संध्या 115
“भाईजी, तुम्हीं हो का नाहीं लग्न केलंत ? तुमचा संसार फार सुखाचा झाला असता.” कल्याण हंसून म्हणाला.
“परंतु मला मग सर्वस्व देतां आलं नसतं. तोंडांतून नकार काढावा लागला असता. म्हणून मी लग्न नाहीं केलं. बरं, तें जाऊं दे. संध्ये, मला फार भूक लागली आहे.” भाईजी म्हणाले.
“भाईजी, तुम्हांला भूक ?” विश्वासनें विस्मयानें विचारलें.
“अरे, मला का खायला लागत नाहीं ? “ते आश्चर्यानें म्हणाले.
“तुम्हीच म्हणतां कीं एका गोष्टीचा मला कंटाळा आहे व तो म्हणजे जेवणाचा.” विश्वासनें आठवण दिली.
“कंटाळा आला तरी जेवावं लागतं. अजून तुमच्या प्रेमामुळं जगायचा कंटाळा आला नाहीं.” भाईजी म्हणाले.
जेवणं झालीं. रात्रीं जरा पत्ते खेळून सारीं शांत झोंपलीं.
दुस-या दिवशीं सकाळीं कल्याण व विश्वास बाहेर गेले होते. संध्या भाजी चिरीत होती. भाईजी वर्तमानपत्रें वाचीत होते.
“भाईजी, तुम्हांला एक गोष्ट सांगूं ?” संध्येनें विचारलें.
“सांग.”
“तुमची खादी जाळावी असं मला वाटतं.” ती म्हणाली.
“खादीवर राग नको करूं. लाखों गरिबांना ती स्वाभिमानाचा घांस देत आहे.”
संध्येनें त्या खादीभांडारांतील तो कटु अनुभव सांगितला. भाईजी खिन्न झाले व म्हणाले,
“संध्ये, महात्माजींची सहानुभूति अनंत आहे. संकुचितपणा त्यांच्याजवळ नाहीं; परंतु महापुरुषांचे कांहीं अनुयायी जड वृत्तीचे होतात. सूर्य भाजीत नाहीं, परंतु ती क्षुद्र वाळू अधिक भाजते. तसंच हें. या अशा संकुचित बुध्दीच्या माणसांकडे पाहून महापुरुषांवर आपण रागावूं नये. खादीवर रागावूं नये. या भाईलोकांतहि असे प्रकार नाहींत का ? मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला कांहीं मार्क्सवादीच ठोकळयांत घालूं पाहतात. त्यांतील प्रगतिपरत्व मारूं पाहतात. सर्वत्र हाच अनुभव. महापुरुषांची विशाल व व्यापक दृष्टि सामान्य अनुयायांजवळ नसते. आणि हे अनुयायी हटवादी, निर्दय, सहानुभूतिशून्य असे ठोकळे बनतात. कांहीं गांधीवादी असे सर्वत्र दिसतात. परंतु त्याचा राग बिचा-या खादीवर नये काढूं. भलेबुरे लोक, असे संकुचित लोक सर्वत्रच आहेत. समजलीस ना ?”
दुपारचीं जेवणें झालीं. विश्वास पुन्हां पुण्याला गेला. भाईजीहि निघून गेले. ते कोणीहि जास्त राहिले नाहींत. पुन्हां संध्या नि कल्याण दोघेंच राहिलीं. परंतु त्यांनाहि मुंबई मानवेना. संध्येला ताप येऊं लागला. घरांत सारी अडचण.
“संध्ये, आपण पुण्यालाच जाऊं.”
“कल्याण, पुण्याला तरी हाच ना प्रकार ?”
“तिथं भाडं कमी पडेल. रंगालाहि बोलावूं. पुणंच बरं. नको ही महाग मुंबई.”
“इथं दुकानदारांचं देणं आहे.”
“संध्ये, हें हातमशीन टाकावं विकून. पुण्याला जाण्यापुरते थोडे तरी पैसे होतील.”
“जें योग्य दिसेल तें कर.” पडल्या पडल्या संध्या म्हणाली.
शेवटीं कल्याणनें सारी व्यवस्था केली. एके दिवशी रात्रीं दोघे गुपचूप निघालीं. पुण्याच्या गाडींत बसलीं. दोघें हळूच बोलत होतीं.
“कल्याण, खोलीचं भाडं दिलंस का ?”
“पुढचा जन्म असला तर देऊं ! “
“आणि दुकानदारांचे पैसे ?”
“कामगारांची सत्ता स्थापन होईल तेव्हां देऊं.”
“कल्याण, असं रे काय बोलतोस ?”
“संध्ये, दिले हो सर्वांचे पैसे.”
“खरंच ?”
“हो, खरंच. लाल झेंडेवाले फसवे आहेत असं नये होतां कामा. आणि नसते पैसे देतां आले, तर आपण मोठं पाप केलं असं
थोडंच झालं असतं ? आपणांजवळ नसलंच कांहीं, तर द्यायचं तरी कुठून ? खरं ना संध्ये ?”