संध्या 57
“केव्हां बघणार ! संध्या का आतां लहान आहे ? तुमचं तें मध्यंतरीं पत्र आलं कीं लग्न करावंसं वाटत नाहीं. त्या दिवसापासून संध्या हंसली नाहीं.”
“आई, लग्न करून मी राहूं कुठं ?”
“इथं राहा.”
“तसं माझं घर नाहीं का ? परंतु मला मुंबईला राहायचं आहे. कामगारांत काम करायचं आहे. मुंबईला खर्च कसा झेपणार ?”
“कल्याण, लहानशी खोलीहि पुरे. आपण तिथं स्वर्ग निर्मू.” संध्या भावनोत्कटतेनें म्हणाली. इतक्यांत शरद् व अनु आंत आलीं. तीं हंसलीं.
“जेवतां तरी किती ? अजून पानावरच.” शरद् म्हणाला.
“हातसुध्दां तुमचे वाळून गेले.” अनु म्हणाली.
“जा रे जरा खेळायला.” आई म्हणाली.
“पांखरें पुन्हां निघून गेलीं. कल्याण उठला. संध्येनें व आईनें उष्टें-खरकटें सारें आटोपलें. संध्येनें कल्याणला चिकणी सुपारी दिली.
“जरा पडायचं आहे का कल्याण ?” तिनें विचारलें.
“माझा शर्ट आण. जरा पडतों.” तो म्हणाला.
तिनें शर्ट आणला. स्वच्छ चुरचुरीत शर्ट. संध्येनें आपली उशी त्याला दिली. ती घेऊन कल्याण झोंपला. संध्येची आईहि काम आटोपून जरा पडली. संध्या बाहेर मागीलदारीं पडवींत कांहीं तरी शिवीत होती, भरीत होती.
कल्याणला झोंप येईना. या उशीवर संध्येच्या डोळयांतील पाणी पडलें असेल असें त्याच्या मनांत आले. त्यालाही वाईट वाटलें. काय करावें त्याला समजेना. अगतिकत्वाचे अश्रु त्याच्या डोळयांतूनहि घळघळले. शेवटीं तो उठला व बाहेर आला.
“झाली का झोंप ?” संध्येनें विचारलें.
“झाली.”
“चल, आपण खालीं विहिरीवर जाऊं.”
दोघें विहिरीवर आलीं. कल्याणने विहिरींत डोकावून पाहिलें.
“खोल आहे विहिर.” तो म्हणाला.
“तुझ्या मनाप्रमाणं.” ती म्हणाली.
“म्हणजे काय ?”
“तुझ्या मनाचा थांग लागत नाहीं.”
“संध्ये, तूं खरंच काय करणार ?”
“तुझ्या पाठोपाठ छायेप्रमाणं येणार.”
“माझ्या पाठोपाठ उपासमार करायला ? मरायला ?”
“तुझ्या पाठोपाठ येऊन तुझ्या प्रेमावर जगायला.”
“संध्ये, बोलणं सोपं असतं. प्रत्यक्ष परिस्थितींत प्रेम अपुरं पडतं.”
“कल्याण, माझ्या आजीची मी नात आहें. मला वायफळ बोलणं आवडत नाहीं. तुझ्याबरोबर राहून उपासमारीला, दु:खाला जर कंटाळलें, तर मी माहेरी निघून जाईन. नाहीं तर मुंबईचा समुद्र माझं माहेर होईल.”
“संध्ये, आज मी घरीं जाईन. थोडया दिवसांनीं मी पुण्याला परत जाईन. मग काय तें कळवीन.”
“केव्हांहि कळवा. माझा निश्चय अभंग आहे. माझी आशा अमर आहे. मी उतावीळ नाहीं. स्त्रिया आशातंतूवर जगूं शकतात. आशातंतूवर जगणारी स्त्रियांचीच एक जात. प्रेमाचा एक शब्द ऐकायला मिळावा म्हणून त्या वर्षानुवर्ष कष्ट सहन करतात. प्रेमाचं फूल कधीं तरी क्षणभर तरी फुलावं म्हणून त्या वर्षानुवर्ष रडतात.”
“संध्ये, तूं रडत जाऊं नकोस. हंस, खेळ, आनंदी राहा.”
“जशी तुझी इच्छा. तुझी इच्छा म्हणजे माझा धर्म.”
“मला नाहीं ही गुलामगिरी आवडत.”
“मला तर अशी गुलामगिरी आवडते. प्रेमाची गुलामगिरी म्हणजे परमोच्च मोक्ष. ती सर्वांत थोर स्वतंत्रता.”
“चल, वर जाऊं, आई उठली असेल.”
दोघें वर आलीं. आईनें चहा केला. संध्या, कल्याण दोघांनीं घेतला. आईनेंहि घेतला, मुलें चहा घेत नसत. तीं खाऊ घेऊन शाळेंत गेलीं.
तिस-या प्रहरी कल्याण जायला निघाला. त्यानें संध्येच्या आईला प्रणाम केला.
“तुम्हांला सारं सांगितलंच आहे. मातेचं हृदय ओळखा.” ती माता म्हणाली.
कल्याण कांहीं बोलला नाहीं. संध्या पोंचवायला बरोबर निघाली. जवळच्या रस्त्यानें पटकन् तीं गांवाबाहेर पडलीं. दोघें जात होतीं. कोणी बोलत नव्हतें. आकाशांत संध्याकाळ होंऊं लागली. रंग भरूं लागले.
“ती वरची संध्या रोज रंगते. परंतु हीं खालची संध्या कधीं रंगणार रे कल्याण ? तूं तिला कधीं रंगवणार ? सूर्याला अगदीं जवळ घेतल्यावर, आपल्या घरांत घेतल्यावरच संध्या अधिक रंगते. तुला जवळ घेईन तेव्हांच मी रंगेन. खरं ना ?”
कल्याण कांहीं बोलला नाहीं.
“सांग ना कल्याण मी कधीं रंगेन ?”
“वेळ येईल तेव्हां.”
“तूं का आतां परभारंच पुण्याला जाशील ?”
“हो.”