संध्या 62
कल्याण व विश्वास त्या म्हाता-याच्या घरीं गेले. घरांत भाकर शिल्लक होती. चटणी, तेल, कांदा व भाकर देण्यांत आली. दोघांनीं ती पोटभर खाल्ली. जेवणानंतर त्यांना अंथरुणपांघरुण मिळालें. दोघे मित्र झोंपले. सकाळीं जातांना म्हाता-यानें त्यांना दूध दिलें. म्हाता-याचा निरोप घेऊन कल्याण व विश्वास गेले. तो वृध्द मनुष्य म्हणजे भारतीय संस्कृति होती. हिंदुस्थानांतील शेतकरी गरीब झाले तरीहि त्यांची माणुसकी मेली नाहीं. ते बसायला फाटकी का होईना, घोंगडी देतील. सुपारीचें खांड देतील. स्वत: उपाशीं राहून आलेल्याला जेवण देतील.
एके दिवशीं सायंकाळीं कल्याण व विश्वास असेच एका गांवी आले. त्यांना खूप भूक लागली होती. त्यांना एक मनुष्य भेटला. कल्याणनें विचारलें, “कुठं जेवायला मिळेल का ? “
“माझ्याकडेच चला.” तो शेतकरी म्हणाला.
ते दोघे त्याच्याकडे गेले. सभेची दवंडी त्यांनीं दिली होती. ते ओटीवर बसले होते. दमून आले होते. ते जरा पडले. त्यांना झोंप लागली.
“उठा, कपडे काढा.” शेतक-यानें त्यांना जागें करून सांगितले. हातपाय धुऊन दोघे मित्र जेवायला बसले. ताजा ताजा भात होता.
“तुम्हीहि बसा ना आमच्याबरोबर.” विश्वास म्हणाला.
“मी मागून बसेन. तुम्ही पोटभर जेवा.” तो म्हणाला.
“किती गोड लागतं आहे जेवण ! “कल्याण म्हणाला.
“गोड करून घ्या.” शेतकरी म्हणाला.
जेवणें करून मित्र ओटीवर बसले. गांवांतील एकानें बत्तीची व्यवस्था केली होती. कांहीं मुलें कुतूहलानें तेथें जमलीं होतीं. आंत तो शेतकरी जेवायला बसला होता. इतक्यांत कल्याण सहज आंत गेला.
“बसलेत जेवायला ?” त्यानें विचारलें.
“होय.” तो म्हणाला.
“तुमच्या पानांत भात नाहीं तो ? हें काय आहे ?”
“आंबाडीच्या भाजींत पीठ घालून हा प्रकार करतात.”
“तुम्हांला भात नाहीं आवडत ?”
इतक्यांत कोणी तरी येऊन म्हणाला,
“तो कुठून आणील भात ? तुमच्यासाठीं उसने तांदूळ आणून तुमच्यापुरता त्यानं भात केला. म्हणून तर तुम्हांला त्यानं आधीं बसवलं. शेतक-याची स्थिती काय सांगावी, दादा ! शेतकरी मेला हो मेला. आम्ही अब्रूनं कसे दिवस काढतों आम्हांलाच माहित.”
कल्याण गंभीर होऊन बाहेर आला. दारिद्र्यांतहि आतिथ्य दाखविणारे दिलदार शेतकरी. तो मनांत म्हणाला, “अशा या उपाशीं अन्नदात्याची स्थिति सुधारावी म्हणून लाखों पांढरपेशे तरुण मेले तरी उपकार फिटणार नाहींत. कधीं हा शेतकरी पोटभर खाईल, घोटभर दूध पिईल ? स्वत: पाला खाऊन जगतो. अरेरे ! “
असे अनुभव घेत ते दोघे मित्र हिंडले. त्यांनीं दैन्यदारिद्रयाच्या कथा पुस्तकांतून वाचल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष पाहणें व वाचणें यांत अंतर आहे. खेडयांत रोख दिडकी मिळणें कठीण. रात्रीं दिवा लावायला तेल नाहीं. आजारीपणात दवा नाहीं. दुसरे बदलायला स्त्रियांना वस्त्र नाहीं. हताश स्थिति !
शेतकरी परिषद झाली. खरोखरच हजारों शेतकरी जमले. हजारों मुंडाशीं दिसत होतीं. महाराष्ट्राचें हृदय, महाराष्ट्राच्या पाठीचा कणा, महाराष्ट्राचें राकट मनगट तेथें होतें. अध्यक्षांचें हृदय उचंबळलें. अशी घनदाट शेतकरी परिषद् त्यांनीं पाहिली नव्हती. उन्हातान्हांत हिंडून ज्यांनीं प्रचार केला, त्यांचे अध्यक्षांनीं कौतुक केलें. अध्यक्ष स्फूर्तीनें शेतक-यांना म्हणाले, “पाताळांत दडपलेला हा असा शेतकरी बळी राजा वर मान केल्याशिवाय राहणार नाहीं. भविष्यकाळ तुमचा आहे. गादीवर लोळणा-यांचा नाहीं. निराश व उदास नका होऊं. ती पाहा तुमच्या भाग्याची प्रभात--”