संध्या 140
“भाईजी, तुम्ही आपलं नि:स्वार्थ प्रेम आम्हांला देत आहांत, आम्हां सा-या पोरक्या पोरांना तुम्ही थोडाफार आधार देत आहांत. तुमचीं आमचीं मतं भिन्न असतील. परंतु हृदयं एकजीव झालीं आहेत. त्यामुळं मला भीतिहि वाटते.”
“कसली भीति ?”
“आपण या अशा प्रेमामुळं मिंधे होतों. ध्येयासाठीं जर हे प्रेमबंध तोडण्याची जरूर भासली, तर मोह आडवे येतात, कृतज्ञता-बुध्दि आडवी येते. कृतज्ञता श्रेष्ठ कीं ध्येयनिष्ठा श्रेष्ठ ? मग मनुष्य तडजोडी करूं लागतो. देवाणघेवाण करूं लागतो.”
“विश्वास, सत्य हें तडजोडींतच असतं ना ?”
“भाईजी, सत्याला तडजोड माहीत नसते. तडजोड म्हणजे निर्मळ सत्य नव्हे. तडजोडीचं सत्य म्हणजे मिसळ चांदीचा रुपया; ती संपूर्ण चांदी नव्हे.”
“परंतु संपूर्ण चांदीचा रुपया व्यवहारांत चालत नाहीं. त्यांत थोडी भेसळ लागतेच.”
“भाईजी, दुबळया लोकांनीं हा “व्यवहार” शब्द निर्मिला आहे. ज्यांना मोह तोडवत नाहींत, बंध काढवत नाहींत, आसक्ति फेंकवत नाहीं, असे नेभळे जीव व्यवहाराची भाषा बोलतात. हीं असलीं मरतुकडीं तत्त्वज्ञानं निर्मितात. परंतु भाईजी, तुमच्या जीवनांत तर व्यवहार कुठंच नाहीं. तुम्ही व्यवहारातीत आहांत.”
“म्हणूनच मला मूर्खांत काढतात.”
“अशा मूर्खांची आम्ही पूजा करूं. मलाहि असा एक मूर्ख होऊं दे.”
“विश्वास, झोंप आतां. बारा वाजतील.”
“तर मग थोडाच वेळ राहिला. लौकरच येतील रिझल्टवाले ओरडत. थोडा वेळ बसूंया इथं.”
“इतक्यांत पलीकडून रडण्याचा दीनवाणा आवाज ऐकूं आला. करुण करुण आवाज ! सर्वत्र शांतता होती. कोण रडत होतें ?
“विश्वास, कोण रे ?”
“त्या पलीकडच्या वाडयांतून तो आवाज येत आहे.”
“कोणाचा ?”
“तो मालक आपल्या पत्नीला मारीत आहे. मधून मधून तो हे प्रकार करतो. इकडे या. इथून ऐकूं येईल.”
पत्नीला मारून नव-यानें तिला घरांतून बाहेर हांकललें होतें. ती अंगणांत रडत उभी होती. ती दाराजवळ आई व दीनवाणेपणें म्हणे, “उघडा ना दार. घ्या आंत; असं काय करतां ते.” परंतु तो दार उघडीना. ती बाहेर रडत बसली. थोडया वेळानें त्यानें दार उघडलें. “हो आंत.” असें म्हणून मारीत त्यानें पुन्हां तिला आंत नेलें.
“काय हे प्रकार ?” भाईजी म्हणाले.
“माणसं अद्याप माकडंच आहेत. नवरे असे व बायकाहि तशाच. तीच बाई उद्यां सकाळीं हंसत खेळत असेल. पोपटाला पेरू चारीत असेल. तिला कुठं स्वाभिमान आहे ? आर्थिक दृष्टया मान उंच झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहींत. ही आर्थिक गुलामगिरी आहे.” विश्वास म्हणाला.
भाईजी कांहीं बोलले नाहींत. ते गंभीर झाले.
“भाईजी, प्रेम प्रेम तरी काय आहे ? क्षणभर त्याची गोडी नाहीं का ? दोन प्रेमी जीवांना खांबाशीं एकत्र बांधून ठेवलं, तर त्यांना का आनंद वाटेल ! आपण एकत्र आहोंत याचं का त्यांना सुख वाटेल ! तोंडाशीं सारखं तोंड आहे म्हणून का त्यांना मोक्ष वाटेल ? उलट तीं दोघं विटतील. तोंड फिरवूं पाहतील. आणि खांबापासून मुक्त केल्यावर त्यांच्या मनांत पहिला विचार येईल तो हा कीं, एकमेकांचं तोंडहि आतां पाहूं नये; नाहीं भाईजी ? हीं आसक्तिमय प्रेमं, हीं वासनात्मक प्रेमं, अल्पमधुर आहेत, चिरमधुर नाहींत. परंतु त्यांच्याशिवाय जीवनाला आधार नाहीं. सारं कोडं आहे. सारा गोंधळ.” विश्वास म्हणाला.