Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 136

तिस-या प्रहरीं घराचा मालक आला व म्हणाला :

“हें पाहा कल्याण, उद्यां सकाळीं कदाचित् तुमच्याकडे पोलीस येतील. झडती होईल असं कळतं. मी सूचना देत आहें. तुम्हांला मी कधींचा सांगतों आहें कीं, घर खालीं करा म्हणून. या विश्वासच्या एका मित्राच्या आग्रहानं मीं घर तुम्हांला दिलं. परंतु या अशा इतक्या भानगडी असतील हें नव्हतं मला माहीत. आतां हा सारा तमाशा होणार.”

“परंतु त्यांत तुम्हांला थोडीच तकलीफ आहे ? तुम्हांला कांहीं दंड वगैरे होणार नाहीं. कोणी तुम्हांला तुरुंगात नेणार नाहीं. येतील आमच्या घरीं, पाहतील, जातील.” कल्याण म्हणाला.

“परंतु तुम्ही लौकर दुसरीकडे पाहा बि-हाड.” असें म्हणून मालक गेला.

आणि दुस-या दिवशीं खरेंच उजाडत सहा साडेसहाला पोलीस आले. त्या एकाच वेळीं पुण्याला दहाबारा ठिकाणीं झडत्या झाल्या. कल्याणच्या खोलींत कांहीं सांपडलें नाहीं. सेवादलाच्या घटनेचे कांहीं कागद होते, तेच जप्त करून पंचनामा करून नेण्यांत आले.

कल्याणच्या खोलींत पोलीस होते. खालीं दरवाजावरहि पोलीस होते. वाडयांतील मंडळींना जरा आश्चर्य वाटलें. मालकाचीं मुलें वर येऊं पाहात होतीं, परंतु त्यांना घरीं बसविण्यांत आलें.

“कुठं चाललेत रे वर ? ते पोलीस आले आहेत, दिसत नाहीं का ? खबरदार खोलीच्या बाहेर पडाल तर ? त्यांच्याकडे जात जाऊं नका म्हणून सतरांदा सांगितलं होतं. बसा निमूटपणं ! “मालक मुलांना सांगत होते.

पोलीस गेले तरीहि मालकाचीं मुलें बाहेर आलीं नाहींत. आपल्याशीं यांचा संबंध आहे असें पोलिसाला वाटूं नये म्हणून ही एवढी काळजी ! पोलीस गेल्यानंतर ब-याच वेळानें मालक कल्याणच्या खोलींत आला.

“कांहीं नेलं का हो जप्त करून ?” त्यानें विचारलें.

“हो; पिस्तुलं नेलीं.” संध्या हंसत म्हणाली.

“पिस्तुलं ?” मालक घाबरून विचारता झाला.

“नाहीं हो; एक चिटोरं नेलं त्यांनीं. कांहीं सांपडलं नाहीं.” कल्याण म्हणाला.

“परंतु माझं ऐका, तुम्ही जागा खालीं करा. मी तुमच्या पायां पडतों. हे लढाईचे दिवस आहेत. उगीच नको त्रास. आम्ही कुटुंबवत्सल माणसं. पिस्तुलांची आज थट्टा केलीत. खरींसुध्दां असायचीं तुमच्याजवळ; नाहीं तर एकदम तोच शब्द थट्टेनं का होईना, यांच्या तोंडांतून कसा बाहेर पडला ? कृपा करा बुवा.” मालक दीनवाणेपणानें म्हणूं लागला.

“दोन दिवसांत हें घर खालीं करून देतों; काळजी नका करूं.” विश्वास म्हणाला.

“मी आजच बाहेर पाटी लावतों कीं घर भाडयानं देणं आहे म्हणून.” मालक म्हणाला.

मालक निघून गेला. कल्याण, संध्या, विश्वास, भाईजी सारीं सचिंत बसलीं होतीं.

“कल्याण, चला बाहेर पडूं. घरं शोधायला जाऊं.” विश्वास म्हणाला.

“चला.” कल्याण म्हणाला.

“संध्ये, तुझीं पिस्तुलं बाधलीं.” विश्वास म्हणाला.

“तें एक निमित्त कारण झालं; किती तरी दिवस हा मालक सांगतो आहे कीं घर खालीं करा म्हणून.” संध्या म्हणाली.

“किती भित्रीं हीं माणसं ! दिसतात तर सुशिक्षित.” भाईजी म्हणाले.

“सारं हिंदुस्थानच भित्रं आहे. दीडशें वर्षं गुलामगिरींत राहिल्यानं आत्मा जसा मरून गेला आहे. आपण किडे झालों आहोंत, किडे ! “न आदमी रहे हम मकोडे बने” हें खरं आहे.” विश्वास म्हणाला.

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180