संध्या 128
“संध्ये, या पानावर तर चित्र नाहीं. फक्त इकडे ही एक जाहिरात आहे बालामृताची. आणि ही एक माता आहे; तिच्याजवळ एक मूल आहे. गुटगुटीत मूल. या जाहिरातीशिंवाय दुसरं काय आहे या पानांत ? हें चित्र का तूं पाहात होतीस ? हं, आलं ध्यानांत; हो खरंच संध्ये ?”
“इतका वेळ लागला ना ? आणि म्हणजे मी कविहृदयाचा ! “
“संध्ये, एके काळीं माझ्या जीवनांत काव्य होतं.”
“आतां कां नाहीं ? भाईजी, तुमच्या जीवनांत काव्य नसतं, तर इथं संध्येसाठीं स्वयंपाक करीत नसतेत हो बसलेत. भाईजी, काव्य म्हणजे शेवटीं सहानुभूति असं नाहीं का ?”
“होय; कवीचं हृदय मऊ मेणासारखं असतं. आजूबाजूच्या सुखदु:खांचे ठसे, आजूबाजूच्या परिस्थितीचं प्रतिबिंब त्याच्या हृदयावर पटकन् उठवं. आणि प्रतिभेची सुई लागून तबकडी फिरूं लागते, गाऊं लागते. गीत तयार होतं.”
“भाईजी, हें चित्र मी दिवसांतून शंभर वेळां तरी पाहतें. तुम्ही इतर बातम्या वाचतां, परंतु मी हीच एक बातमी रोज वाचतें. असंच का माझ्या मांडीजवळ बाळ बसेल, असं गुटगुटीत व गुबगुबीत ? किती तरी कल्पना माझ्या मनांत येतात. मला आनंद होतो. मी सारखं हें चित्र पाहतें. भविष्याचं चित्र. संध्याराणीच्या भावी राज्यांतील चित्र.”
“संध्ये, किती तुझं कोवळं मन ! भावनाशील मन.”
“भाईजी, तुमच्याजवळ म्हणून मी हें सारं बोलीतें. हें का हृदयाचं काव्य बोलून दाखवायचं असतं ?”
“नाहीं हो संध्ये. तुझ्या कोमल मधुर भावना, तुझीं स्वप्नं तूं माझ्याजवळ बोलतेस, हें माझं भाग्य.”
“भाईजी, डाळ जळली वाटतं, वास आला.”
“आपण बोलतच बसलां.”
भाईजी चुलीजवळ गेले. स्वयंपाकांत रंगले, दंगले. संध्याराणी पुन्हां अंथरुणावर पडली, तें वर्तमानपत्र तोंडावर घेऊन ती झोंपली. तिला शांत झोंप लागली.
अकराच्या सुमाराला विश्वास व कल्याण परत आले. बाळ आज आपल्या घरीं जेवायला जाणार होता. दोघे मित्र बरेच थकले होते. ते बसलें.
“संध्ये ?” कल्याणनें हांक मारली.
“आलास का ? ये, बस माझ्याजवळ.” ती डोळे उघडून म्हणाली. आणि कल्याण तिच्याजवळ जाऊन बसला.
“मिळाल्या का ऑर्डरी ?” तिनें हंसत विचारलें.
“आज एक चांगलं गि-हाइक भेटलं, संध्ये.”
“मोठी ऑर्डर मिळाली.” विश्वास म्हणाला.
“कितीची रे ?” भाईजींनीं विचारलें.
“असेल पंचवीसाची, “संध्या म्हणाली.