संध्या 39
संध्या व कल्याण एकमेकांना मधून मधून पत्रें पाठवीत. आणि तें गाण्यांचें पुस्तकहि संध्येला आलें. संध्या त्यांतील गाणीं म्हणे.
“संध्ये, चांगली आहेत हीं गाणीं.” एके दिवशीं आई म्हणाली.
“कल्याणनं पाठवलीं.”
“कल्याणचा फोटो तुझ्याजवळ आहे. होय ना ?”
“तूं केव्हां पाहिलास, आई ?”
“पाहिला एकदां.”
“कल्याण आतां मोठा झाला असेल.”
“तूंहि कांहीं आतां लहान नाहीस.”
“मी का फार मोठी आहें ?”
“संध्ये, मोठी नाहींस तर काय ? परवां भावजी आले होते. तूं विहिरीवर धुणीं धूत होतीस. ते म्हणत होते कीं संध्येचं लग्न करून टाकावं. चांगलं स्थळ आहे. अलीकडे मीहि याच चिंतेंत असतें. भावजी व मी बराच वेळ बोलत होतों. त्यांना पुन्हां या असं सांगितलं आहे. ते येतील. संध्ये, त्यांना काय सांगायचं ?”
“आई, मला लग्न नको. नकोत या भानगडी.”
“संध्ये, तुला आतां सारं समजतं. लग्न नको काय ? कांहींतरीच बोलावं. भावजींचं मन दुखवूं नकोस. आहे तरी कोण दुसरं खटपटी करायला ? तुझी आई कुठं जाईल स्थळ शोधायला ?”
“आई, स्थळं शोधायला नकोत. आपोआप नेमानेमाच्या गोष्टी होतील. देवानं गांठी बांधून ठेवल्याच असतील.”
मायलेकींचीं अशीं बोलणी चालू होतीं. तोंच पुंडलिकराव आले.
“काय वैनी, कसलीं चाललीं आहेत बोलणीं ?” बसून ते म्हणाले.
“लग्नाचं बोलणं.”
“संध्ये, मीं तुला सुंदर स्थळ आणलं आहे. नवरा मुलगा श्रीमंत आहे. घरीं जमीनजुमला भरपूर. मोटारींतून हिंडशील, राजाची राणी शोभशील. वैनी, असं स्थळ हातचं गमावूं नये. संध्येला काय विचारतां ? मुलींना काय कळतं ? त्यांना विचारलं तर लाजतील. होय कीं नाही, संध्ये ?”
“काका, माझं लग्न ठरवण्याची घाई नको. देव आपोआप सारं करील ?”
“देव काय करणार आहे ?”
“तुमचा देवावर विश्वास नाहीं ?”
“अग, देवावर विश्वास म्हणजे आपण हातपाय न हालवणं ? आपले प्रयत्न देवाला आवडले तर तो आशीर्वाद देईल. प्रयत्न सफल होतील. लग्न वेळींच झालं पाहिजे. पुढं मग जड जातं. लोक नाना शंका घेतात, तर्क चालवतात.”
“संध्ये, तुझ्या काकांना तूं नाहीं म्हणूं नकोस. आतां त्यांचाच काय तो आपणाला आधार आहे. कोण आहे दुसरं ?”
“आई, कां तुम्हीं सारीं मला घालवूं पाहतां ?”
“सुखांत घालवत आहोंत. वेल वृक्षावर चढवीत आहोंत. जीवनाचा तुला सोबती देत आहोंत.” चुलते म्हणाले.
“ज्याची ओळख ना देख, तो का सोबती ?”
“संध्ये, उगीच कांही तरी बोलूं नकोस. ओळखदेख होते. शेंकडों वर्षांपासून लग्नं होत आलीं; तीं का फुकट गेली ? त्यांच्या संसारांत का सुख पिकलं नाहीं, प्रेम फुलल नाहीं ? आणि प्रेम जडून होणारे विवाह तरी का शेवटपर्यंत सुखाचे होतात ? पहिला भर ओसरला म्हणजे कटकटीच सुरू होतात. संध्ये, सुख हें समजुतीनं संसारांत निर्मावं लागतं. तडजोड, सहकार्य हाच खरा सुखाचा मार्ग. प्रेम क्षणभर फुलतं. तो मार्ग चिरंजीव नाहीं. धोक्याचा आहे.” चुलत्यानें प्रवचन दिलें.
“काका, मला कांहीं समजत नाहीं. परंतु मी एक सांगतें कीं माझ्या लग्नाची खटपट नको. तुम्ही या फंदांत पडूं नका.”