संध्या 36
कल्याण, बरेच दिवसांत तुला मी लिहिलं नाहीं. कांहीं सुचत नसे. लिहूं तरी काय ? किती तरी लिहावंसं वाटत. स्वप्नांत मी तुला पत्रं लिहितें. स्वप्नांत तीं छान लिहिता येतात. परंतु जाग आल्यावर तशीं लिहितां येत नाहींत. तीं आठवत नाहींत. माझी स्वप्नांतील पत्रं तुला स्वप्नांत मिळालीं असतील, नाहीं ? स्वप्नांमध्ये मनुष्य अधिक प्रेमळ व अधिक हुशार होतो का रे ?
कल्याण, माझी उंची वाढली आहे. पूर्वी मी ठेंगणी होते. आई म्हणते, “संध्ये, आतां बरी दिसतेस.” तूं माझा पूर्वी फोटो काढला होतास. आतां पुन्हां काढावा लागेल. तिथूनच येईल का रे काढता ? मी इकडे डोळे मिटीन व तिकडे तूं फोटो काढा.
तुला नवीन मित्र विश्वास हा मिळाला. चांगल झालं. आणि ती हरिणी खूप हुशार आहे का रे ? मी पुण्याला आलें तर मला का ती हसेल ? ती इंग्रजी शाळेंत जाते. परंतु मला इंग्रजी येत नाहीं; कल्याण, तूं शिकवशील मला इंग्रजी ? परंतु केव्हां शिकवणार तूं ? मी इथं व तूं तिथं. पत्रांतून येईल का रे शिकवतां ? संध्येचं इंग्रजींत काय रे होईल ? व कल्याणला इंग्रजींत काय म्हणतात ? इंग्रजी ज्याला येत नाहीं, त्याला पुण्याकडे वेडा म्हणतात का रे ? आजी म्हणत असे, “संध्या हुशार आहे.” आई सर्वांजवळ म्हणत असते, “संध्येची हुशारी कांहीं निराळीच आहे.” कल्याण, बाबा एकदां म्हणाले, “माझी संध्या म्हणजे देवता आहे.” मी अभिमानानं नाहीं हो सांगत. तुला म्हणून लिहिलं; परंतु इंग्रजी न येणारी मुलगी का देवता ? बाबा कांहीं तरी म्हणाले. आईबापांना आपलं मूल हुशार वाटतं.
कल्याण, पुण्याला तूं इंग्रजी शिकणा-या मुली बघशील. तूं म्हणशील, संध्या वेडगळ आहे. संध्या खेडवळ आहे. परंतु ही वेडगळ व खेडवळ संध्या प्रेमळ आहे. परवां आमच्या शेतावरचा खडकरी आला होता. त्याला मीं घरांत जेवायला वाढलं त्यासाठीं आईजवळ भांडलें आणि खंडू कुडतं काढून जेवायला बसला तर मीं त्याचं तें कुडतं घेऊन, जिथ तें फाटलं होतं तिथं पटकन् शिवून ठेवलं. खंडूचं हृदय भरून आलं. पुण्यांतील इंग्रजी शिकणा-या मुली शेतक-यांच्या फाटक्या कपडयाला ठिगळ लावीत असतील का ? प्रेमानं त्याला घरांत जेवायला वाढत असतील का ? गरिबांना त्या देतील का प्रेम ? मी पुण्याला येईन तेव्हा पाहीन. परंतु केव्हां येऊं मी पुण्याला ? मी अजून कुठंहि कधीं गेलें नाहीं. कल्याण, तूं मोठा झालास म्हणजे तुझ्याबरोबर मी येईन. तूं नेशील मला ? पुणं-मुंबई दाखवशील ?
तुझी काकू तुला अजून रागं भरते का ? तूं अजून त्या नदीवर जाऊन रडतोस का ? तुला तिथं मायेचं कोणीच का नाहीं ? मी तिथं असतें तर तुझे डोळे पुसले असते. आईनं मला दिलेला खाऊ तुझ्या तोंडांत घातला असता. मी मोठी झालें तरी आईजवळ खाऊ मागतें. शरद् व अनु दुपारीं शाळेंत जातांना आईजवळ खाऊ मागतात. मीहि हंसत हात पुढं करतें. आई हंसते. शरद् व अनु म्हणतात, “ताईला कशाला खाऊ ? ती शाळेंत थोडीच जाते ?” परंतु आई म्हणते, “ती घरीं असते. तिला काम पडतं. तिला तर अधिक हवा खाऊ. ती मला वाचून दाखवते. मला शिकवते.” कल्याण, आई माझं असं कौतुक करते. तुझं कोण करीत असेल कौतुक ? तुझं कौतुक मी करीन हो.
तूं पुन्हां दिलंस का कधीं व्याख्यान ? तुझं व्याख्यान मी कधीं बरं ऐकेन ? मला येईल का रे व्याख्यान देतां ? परंतु व्याख्यान द्यायची मला नाही आवड. दुस-यांचीं व्याख्यानं मी ऐकेन. ऐकून व वाचून मी शहाणी होईन. प्रेम करून शहाणी होईन. दुस-यांच्या उपयोगी पडून मी शहाणी होईन. परंतु माझा होईल का रे कुणाला उपयोग ? सध्यां आईला तरी होतो आहे.
कल्याण, तूं मागं लिहिलं होतंस कीं कविता केल्या आहेत म्हणून. मला पाठव त्यांतील कांहीं. आजी होती ना, ती स्वत: गाणीं रची. मलासुध्दां येतील का रे गाणीं करायला ? कल्याणला कविता करायला येतात, मला संध्येला कां येणार नाहींत ? मीसुध्दां गाणीं करून तुला पाठवीन. परंतु त्यांना हंसूं नको. नांव ठेवू नको. स्वराज्याचीं, झेंडयाचीं गाणीं मला पाठव. तूं बरीच पाठ केलीं असशील. तुला आवडतील तीं मला पाठव.
आज आमच्याकडे आंबाडीची भाजी होती. मींच केली होती. वरती लसणीची फोडणी. मला पालेभाजी फार आवडते. आई म्हणते, “संध्ये, मागच्या जन्मीं का बकरी होतीस ?” कल्याण, मला भाजी छान करतां येते व भाकरीहि छान करतां येते. आजी म्हणायची, “संध्येची भाकरी म्हणजे पौर्णिमेचा चंद्र.” माझ्या हातची भाजीभाकर खायला केव्हां येशील तूं ? परंतु तुझ्याजवळ पैसे नसतील. मी तरी आईजवळ कसे मागूं ? कल्याण, आईजवळसुध्दां मागायला संकोच वाटतो, नाहीं ? ज्याच्याजवळ आपण वाटेल तें, वाटेल तितकं व वाटेल तेव्हां नि:संकोचपणं मागूं शकूं असं असतं का रे कोणी ? कोणाची भीति वाटते, कोणाची लाज वाटते, कोणाजवळ संकोच वाटतो; कांहीं ना कांहीं आड येतंच. नाहीं का ?
कल्याण, तूं आखाडयांत जातोस का ? कुस्ती खेळतोस का ? तुझं पीळदार शरीर सर्वांना आवडत असेल. परंतु तिथं नसेल दूध; नसेल चांगलं खायला; तू फार व्यायाम करूंच नकोस. बेताचा कर. जप हो प्रकृतीला. मला पत्र पाठव. तुझ्या सर्व मित्रांना प्रणाम. हरिणीला प्रणाम. आतां पत्र पुरं करायला हवं. शाळा सुटेल व शरद् आणि अनु घरीं येतील. दोनतीन तास हें पत्र लिहीत आहें. परंतु वाचून होईल पांच मिनिटांत. माझं अक्षर छान आहे कीं नाहीं तें कळव. संध्याकाळ होत आली. आतां कळशी घेऊन विहिरीवर जाईन. सायंकाळचे रंग पाहीन. तूं बघतोस का रंग ? तूं आखाडयांत मातीनं रंगत असशील. होय ना ? बरं तर. पुरे आतां.
तुझी
संध्या”