संध्या 24
“इथं चुलत्यांकडे त्रास होतो. काकू नेहमीं बोलते. रोज शिळपाक खायला. तिकडे लांब घरी होतो तर तिथं वडीलहि असेच सदा रागावत, मारीत. म्हणून एखाद वेळेस डोळे रडतात. मला रडण्याचा राग येतो. मी मल्ल आहे. मल्लानं का मुळुमुळु रडावं ? परंतु डोळे ऐकत नाहींत. येतंच पाणी.”
“आपण दोघे मित्र होऊ. रडण्यासाठीं नाहीं, तर हंसण्यासाठीं, एकमेकाना हंसविण्यासाठीं. मला हसवायला कोणी नाहीं. तुम्हांला पाहून मी हसेन, आनंदेन, सुखी होईन.”
“हो, होऊं या मित्र.”
“तुमचं नांव काय ?”
“कल्याण.”
“आणि माझं नाव विश्वास.”
“परंतु तुम्ही का रडत होतेत ?”
“मला माझ्या आईची आठवण झाली. मला माझी आई आठवत नाहीं. मी पाळण्यांत असतांनाच ती मेली. परंतु तिच्या मरणाच्या गोष्टी मीं ऐकल्या आहेत. आई मेली तेव्हां माझ्या पाळण्याची दोरी तिच्या हातात होती. आईची करुण कहाणी माझी सावत्र आई सांगते. शेजारी सांगतात. माझे वडील म्हणजे जमदग्नि. ते सर्वांना मारतील. किती मारतील त्याला सुमारच नाही. एके दिवशी संध्याकाळीं आई कुठं तरी हळदीकुंकवाला गेली होती. तिला घरी यायला जरा उशीर झाला, तर वडील त्या हळदीकुंकवाच्या घरीं गेले व त्यांनीं आईला मारीत मारीत घरीं आणलं ! जणूं गरीब गाय ! घरीं रोज मारीतच. पण आज रस्त्यांतून मारीत आणलं. घरीं मारते तर नित्याप्रमाणं आई सहन करती. परंतु त्या दिवशींची ती विटंबना आईला सहन झाली नाहीं. तिला फणफणून ताप आला. तरीहि ती काम करीतच राहिली. शेवटी निरुपाय झाला, तेव्हां ती अंथरुणावर पडली. तिला वात झाला. ती मेली गेली. किती करुण कथा ! कल्याण, हिंदुस्थानातील स्त्रियांच्या दु:खाला सीमा नाहीं. असे कसे हे नवरे, असे कसे हे कसाब ? स्त्रिया म्हणजे का गुरंढोरं ? गुराढोरांनाहि जरा आपण बरं वागवतो. कल्याण, आईच्या मरणाची एखाद वेळेस मला आठवण येते व कसंसंच होतं. मरतांना “माझं बाळ, माझं बाळ” असे ती वातांत म्हणे. माझ्या पाळण्याची दोरी तिनं हातांत घट्ट धरून ठेवली होती. परंतु तिच्या आयुष्याची दोरी तुटत होती. ती आपलं आयुष्य आपल्या बाळाच्या आयुष्याच्या दोरींत का घालीत होती ? कल्याण, काय सांगूं ? त्या आठवणींनी का नाहीं भरून येणार डोळे ?”
गोष्ट सांगतां सांगतां विश्वास गहिंवरला. त्याला अपार हुंदका आला. त्याने कल्याणच्या खांद्यावर मान ठेवली. त्या अश्रूंनीं ते दोघे मित्र बनले. त्या अश्रूंनी मैत्रीचे बीज अंकुरले. विश्वास हाडापेरानें मजबूत नव्हता. बारीक होता. त्याचे डोळे चमकदार होते. त्यांत एक विशेष तेज होतें. नाक तरतरीत होतें. तो तेजस्वी, स्वाभिमानी दिसे. जणूं नागाचें तल्लख पिल्लू. वडिलांचा रागीट स्वभाव थोडासा त्याच्या रक्तांतहि आला होता. परंतु विश्वासचा राग दुस-यांच्या दु:खासाठी असे, जगांतील अन्यायासाठीं असे.
झेंडा लावण्याचें ठरवून ते दोघे मित्र शाळेंत गेले. ते आज जरा आधींच शाळेत गेले. विश्वासने सुंदर तिरंगी झेंडा बरोबर आणला होता. त्यानें तो शाळेवर चढविला. शाळेचा शिपाई कुरकुर करूं लागला. परंतु विद्यार्थ्यांनीं त्याला गप्प बसविलें. शाळेच्या बाहेरच्या पटांगणांत विद्यार्थी जमले होते. शाळेवर तिरंगी झेंडा फडकत होता. पटांगणांत गाणें सुरू झालें.