संध्या 50
“आई, चांगलं शिकण्यासाठींच मी तुरुंगांत गेलो. ज्यांच्याजवळ शिकण्यासारखं कांहीं आहे, असे देशांतील बरेच पुढारी तुरुंगात आले होते. जिवंत ज्ञान तुरुंगांत मिळालं. जिवंत शाळा तिथं होत्या. मोठया दृष्टीचे लोक तिथं होते. आई, तिथं माझ्या मनाची, बुध्दीची वाढ झाली. थोडे हाल झाले. पण हालांशिवाय काय आहे ? आधीं हालाहल, मग अमृत. आधीं त्याग, मग स्वराज्य. पण आई, तुझी काय दशा ? तुझे स्वत:च्या घरांत हाल, स्वत:च्या घरीं तुझा पदोपदीं अपमान ? स्वत:च्या घरांत तूं मोलकरीण झालीस ! आई, देऊं का घालवून त्या सटवीला. हें पाप नको इथं. मला तें पाहवत नाहीं. आम्ही तुझीं मुलं जिवंत असतां तुझी विटंबना आम्ही होऊं देणार नाहीं. बाबांना बाहेर करूं दे थेर. परंतु इथं घरांत ! . . .”
“हो, या घरांत थेर करीन. हें घर माझं आहे; माझ्या पोरांचं नाहीं. तुम्हांला माझे थेर बघवत नसतील, तर चालतीं व्हा सारीं.” पिता वरून खालीं येऊन एकदम रागानें म्हणाला.
“हें घर तुमचंहि नाहीं. वाडवडिलांचं आहे. तुमच्या पैशांनी थोडंच तुम्हीं बांधलं आहे : आमचाहि या घरावर हक्क आहे. बाबा, मी आतां मोठा झालों आहें. या घरांत हें पाप मी होऊं देणार नाहीं. आईचा अपमान मी सहन करणार नाहीं.”
“कोणीं केला अपमान ?”
“घरांत ती दुसरी आणणं म्हणजे का अपमान नव्हे ?”
“राजे लोकांचीं हजारों अंगवस्त्रं असतात. श्रीमंतांचीं हीं भूषणं मानलीं जातात. तुम्हां निर्जीव तरुणांना पौरुषाची काय किंमत ? पूर्वी या गांवांत अंगवस्त्रं नसणं म्हणजे नेभळटपणा मानीत.”
“पराक्रमाला तुम्हांला दुसरं स्थानच नाहीं उरलं. कुत्र्यांच्या लीलांचा पराक्रम. हे पराक्रम करायचे तर बाहेर करा. मी तुम्हांला निक्षून सांगतों, याचा परिणाम नीट होणार नाही. त्या बाईला ब-या बोलानं इथून जाऊं दे. नाहीं तर मी हात धरून तिला बाहेर काढीन.”
“मी आपण होऊनच जातें. यांच्या अंगांत पराक्रम असेल तर मला परत घेऊन येतील. मुलाच्या भीतीनं षंढ होणारा मला तरी कुठं हवा आहे ? ही मी चाललें-” असें ती बाई एकदम तेथें येऊन म्हणाली.
“जा, चालती हो !” कल्याण गरजला.
“ही निघालें. तुझ्या भीतीनं, तुझ्या धमकीनं नव्हे, तर यांची परीक्षा पाहण्यासाठीं यांच्या पौरुषाची परीक्षा करण्यासाठीं.”
“खबरदार पुन्हां या घरांत पाऊल टाकाल तर. याद राखा ! हें घर तुम्हांला वर्ज्य आहे. हा बलभीम तुम्हांला बजावीत आहे.”
“बलभीमहि कुठं तरी लाळ घोटल्याशिवाय राहात नसतात. मी जातें. यांची लाज घेऊन जातें. सत्त्व घेऊन जातें.”
ती बाई गेली. पिता वर गेला. मुलासमोर पिता अधिक बोलला नाहीं. त्या बाईला घरीं ठेवण्याचें धैर्य त्याला झालें नाहीं. तो घाबरला, भ्याला. कल्याणचें स्वरूप प्रखर व तीव्र दिसत होतें. त्याचा तो नैतिक संताप पाहून बाप भेदरला.
“गेली पीडा !” रंगा आनंदानें म्हणाला.
“पुन्हां येणार नाहीं.” कल्याण म्हणाला.
“जा, आंघोळी वगैरे करा.” आई म्हणाली.
दोघे भाऊ आंघोळीला गेले. कल्याणची पाठ रंगानें चोळली. किती तरी मळ निघाला. किती तरी दिवसांत आज अंगाला कल्याणनें तेल लावलें होतें. निर्मळ स्नान झालें. दोघे भाऊ आंघोळी करून घरीं आले. विहिरीवरून आले. पिता अद्याप वरच होता.
“बाबा, चला ना स्नानाला. मीं पाणी काढलं आहे.” कल्याण प्रेमानें म्हणाला. आणि काय आश्चर्य ! पिता मुकाटयानें आंघोळीला गेला. त्याचें स्नान झालें.
“कल्याण, आज तूंच पूजा कर.” आई म्हणाली.
“रंगा करील, आई.” तो म्हणाला.
“ब-याच दिवसांनी तूं घरीं आलास. तूंच कर हो आज देवांची पूजा. नाहीं म्हणूं नकोस.” आई म्हणाली.