संध्या 13
“तूं आम्हांला सोडून खरंच का जाणार ?”
“होय, माझा हट्ट बाबा पुरवणार आहेत. चुलत्यांचीहि शिकण्यासाठी मला ठेवायची इच्छा आहे. पुण्याला जाईन तर छान होईल.”
“काय करशील ?”
“शिकेन. माझ्या मनांत किती किती तरी येत असतं. कधीं कधीं वाटतं, देशासाठीं मरावं.”
“आपण अजून लहान आहोत.”
“खुदीराम का मोठा होता ?” हंसत फांशीं गेला. माझा जन्म सफल झाला असं गाणं म्हणत तो फांशीं गेला.”
“कल्याण, तूं गेलास म्हणजे आम्हांला कोण ?”
“नवीन नवीन खेळ कोण शिकवील ?”
“पुरांत पोहायला कोण नेईल ?”
“वनभोजनांचे बेत कोण करील ?”
“द-याखो-यांतून फिरायला कोण नेईल ?”
“कल्याण, तूं नको जाऊंस. तूं आमचा नायक.”
“तूं आमचा प्राण.”
“तूं आमचा आनंद.”
“तूं खरा सोबती.”
“तुझ्यावांचून सारं ओस होईल.”
“आम्हांला करमणार नाहीं.”
“कल्याण, नको रे जाऊंस !”