Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 113

भाईजी कशासाठी येणार होते ? त्यांना कां बरें बोलावण्यांत आलें ? काय होतें काय ? परंतु त्यांना विश्वासचें पत्र पोंचतांच ते निघाले, ते मुंबईला आले. संध्येला खूप आनंद झाला. तिला भाईजी म्हणजे एक आधार वाटे. कां वाटे तें सांगतां येत नाहीं. तिला त्यांच्याजवळ तिळमात्र संकोच वाटत नसे. ती त्यांच्याजवळ बसे, हंसे, थट्टाहि करी.

“भाईजी, फिरायला येतां ?” विश्वासनें विचारलें.

“चल, कल्याण नाहीं का येत ? “

“त्याला दुसरीकडे जायचं आहे. आपणच जाऊं. मला तुमच्याशीं जरा बोलायचं आहे.”

दोघे फिरायला गेले. वरळीच्या चौपाटीवर ते बसले होते. प्रथम कोणीच बोलेना.

“विश्वास, काय बोलायचं आहे ?”

“नेहमींचींच रडकथा.”

“पैसे का हवे आहेत ?”

“तुमच्याजवळ मागायचे तरी कितीदां ? आणि तुम्ही तरी नेहमीं कुठून आणणार ? देतां आले नाहींत तर तुमच्या मनालाहि त्रास होतो. तुम्ही वाईट वाटून घेतां.”

“विश्वास, मी लक्षाधीश असतों तर !”

“लक्षाधीश असतेत तर आम्हांला कदाचित् तुम्हीं जवळहि केलं नसतंत. भाईजी, आम्ही सदैव पैश्यांच्या अडचणींत असतों. ही रोजचीच रडकथा संपवण्यासाठीं आम्ही एक धाडसी प्रयत्न करणार आहोंत. त्या प्रयोगासाठीं आम्ही एक जुनी मोटर विकत घेणार आहोंत. आमच्याजवळ थोडे पैसे आहेत. तुम्ही चारशें द्या.”

“विश्वास, तुम्ही काय करणार त्याची मला एका क्षणांत कल्पना आली. परंतु माझं तुम्हांला सांगणं आहे कीं, असं कांहीं रोमांचकारी करूं नका. कांहीं तरी आदळआपट करणं बरं नव्हे. कांहीं तरी दिव्य भव्य करावं, साहस करावं, जीवनाचं महाकाव्य करावं, करुण, वीररस निर्मावे, असं तरुणांना वाटतं. मी त्यालाहि नांवं नाहीं ठेवीत. महान् क्रान्तिकारक क्षण येतो, त्या वेळीं सर्वांनीं उठून दिव्य भव्य करावं. परंतु आज का ती वेळ आहे ? आज तयारीचे, संघटनेचे दिवस. होईल तेवढं करा. त्यासाठीं प्राण नका आजच पणाला लावूं. मी तुम्हांला दरमहा दोनशें रुपये देत जाईन. चालेल ?”

“तुमचे दोनशें रुपये कितीसे पुरणार ? आम्हांला मोठा छापखाना काढायचा आहे. वर्तमानपत्र काढायचं आहे. किती तरी योजना, कल्पना आहेत. त्याला लाख रुपये हवेत. तें कांहीं नाहीं. आम्ही करणारच आमचा प्रयोग ! यश आलं तर खूप काम करूं. त्या साहसांत मरण आलं, तरीहि कृतार्थ होऊं. माशा मारीत बसण्यापेक्षां असं मेलेलं काय वाईट ?”

“विश्वास, निराशेमुळं तुम्ही हें करूं पाहात आहांत. जीवनाला तुम्ही कंटाळलां आहांत. आपल्या हातून एकदम कांहीं तरी व्हावं असं तुम्हांला वाटतं. हा अहंकार आहे. तुम्ही खरे क्रान्तिकारकच नाहीं. क्रान्तिकारक असा अधीर होत नाहीं.”

“तुमच्याशीं मला चर्चा करायची नाहीं. वाटेल तें म्हणा. परंतु पैसे द्या. द्याल का ? सांगा.”

“देईन पैसे. परंतु मी देवाची प्रार्थना करीन कीं तुमचा निश्चय बदलो. मी दुबळा आहें. तुला नाहीं म्हणायचं मला धैर्य नाहीं. तुमची निराशा मला बघवत नाहीं. माझं प्रेम तुमच्यावर आहे. परंतु हें प्रेम का मोह ? तुमच्या मोहांत पडून का मी तुम्हांला मदत करणार ? मला कांहीं सांगतां येत नाहीं. माझं जीवन म्हणजे ओढाताण. झगडा. स्वच्छ प्रकाशच नाहीं. ठीक. देईन पैसे. कुठून तरी देतों रक्कम. परंतु विश्वास, माझं तुला सांगणं आहे कीं नको कांहीं असं करूं ? माझ्याबद्दल तुला कांहींच का वाटत नाहीं ? शेवटीं मीच वाटतं तुमच्या इच्छेला सदैव शरण यावं ? एकदांहि तुमच्या मनांत असं कां येत नाहीं, कीं भाईजींची इच्छा प्रमाण.”

 

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180