव म्हणजे उदार, दिलदार माणूस. त्यांच्याविषयी सर्वांना आदर वाटे. सारे हळहळले. अकस्मात् मरण. काहीं कल्पना नाही. त्यांच्या पत्नीचें शेजारच्या आयाबाया समाधान करीत होत्या. संध्येची आई जाऊबाईंच्या गळयांत गळा घालून रडत होती.

परंतु आजी कोठें गेली ? त्या वृध्देला तेथे का रडवेना ? तेथे का बसवेना ? ती का एकटी अश्रु ढाळण्यासाठीं बाहेर गेली ? ती पाहा. भागरथीकाकू जात आहे. कोठें जात आहे ? संध्याहि हळूच अश्रु पुशीत आजीच्या पाठोपाठ थोडीशी गेली. परंतु तिला भीति वाटू लागली. ती तेथेंच अंधारांत थबकली. आजी पुढें गेली. कोठें गेली ? संध्येला कांहीं दिसेना. पुढें जाण्याचें तिला धैर्यहि होईना. अंधार, सर्वत्र अंधार; डोळे भरून आल्यामुळें तो अंधार अधिकच अंधारमय होत होता.

कसला हा आवाज ? धाड् असा आवाज झाला. कोण पडलें, कोणं उडी घेतली ? त्या विहिरींत का कोणीं उडी घेतली ? संध्या घाबरली. ती एकदम धांवत घरांत आली. तिच्याने बोलवेना.

“आई, आजी, अग आजी-” एवढेंच ती म्हणाली.

सारीं तिच्याकडे पाहूं लागलीं. कोणाला उलगडा होईना.

“बाबा, धांवा. आजीनं विहिरींत उडी घेतली. धांवा, खरंच !-”

संध्या कसे तरी बोलली. घरांतील एक प्रिय माणूस तेथें घोंगडीवर मरून पडले होते. कर्ता मनुष्य तेथे मरून पडला होता. तोंच ही दुसरी वार्ता ! भावाचा मृत देह तेथेंच टाकून दोघे भाऊ विजेप्रमाणें विहिरीजवळ आले. लोकहि आले. भागीरथीकाकूचा देह वर काढण्यांत आला. परंतु प्राण वर निघून गेले होते. ते खालीं थोडेच राहिले होते ? आजीचे प्राण आवडत्या पुतण्याच्या पाठोपाठ निघून गेले होते.

घरांतील मंडळी शोकानें स्तंभित झाली. कोणाला रडेंहि येईना. सारे जणूं दगडाप्रमाणें झाले. थिजले, घट्ट झाले. प्रेमळ आजीचा देह घरांत आणण्यांत आला. संध्या आजीजवळ बसली. आजी आतां शांत झाली होती. संध्या रडूं लागली. आजीइतकें कोणीहि तिच्यावर प्रेम करीत नसे. आजीची कूस, म्हणजे तिचा आधार.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180