संध्या 44
कल्याणला संध्येची आठवण येई. पण काय असेल तें असो. त्यानें तिला पत्र लिहिलें नाहीं. त्यानें कोणालाच पत्र लिहिलें नाहीं. विश्वास तुरुंगांत असेल अशीच त्याची कल्पना. संध्येला पत्र लिहावें असें एखाद वेळ त्याच्या मनांत येई. परंतु त्या विचाराला तो दडपी. कशाला संध्येचें स्मरण ? मी क्रांतिकारक होणार. हातांत शिर घेऊन लढणार. समोर कधीं जन्मठेप, तर कधीं फांस ! कधीं हद्दपार, तर कधीं स्थानबध्दता. संध्येच्या गळयाला आपणं कां फांस लावावा ? नको. लग्नाचा विचारच नको. लग्न म्हणजे विघ्न. बेडी. ध्येयाला मिठी मारण्यासाठी उंच उड्डाण करूं पाहणा-या जीवाला खालीं खेचणारें जड वजन म्हणजे लग्न. माझ्या जीवनांतून संध्या जाऊं दे. ध्येयाचा धगधगीत मध्यान्ह सूर्यच माझ्या जीवनांत तळपूं दे. संध्येला माझ्या जीवनांत स्थान नाहीं.
कल्याणची पहिली शिक्षा संपणार होती. ती शिक्षा संपल्यावर तो पुन्हां ताबडतोब सत्याग्रह करून तुरुंगांत जाणार होता. चळवळ आहें, तों घर नको. कोणाची भेटगांठ नको. नाशिकलाच तो पुन्हां फेरी काढून सत्याग्रह करणार होता. त्यानें तसें ठरवून टाकलें होतें.
एके दिवशी तो मुक्त झाला. तो नाशिक शहरांत गेला. गोदावरी पाहून त्याला भीमेची आठवण झाली. तो मनमुराद पोहला, डुंबला. नंतर खादीभांडारांत गेला. एक भला मोठा तिरंगी झेंडा त्यानें विकत घेतला, आणि रस्त्यांतून गाणीं म्हणत तो निघाला. हातांत तिरंगी झेंडा होता. परंतु मुखानें लाल झेंडयाचें गाणें होतें. कोंप-याकोंप-यावर उभा राहून तो छोटें व्याख्यान देई. पुढे जाई. परंतु एके दिवशीं त्याला अटक झाली. खटला होऊन पुन्हां दोन वर्षांची त्याला सजा झाली. त्याला तुरुंगांत पाठविण्यांत आलें.
तुरुंगांत त्याला चक्की मिळाली. परंतु कल्याण डरला नाहीं. त्यानें चक्कीचा खेळ केला. तो इतर कैद्यांजवळ बसे, बोले. स्वराज्यांत असे तुरुंग राहणार नाहींत असें सांगे. आधीं तुरुंगच नकोत. आम्ही सर्वांना बाहेर नीट काम देऊं. तुम्ही वाईट नाहीं. तुम्ही चांगले आहांत. परिस्थितीमुळें तुम्ही असे झालांत असें त्यांना तो म्हणे.
एखाद वेळ कल्याणला वाटे कीं, भारतीय तत्त्वज्ञानहि मुळांत मनुष्य सत् आहे असें मानतें, आणि मार्क्सवादीहि सामाजिक विषमतेमुळें मनुष्य गुन्हे करतो, मुळांत त्याची प्रवृत्ति गुन्ह्याकडे नसते असें मानतात. यांतील थोडें साम्य त्याला मनोरंजक वाटलें.
तुरुंगांतील हळूहळू पुष्कळ राजकीय कैदी सुटले, आणि आतां थोडे राहिले होते. पुढें शेवटीं कल्याण हा एकटाच राजकीय कैदी तेथें राहिला. त्याला तेथें कंटाळा येई. त्याला त्याच्या खोलींतच आतां कांहीं काम आणून देण्यांत येत असे. तो कोणाजवळ बोलणार, कोणाजवळ हंसणार ?
एके दिवशी त्याला संध्येची तीव्र आठवण आली. आईची, रंगाची आठवण आली. आपण कोणालाहि पत्र लिहिलें नाहीं याचें त्याला वाईट वाटलें. तो रडला. आपण कृतघ्न आहोंत असें त्याला वाटलें. त्यानें पत्र लिहायला घेतलें.
“प्रिय संध्ये,
तुला किती तरी दिवसांत मीं पत्र लिहिलं नाहीं. मी तुला विसरूं पाहात होतों. ध्येयाशीं समरस होण्याची मी शर्थ करीत होतों. परंतु पक्षी सारखाच का अंतराळांत उड्डाण करतो ? त्याला मधून मधून खालीं यावं लागतं घरटयांत बसावं लागतं. चिवचिंव करावीशी वाटते. संध्ये, एखाद वेळ वाटे कीं, पुढंमाग तू व मी विवाहबध्द होऊन जाऊं. परंतु माझ्या जीवनांतून तो विचार मी काढून टाकीत आहें. संध्ये, माझ्यासारख्याचं जीवन म्हणजे होमकुंड. माझ्या संगतींत तुला कोणतं सुख मिळणार ?
खाण्यापिण्याची ददात पडेल. राहायला नीट जागा नसेल. तुझ्याजवळ बसायला-बोलायला मला वेळहि होणार नाहीं. वर्षानुवर्ष मला तुरुंगांत खितपत पडावं लागेल. संध्ये, तूं माझी मैत्रिण हो. दुरून प्रेम व सहानुभूति दे. दुरून ओलावा दे.
मीं तुरुंगांत खूप वाचलं. माझ्या विचारांत क्रांति होत आहे. सारं निराळंच दिसत आहे. पूर्वीचा केवळ कुस्ती खेळणारा कल्याण आतां मी राहिलों नाहीं. विषमतेशीं कुस्ती करणारा मी होईन.
संध्ये, माझ्या घरीं जा व आईला मी खुशाल आहें असें सांग. रंगा माझा भाऊ त्यालाहि सांग. मी किती तरी लिहिणार होतों. परंतु काय लिहावं तें समजत नाही. तूं सुखी हो. तुझ्या घरीं सर्वांना अनुक्रमें प्रणाम व आशीर्वाद. संध्या, इथं मी एकटाच राजकीय कैदी आहें.
तुझा
कल्याण”