संध्या 118
“असं विचारतोस कां ? मी का विश्वासघात करीन ? बायकांजवळ खरं सांगूं नये, गुप्त गोष्ट सांगूं नये असं म्हणतात. त्याच सनातनी मताचे तुम्हीहि का ?”
“संध्ये, तूं भिशील, घाबरशील, म्हणून सांगायला मन कचरतं.”
“कल्याण, संध्या भित्री नाहीं.”
“ऐक तर. संध्ये, आम्ही कांहीं मित्र कुठं तरी दूर लौकरच जाणार आहोंत.”
“मला सोडून ?”
“क्रान्तिकारकाला सर्वांना सोडून जावं लागतं. संध्ये, एका मोठया साहसासाठीं मी जाणार आहें. वांचलों तर तुझा. तू निरोप दें.”
“कल्याण, त्या साहसासाठी तूंच का जायला हवं ? ज्यांचीं लग्नं झालीं नसतील, त्यांनीं आधीं जावं; तूं नको जाऊंस.”
“संध्ये, तूं दुस-यांच्या प्राणांवर निखारा ठेवायला तयार आहेस. अग, ज्यांचीं लग्नं झालीं नसतील, ते कोणाचे नवरे नसले तरी कोणाचे भाऊ असतील, कोणा आईबापांचे प्रिय पुत्र असतील, कोणाचे जिवलग स्नेही असतील. जो कोणाचाच नाहीं, जो मेला तर कोणी रडणार नाहीं, असा अभागी या जगांत कोणी असेल का ? स्नेहबंध सर्वांना असतात.”
“कल्याण, रागावूं नकोस.”
“मी रागावलों नाहीं. तूं मला परवानगी दे. सुखरूप आलों तर तुझा. येऊन पुन्हां न पकडला गेलों, न फांशीं दिला गेलों, तर तुझा. या कल्याणवर पाणी सोडायची तयारी करून ठेव.”
“कल्याण, काय हें बोलतोस ?”
“संध्ये, तुला लौकरच बाळ होईल. मी समजा, जगांतून गेलों, तरी तुझ्याजवळ ती करमणूक असेल. त्या बाळाला वाढव. त्याला माझ्या गोष्टी सांग. त्याला क्रान्तिवीर बनव.”
“कल्याण, तें बाळ कोणाला दाखवूं ?”
“सुखरूप मी परत आलों, तर आहेंच बाळाला बघायला; परंतु वेळ आहे, वखत आहे. सर्व गोष्टींसाठीं मनाची तयारी असावी. जाऊं ना मी ?”
“जा, कल्याण. तुझ्या ध्येयापासून मी तुला परावृत्त करणार नाहीं. रजपूत स्त्रिया आपल्या पतींना हंसतमुखानं मरायसाठीं पाठवीत: “जा, लढतां लढतां मरा” असं सांगत; परंतु त्या स्वत:हि मग जोहार करीत. मी काय करूं तें सांग. कल्याण, तुझ्या विरहाची कल्पनाहि मला असह्य होते, आणि तूं सांपडलास तर ? तुझ्या हातून जर कांही बरंवाईट झालं असेल, तर तुलाहि तें भयंकर मरण पत्करावं लागेल. कल्याण, कल्याण, मी काय करूं ? मीहि तुझ्या पाठोपाठ आलें असतें. परंतु पोटांत बाळ वाढत आहे. त्या बाळाला कुठं ठेवूं ? कशाला पोटीं येत आहे तें बाळ ? जन्मदात्याची नि त्याची भेट व्हायची नसेल, तर कशाला तें येत आहे ? कल्याण, मी अभागिनी आहें. परंतु असं कशाला म्हणूं ? तुझ्याशीं माझं जीवन एकजीव झालं आहे. मी भाग्यवान् आहें. कल्याण, जा; तूं क्रान्तीच्या गळयांतील ताईत आहेस. भेटशील का पुन्हां ? तुझं बाळ जन्माला आलं तर काय सांगूं त्याला ?”
“पित्याचं अपुरं राहिलेलं कार्य पुरं करायला सांग. संध्ये, रडूं नकोस. तें कार्य करतांना तुझे अश्रु जर मला आठवले, तर माझ्याकडून नीट काम होणार नाहीं. आमचं कार्य सफल होणार नाहीं. तू आनंदानं मला निरोप देऊन ठेव. आजच मी जात आहें, मरत आहें, असं नाहीं. संध्ये, मनाला लावून घेऊं नकोस. बाळासाठीं तरी आनंदी राहा. आपल्या दोघांची आशा म्हणजे आतां तें बाळ. खरं ना ? संध्ये, तुला हल्लीं काय वाटतं ? तुझी कशावर इच्छा जाते ? सांग मला. तुझा दरिद्री पति शक्य तों तुझी इच्छा पुरवील. सांग, एखादी तरी इच्छा मला सांग. तूं कधींहि कांहीं मागत नाहींस, कधीं कांहीं सांगत नाहींस. आज माझ्याजवळ कांहीं तरी माग, माग.”