संध्या 106
“मला एकटयाला का पाहायची हौस आहे ? मी तुला आनंद व्हावा म्हणून आलों. तुझ्या मनाची करमणूक व्हावी म्हणून मी तुला घेऊन आलों.”
“मी तुझ्यासाठीं आलें. तुला वाईट वाटूं नये म्हणून आलें. नाहीं तर मला थोडाच आवडतो बोलपट ?”
“संध्ये, काढूं का तिकिटं ?”
“नको.”
“चल तर परत जाऊं.”
दोघें निघालीं. कोणी बोलेना. कल्याण का हिरमुसला होता, रागावला होता ?
“कल्याण, ट्रॅममध्यें नाहीं का बसायचं ?”
“दोन आणे फुकट का दवडा ? एक वेळ खायला पुरतील.”
“कल्याण, कां रे असं मला हिणवतोस ? चल हो, बोलपट पाहूं. काढ रुपया-रुपयाचीं तिकिटं. चल, खरंच चल.”
“आतां नको. ती बघ आपली ट्रॅम आली. गर्दी आहे. पटकन चढ ! “
“मी पुढून चढतें.”
आणि दोघें पुन्हां ट्रॅममध्यें बसलीं. कल्याणकडे पाहून संध्या हंसली. परंतु तो हंसला नाहीं. आज तिचें हंसणें का परिणामहीन
होतें ? तिच्या हंसण्यांतील जादू का आज नाहींशी झाली होती ? कांहीं वेळ गेला नि कल्याणहि हंसला.
“संध्ये, तूं वेडी आहेस.”
“पुढं तूं मला शहाणी म्हणशील.”
“शहाणी होशील तेव्हां शहाणी म्हणेन.”
“कल्याण, एखादं शिवायचं हातयंत्र नाहीं का घेतां येणार ? नवंच हसं असं नाहीं. जुनं कमी किंमतींत नाहीं एखादं मिळणार ?
मी शेजारच्या बायकांना वगैरे विचारलं. मला त्यांचे कपडे शिवायला मिळतील. वेळ जाईल थोडा. नाहीं का ?”
“परंतु हल्लीं किंमती फार वाढल्या आहेत.”
“मागं माझ्या एका दूरच्या मामांचं पत्र आलं होतं. त्यांत त्यांनीं विचारलं होतं कीं, तुला काय पाहिजे, कळव. तुला लग्नाची कांहीं भेट द्यावी असं मनांत आहे. कल्याण, त्यांना एक शिवणकामाचं हातमशिन द्या, असं कळवूं ? तें पत्र मी विसरूनच गेलें होतें. लिहूं का त्यांना ?”
“त्यांना लिही कीं तुम्हांला जेवढे पैसे द्यायची इच्छा असेल, तेवढे पैसे मला पाठवा. मी इथं त्यांतून जें घेतां येईल तें घेईन.”
“असं कसं लिहायचं ?”
“त्यांत काय बिघडलं.”
“कल्याण, अरे आपण पुढं आलों. मागंच उतरायला पाहिजे होतं.”
“चल, आतां इथं उतरूं.”
दोघें उतरलीं व पुन्हा मागें चालत गेलीं.
दिवसेंदिवस कल्याणला मुंबईत संसार चालविणें कठीण जाऊं लागलें. ठिणगी वर्तमानपत्र बंद पडलें. कोणताहि छापखाना तें छापायला तयारच होईना. अर्थात् कल्याणला तेथें थोडेसे पैसे मिळत तेहि आतां बंद झाले. कामगारकचेरींत थोडा पगार मिळे. तेवढयानें कसें भागणार ? दुकानांतून डाळ, तांदूळ, तेल, सारें तो उधार आणी. पैसे थकत. एका दुकानांत बरीच उधारी झाली कीं, कल्याण दुस-या दुकानांत खातें सुरू करी. अनेक दुकानांची अशी उशारी तुंबत चालली. कल्याण सचिंत झाला. तो दुपारीं घरी जेवायला येईनासा झाला.