संध्या 2
“काकू, आपण तडजोड करूं. जर तुला नाहींच राहवलं, तर दुपारचा स्वयंपाक तूं कर, पण रात्रीचा तरी करूं नकोस.”
“बरं हो ; तुझ्या म्हणण्याप्रमाणं.”
त्या दिवसापासून भागीरथीकाकू चुलीजवळ फारशी बसेनाशी झाली. तिचें नारायणरावांवर विशेष प्रेम असलें, तरी दुस-या दोघां भावांवर नव्हते असें नाहीं. सर्वांवर तिचा लोभ. सर्वांच्या मुलांबाळांचे ती कोडकौतुक करी. मुलांना घेऊन तुळशीच्या अंगणांत बसे. त्यांना गोष्टी सांगे. कृष्णयशोदेची गाणीं शिकवी. लहान मुलांना आंदुळी, त्यांना ओव्या म्हणे.
सर्व मुलांत संध्येवर तिचें फार प्रेम. संध्येचे तिला वेड. संध्या भीमरावांची मुलगी. मोठी खेळकर, चपळ. दिसेहि गोड गोमटी. भागीरथीकाकू कधीं कधीं मुलांना घेऊन मळयांत जाई. मळा मोठा सुंदर होता. मळयांत विहीर होती. मोट चालत असे. फुलांचे ताटवे होते. भाज्या होत्या. फळझाडें होतीं. मळयांत काम करणारीं गडीमाणसें भागीरथीकाकू येतांच प्रेमाने तिच्याभोवतीं जमत, फुलें आणून देत. फळें आणून देत.
त्या दिवशीं शाळेला सुट्टी होती. मुलांना घेऊन भागीरथीकाकू मळयांत गेली होती. गडीमाणसें जवळ आलीं.
“आजी, तुम्ही आतां म्हाता-या झालां. इतक्या लांब कशाला येतां ? वाटेंत दगडधोंडे, कांटेकुटे.” मोटकरी प्रेमाने म्हणाला.
“अरे, शेतावर आलं म्हणजे मी माझं म्हातारपण विसरतें या मुलांबाळांना घेऊन येण्यांत एक प्रकारची मौज असते. मला इथं अनेक आठवणी येतात. पूर्वीचे दिवस आठवतात. हा मळा म्हणजे माझं रामायण. खरं ना ? काय रे, कोबी केव्हां होईल तयार ? संध्येला कोबी फार आवडते.”
“होईल लौकर तयार. कुठ आहे संध्याताई ?”
“ती बघ, त्या झाडावर बसली आहे. क्षणभर स्वस्थ नाहीं बसायची; खारकुंडीप्रमाणं इकडे उडी मारील, तिकडे पळेल. भारीच हो अचपळ. संध्ये, उतर खालीं. घरीं नाहीं का जायचं ? चला रे सारीं.”
“मी नाहीं खालीं येणार. माझं नांव संध्या. मी संध्याकाळीं घरी येईन, तोंपर्यंत या झाडावर बसून राहीन. इथं मजा आहे.”
“वर खायला कोण देईल ?” “पाखरं देतील. तीं का माझ्याशिवाय खातील ? मीहि पांखरूंच. हंसतेस काय, आजी ? “
“पुरे चावटपणा. उतर खालीं. घरी जायला उशीर होईल.”