संध्या 40
“संध्ये, माझं कर्तव्य म्हणून या फंदांत मला पडावं लागतं. जर तुझ्या लग्नाची मी खटपट न करीन, जबाबदारी न उचलीन, तर लोक मला नांवं ठेवतील. संध्ये, मी स्थळ आणीन तें तूं पसंत करशील ना ? मी तुझं कदापि अहित करणार नाहीं. माझ्यावर विश्वास टाक. तुझा भावी संसार सुखाचा होऊं नये असं का तुझा चुलता इच्छील ? मी का शत्रु आहें ? सांग, काकांची फजिती नाही ना होऊं देणार ? पाहूं ना स्थळ ?
“काका, मी काय सांगूं ? मोकळेपणानं सांगेन तर संतापाल.”
“मोकळेपणानं सांग. तूं कांहीं लहान नाहींस”
“काका, संध्येचा विवाह तिला नकळत लागून गेला आहे.”
“काय, तुझा विवाह झाला ?”
“हो.”
“काय सांगतेस, संध्ये ?”
“सत्य तें सांगत आहें.”
“तूं कुळाला काळिमा लावणार एकूण ! “
“नाहीं काका, संध्या मूर्ख नाहीं; मोठया काकांचं, आजीचं नांव मी कलंकित करणार नाहीं. संध्येनं कोणतंहि पाप केलं नाहीं. परंतु मनानं मीं एकाला वरून ठेवल आहे. त्याला माळ घातली आहे. लग्नाच्या गोष्टी अलीकडे आई मजजवळ बोलत असे. मी मनांत पाहिलं. माझ्या जीवनांत कोणीतरी शिरलं आहे, असं मला आढळलं. जो जीवनांत सहजपणं राजाप्रमाणं नि:शंकपणं शिरला, तोच मीं वरिला. त्याच्याशींच लग्न लावीन असं मी ठरवलं. मी त्याच्याशीं लग्न करीन असं मला प्रथमपासूनच का नकळत वाटत होतं ? मला माहीत नाहीं. मनाचे अनंत खेळ, मनाची अनंत शक्ति. माझी त्याची सहज भेट झाली. ती भेट अमर झाली. तो माझा व मी त्याची. तो माझा होईल कीं नाहीं कुणीं सांगावं ? परंतु मीं स्वत:चं जीवन त्याला दिलं आहे.”
“कोण तो ?”
“माझा कल्याण ! नयनमनोहर कोमल कल्याण ! सुंदर शरीराचा, पवित्र मनाचा, उदार भावनांचा कल्याण ! शेजारच्या सुपाणी गांवचा. परंतु तो पुण्याला आहे. शिकत आहे. मला पत्रं पाठवतो. थोर दिलदार तरुण ! संध्येचं त्या कल्याणशीं लग्न लागेल. माझ्या जीवनांतील राम म्हणजे तो शूर निर्भय प्रेमळ तरुण. क्रांति करूं पाहणारा तो तरुण. मी गरिबांसाठीं मरेन असं म्हणणारा तो तरुण. काका, आतां संध्येच्या लग्नाचा विषय कृपा करून पुन्हां कोणी कधीं काढूं नका. तुमच्या संध्येचं लग्न-मानसिक लग्न-केव्हांच लागून गेलं आहे. औपचारिक व्हायचं राहिलं आहे. तें योग असेल तेव्हां होईल.”