संध्या 43
विरोधविकासवाद ! विरोधांतून विकास. जगांत विरोध तर पदोपदीं दिसत आहेत. परंतु सारखा विकासच होत आहे का ? मानवी मनाचा विकास आहे का ? कधीं कधीं तर समाज मागें गेल्याप्रमाणें वाटतो. आजची युरोपांतील स्थिति पाहून असें नाहीं का वाटत ? हिंदुस्थानांतील हिंदु-मुसलमानांचे झगडे पाहून असेंच नाहीं का वाटत ? परंतु विकासाची फार मोठी पायरी चढून जावयाच्या वेळीं विरोधाचीहि पराकाष्ठा होत असेल.
आणि इतिहास म्हणजे का केवळ अर्थशास्त्र ? हिंदुस्थानांत मांसाशनत्यागाचा महान् प्रयोग झाला. तो मानवी मनाच्या विकासार्थ नाहीं का झाला ? भूतदयेसाठीं नाहीं का झाला ? त्यांत का आर्थिक दृष्टि होती ? भगवान् बुध्दांची चळवळ का आर्थिक होती ? महाराष्ट्रांतील संतांची चळवळ, ती का आर्थिक होती ? परंतु त्या चळवळींतहि खोल पाहूं तर आर्थिक प्रश्न दिसतील. हिंदुस्थानसारख्या सुपीक व समृध्द भूमींतच मांसाशनत्यागाचा प्रयोग शक्य वाटला असेल. शिवाय ज्यांना दूधदुभतें भरपूर मिळूं शके, ते मांसाशन वर्ज्य करूं लागले. गरीब लोक मिळेल तें खात होते. परंतु प्रश्न इतका सोपा नाहीं. इतिहास इतका सुटसुटीत नाही. अर्थ ही एक भूक आहे. मानवी मनाच्या दुस-याहि भुका आहेत. सर्व गोष्टींत आर्थिक संबंध पाहणें म्हणजे आततायीपणा आहे. कांहीं मानसशास्त्रज्ञ लैंगिक भुकेला प्राधान्य देतात, तर हे मार्क्सवादी अन्नाच्या भुकेला महत्त्व देतात. विषय व उदर यांशिवाय दुसरें कांहीं नाहींच का ?
माणसाजवळ अधिक कांहीं असेल. परंतु त्याचें पोट नीट भरल्याशिवाय इतर विकास होणार नाहीं. भरल्या पोटांतून तत्त्वज्ञानें जन्मतात. जगांत आजपर्यंत जी संस्कृति जनमली, ती प्रतिष्ठित वर्गांनीं निर्मिली. एका वर्गानें श्रमावें, दुस-या वर्गानें कला फुलवाव्या, विद्या फुलवाव्या. ग्रीक संस्कृतीचे आपण गोडवे गातों. परंतु ग्रीक संस्कृतिसवर्धकांना कोण पोषित होतें ? त्यांनीं गुलामांचा एक मोठा वर्गच निर्माण केला. त्या गुलामांनीं श्रमावें व प्रतिष्ठितांनीं काव्यें रचावी, तत्त्वज्ञानाच्या चर्चा कराव्या. हिंदुस्थानांत शेतकरी-मजूर राबत राहिले आणि पांढरपेशा लोकांनीं संस्कृति उभी केली. अद्याप सर्व मानवांनीं निर्माण केलेली अशी संस्कृति जन्मावयाची आहे. सर्व मानवांना फुरसद मिळेल, पोटाचे प्रश्न सुटून रिकामा वेळ मिळेल, तेव्हांच सारी मानवजात संस्कृतिसंवर्धनांत सामील होईल.
महात्माजीहि म्हणाले होते, “जोंपर्यंत मला पोटभर भाकर सर्वांना देतां येत नाहीं, तोंपर्यंत मी देवाचें नांव कसें शिकवूं ?” भगवान् बुध्दहि म्हणाले, “आधीं जेवायला द्या, मग धर्म शिकवा.” मार्क्सवादी तेंच सांगतो. तो मानवाला केवळ डुक्कर नाहीं मानीत. मनुष्याच्या अन्नवस्त्रादिक आवश्यक गरजा आधीं भागल्या पाहिजेत. या गरजा भागवण्यांतच त्याचा सारा दिवस नये जातां कामा. ज्या वेळी उत्पादनाचीं साधनें ओबडधोबड होतीं, त्या काळीं एक श्रमणारा वर्ग व एक संस्कृति निर्मिणारा वर्ग असें करावें लागलें. त्या काळीं तें योग्यहि असेल. परंतु आज उत्पादनसाधनें यांत्रिक झालीं आहेत. थोडया श्रमांत भरपूर निर्माण होतें. तरीहि आज दिवसभर राबत ठेवण्याची जरूरी काय ? हीं उत्पादनसाधनें समाजाच्या मालकीचीं केलीं गेलीं तर सर्व मानवांना रोज दोन तीन तास काम करून आपल्या सर्व आवश्यक गरजा भागवितां येतील, आणि संस्कृतिसंवर्धनाला सर्वांना भरपूर वाव मिळेल. खरी अखिल मानवांची अशी विविध संस्कृति निर्माण होऊं लागेल.
मार्क्सवादी म्हणतो, अर्थकामांच्या पायावर संस्कृति उभारली जाते. मानवाच्या या दोन गरजा नीट भागल्या तर त्याची वाढ नीट होते. मग विकृति निर्माण होत नाहीं. मनुष्याच्या पोटाला द्या. त्याच्या भोगवासनाहि व्यवस्थितपणें तृप्त होऊं देत. म्हणजे मग मनुष्य बेताल होणार नाहीं. तो विकसेल, नीट वाढेल; झाडाचीं मुळें खालीं असतात, खालीं जातात. परंतु यामुळेंच त्याच्या डोक्यावर फुलेंफळें शोभतात. मानवी मनाच्या विकासाचा फुलोरा दिसायला हवा असेल, तर अर्थकामाचीं मुळें नीट हवींत. या खालच्या वृत्ति असें म्हणूं नका. या खालच्या वृत्तींतूनच पुढें सारी संस्कृति निर्माण होत असतें. मनुष्याला खायला प्यायला द्या. बेताचा श्रमहि द्या. त्याची निराशा, अप्रतिष्ठा, मानहानि, सदैव काबाडकष्ट, हें सारें कमी करा. म्हणजे मग संस्कृतीचीं नाना रंगांचीं व गंधांचीं फुलेंफळें सर्वत्र दिसूं लागतील.
मार्क्सवादी केवळ अर्थाला महत्त्व देतो असें म्हणणें म्हणजे मुद्दाम गैरसमज पसरविणें आहे. अर्थाच्या नीट व्यवस्थेंतून खरी संस्कृति शक्य होईल, सर्व मानवांची अशी विशाल संस्कृति शक्य होईल एवढेंच त्यांचें म्हणणें.
कल्याण मनांत झगडत होता. त्याच्या मनांत निश्चितता जरी येईना, अमुकच मार्गानें सारा इतिहास घडत आला असें ठाम वाटेना, तरी इतिहासाकडे पाहण्याची एक स्वतंत्र दृष्टि त्याला मिळाली. थोर उदार हृदयें, थोर विचारांना खेंचून घेतात. उंच पर्वत मेघांना ओढून घेतात. ज्याच्या जीवनांत ओलावा आहे, दुस-यांचीं जीवनें सतेज व टवटवीत व्हावीं म्हणून जो तडफडतो, त्याला उदार विचार आवडतात. त्यांचा तो भक्त बनतो.
संध्येला काय माहीत कीं ज्याच्या नांवाचा जप ती करीत होती, त्या प्रभूचें नांव ऐकून कल्याण तुरुंगांत चिडत होता. आमची स्थिती सुधारण्यासाठीं देवाची जरूर नसून आमच्या प्रयत्नांची जरूर आहे असें तो म्हणत होता. संध्ये, तुला हें कळलें तर काय वाटेल ? तुझ्या हातांतील ती जपमाळ कल्याणला दिसली, तर तो ती तोडून फेकून देईल. तूं कल्याणशीं विवाह लावूं इच्छितेस. कसें जमेल तुझें त्याच्याशीं ? तूं रामकृष्णाचीं पौराणिक गाणीं म्हणतेस; क्रांतिकारक कल्याणला हें कसें आवडेल ?