संध्या 33
“खाण्यापिण्याच्या वगैरे कर्मांना भीत नाहीं तो.”
“त्यांनाहि भितो. त्यांचाहि वीट आला आहे. ही देहाची खोळहि आतां मला जड झाली आहे. केव्हां पडेल असं झालं आहे. काकू गेली. नाना गेला. आतां तिसरं कोणी तरी नको का जायला ? पुंडलिक, मी फार दिवस नाहीं हो वाचणार; फुकट खायला फार दिवस नाहीं राहणार. रागावूं नकोस. कर्माला भिणा-या माणसांनीं जगण्यांत अर्थ नाहीं. कर्मवीरांनीं जगावं. कर्मभीरूंनीं मरावं. देवहि त्यांना उगीच कशाला ठेवील ?”
भीमरावांचे शब्द ऐकून सारे दु:खी झाले. संध्येची आई रडूं लागली. पुंडलिकरावांच्या पत्नीला वाटलें कीं दिवे लागतांना कशाला असलीं बोलणीं निघालीं ? शेवटीं कशींबशीं जेवणें झाली. सारे लौकरच सामसूम झालें. परंतु संध्या कोठें आहे ?
“संध्ये” आईनें हांक मारली. संध्या ओ देईना. कोठें गेली पोर ? आई पाहूं लागली. आई बाहेर आली. तों अंगणांत एका बाजूला संध्या उभी होती. तटस्थ होती. जणूं भावमग्न होती.
“संध्ये ?”
“आई, ती बघ आजी. ती बघ मला खूण करते आहे. दिसली तुला ? ती बघ. आई, माझा हात धर. काय पाहिजे आजीला ? काय सांगते ती ? हें काय, आजी रडूं लागली. अरे, हंसली. आजी जवळ आली आई...”
संध्या घाबरली. तिनें आईला घट्ट मिठी मारली. आई संध्येला घेऊन कशीबशी घरांत गेली. तिनें संध्येला निजविले. संध्या घाबरली होती. ती थरथरत होती. तिच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता. आईनें तिचा घाम पुसला. तिला थोपटलें. संध्येला झोंप लागली. तिच्या अंगावर नीट पांघरुण घालून आई गेली.
भीमराव आज पत्नीला म्हणाले, “मी फार दिवस जगणार नाहीं. काय असेल ते असो. तूं मनानं तयार होऊन राहा. जर मला देवाघरीं जावं लागलं, तर तूं मुलं घेऊन निराळी राहा. पुंडलिकाशीं घरांत पटणं कठीण. समजलीस ना ?”
“वेगळं व्हायचंच असेल, तर आतांच व्हा ना. तुम्ही आहांत तोच व्हा ना. आम्हां बायकांना काय कळतं ? जे होऊ नये ते झालं, तर मुलांना घेऊन मी कुठ जाऊं ? बायकांना सारे फसवतात. आणि शहाणीं शहाणीं माणसंहि फसवायला कमी करीत नाहींत.” पत्नी म्हणाली.
“भावाजवळून वेगळं निघायला मला धैर्य नाहीं.”
“तुम्हांला वाईटपणा नको आहे. परंतु पुढं मुलांचं कसं होईल ?”
“देव सर्वांना आहे.”
“गरिबांना कोणी नाहीं.”
“गरिबांजवळ तर तो आधीं असतो.”
“म्हणून गरीब रात्रंदिवस रडतात वाटतं ?”
“तुझी श्रध्दा नाहीं. तुझ्याजवळ बोलण्यांत अर्थ नाही.”