संध्या 73
ती तारीख आली. सा-या गिरण्या बंद पडल्या. यंत्राप्रमाणें सारें झालें. अत्यंत शांततेचा असा तो एक दिवसाचा निषेध-संप होता. इतका व्यवस्थित संप पूर्वी कधींहि झाला नव्हता. आणि सायंकाळी विराट सभा भरली. लाख दीड लाख कामगारांची भव्य सभा. कामगारमैदान फुलून गेलें होतें. उंच लाल झेंडा तेजानें फडकत होता. “पगारवाढ ताबडतोब” अशी गर्जना होई व ती गगनाला भिडे. इन्किलाबच्या घोषणांनीं दशदिशा भरल्या. विश्वास व कल्याण यांच्या डोळयांचें पारणें फिटलें. ही सभा भरविण्यासाठीं त्यांचेहि प्रयत्न होते. अनेकांच्या प्रयत्नांत त्यांचीहि भर होती.
सभेंत ध्वनिक्षेपक यंत्रें होतीं. अनेक पुढारी बोलले. आणि शेवटीं तो महान् नेता उभा राहिला. सर्वत्र निस्सीम शांतता होती. त्या भाषणांत जबरदस्त आत्मविश्वास होता. मालकांच्या डावपेंचांची त्या भाषणांत छाननी होती. कामगार मान डोलवीत व “बरोबर” असें म्हणत. असें तें अपूर्व भाषण चाललें होतें. आणि शेवटीं तो थोर पुढारी म्हणाला, “पगारवाढीचा उग्र लढा जर पुढें करावाच लागला, तर तो शेवटपर्यंत चालवावा लागेल. त्यासाठीं आधींपासून आपली तयारी हवी. फंड हवा. परवां दहा तारखेला पगार होईल. प्रत्येकानें एकेक रुपया संपफंडाला दिला पाहिजे. एक लाख कामगार आहेत. एक लाख फंड जमा झाला पाहिजे. तुम्हांला खरोखरच लढा लढवायचा आहे याची ती निशाणी आहे. मालक मगरूर असला तरी मग विचार करील. दुसरी गोष्ट म्हणजे लाल बावटा युनियनचे सारे सभासद होऊन जा. लढा युनियनमार्फत चालवला जाणार. त्या युनियनची प्रतिष्ठा वाढवा. कामगारांची मान उंच व्हावी म्हणून हें युनियन आहे. येत्या पगाराच्या दिवशीं कमीत कमी २५ हजार फंड व २५ हजार युनियनचे सभासद झाले पाहिजेत.”
सभा बेफाम झाली होती. इन्किलाबचें गाणें होऊन लाल बावटयाच्या जयजयकारांत सभा संपली. ती सभा पाहून कल्याण व विश्वास चकित झाले. कामगारांची शक्ति त्यांच्या निदर्शनाला आली. कामगारांची एकजूट म्हणजे काय प्रभावी चीज आहे तें त्यांनीं आज प्रत्यक्ष डोळयांनीं पाहिलें.
आणि पगाराचा दिवस आला. त्या दिवशीं कामगार स्वयंसेवकांनीं शर्थ केली. सर्वत्र चैतन्य नाचत होतें. हजारों पावत्या फाटत होत्या. चाळीचाळींतून स्वयंसेवक हिंडत होते. कल्याण व विश्वास यांनीं क्षणाची विश्रांति घेतली नाहीं. त्यांची तहानभूक जणूं हरपली होती.
सारे पैसे एकत्र झाले. पावतीबुकें आलीं. २५ हजारांवर फंड जमा झाला. २२ हजारांवर सभासद झाले. सभासद आणखी होत होते. एका दिवसांत हें काम झालें. मुंबई चकित झाली.
दुस-या दिवशीं पुन्हां प्रचंड सभा भरली. उत्साह वाढत होता. तो महान् नेता म्हणाला, “तुमचा निश्चय २५ हजार रुपयांनीं व हजारों युनियनच्या सभासदांनीं मालकांना कळवला आहे. ज्यांनीं अद्याप फंड दिला नसेल, त्यांनीं येथें जवळ असेल तें द्यावें. सभा संपल्यावर या लाल बावटयासमोर असेल तें आणून द्या. आपणांस मारुति, शनि वगैरे देव माहीत नाहीं. समता हीच आमची देवता. हिची उपासना करून प्रस्थापना करणें हेंच आमचें कर्तव्य ! भूतलावर हिचा अवतार झाला, म्हणजे ऐदी व श्रीमंत लोकांच्या सा-या स्वार्थी संघटनांचा सत्यानाश होऊन श्रमणा-यांचे संसार सुखाचे व सोन्याचे होतील. जे कोणी सभासद झाले नसतील, त्यांनी होऊन जावें.”
सभेनंतर खरोखरच खिशांत असेल नसेल तें कामगारांनीं तेथें अर्पण केलें. किती रक्कम जमली ? किती तरी वेळ मोजणें चाललें होतें. हजारांवर रक्कम झाली. त्यांत नोटाहि होत्या. खरोखरच खिशांत होतें तें फेंकलें कीं काय त्यांनीं ? प्राण फेंकायला तयार असणारा कामगार दिडक्या का फेंकणार नाहीं ?
प्रचाराचा असा धुमधडाका सुरू होता. मालकांवर या गोष्टींचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाहीं. सरकार व मालक यांच्यांत वाटाघाटी सुरू झाल्या. सरकारवर जबाबदारी होती. लाख दीड लाख कामगार संपावर जाणें साधी गोष्ट नव्हती. सारा व्यवहार त्यानें बंद होतो. इतर धंद्यांतील कामगारहि मग संपावर जाऊं लागतात. सारें जीवनच जणूं थांबतें. सा-या नाडया आंखडतात. लाख दीड लाख कामगार संपावर गेले व बिथरले तर ? गोळीबार करावा लागतो. सरकारचीहि नाचक्की असते ती. कांहीं तरी पगारवाढ द्यावी असें आंत शिजूं लागलें होतें.
परंतु एकाएकीं कामगार पुढा-यांना गिरफदार करण्यांत येऊं लागलें. तो महान् नेता सर्वांच्या आधीं उचलला गेला. त्यांना जामिनावरहि मोकळें सोडलें नाहीं. अत्याचाराला प्रवृत्त करणारीं भाषणें केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सभा झाली. त्या सभेंत कल्याण व विश्वासहि बोलले. मुंबईच्या सभेंत बोलण्याची त्यांची ती पहिलीच वेळ. परंतु त्यांचीं भाषणें कामगारांना आवउलीं. कारण तीं भाषणें ठरीव सांच्याचीं नव्हतीं. ठरलेल्या पध्दतीची नव्हतीं. त्यांत राणा भीमदेवी आदळआपट नव्हती. त्यांच्या भाषणांत कळकळ होती. एक प्रकारचा अकृत्रिम जिव्हाळा होता. विश्वासने सांगितले, “आपले प्रिय व पूज्य पुढारी गिरफदार होत आहेत याचा अर्थ आपला विजय आहे. आपल्या संघटनेचा हा विजय आहे. निश्चयाचा विजय आहे. पुढारी पकडले गेले तरी जोंपर्यंत त्यांची स्फूर्ति प्रत्येक अनुयायाच्या अंत:करणांतील सिंहासनावर विराजमान होऊन आदेश देत असते, तोपर्यंत भिण्याचं मुळींच कारण नाहीं. पुढारी पकडले जाणे हे स्वाभाविक आहे. कारण संपत्ति आपल्या विलोभन-सामर्थ्याचा प्रयोग करून हरली म्हणजे सत्तेची कांस धरते. संपत्तीला सत्तेचा आश्रय घ्यावा लागला, यांतच आपला विजय आहे. म्हणून भिण्याचं मुळींच कारण नाहीं. आपल्या प्राणाहून प्रिय आणि पूज्य पुढा-यांची प्रेरणा आपणांजवळ आहे. आपण पोलादी एकजूळ करून उभे राहू या. “विश्वासचा आवाज अद्याप बसलेलाच होता. फार वेळ त्याच्यानें बोलवलें नाहीं. कल्याणचे भाषण सुंदरच झालें. तो म्हणाला, “आपल्यांतील पुढारी जसजसे उचलले जातील, तसतसे कामगारांमधूनच पुढारी निर्माण झाले पाहिजेत. तुमच्या चाळीचाळींतून नेते निघाले पाहिजेत. निश्चयी, एकमुखी, एकजुटीचे नेते. आपले पुढारी उचलण्यांत आले. कारण ते प्रचंड निश्चय निर्माण करीत होते. एका दिवसांत २५ हजार फंड जमला. २५ हजार सभासद झाले. ही गोष्ट साधी नव्हती. अभंग निश्चयाची व निर्धाराची ती लाल खूण होती. आपल्या पुढा-यांच्या अटकेचा निषेध करायचा आहे ना ? तो सभेने केवळ न दाखवतां कृतीनं दाखवा. युनियनचे सभासद २५ हजारांचे ५० हजार व्हा. तुरुंगांत तुमच्या पुढा-यांना ही गोष्ट कळली तर ते नाचतील. हातापायांतील बेडयांच्या तालावर ते नाचतील.