संध्या 132
“भाईजी, आमची सारी फजिती.” विश्वास म्हणाला.
“काय झालं, विश्वास ?” संध्येनें प्रश्न केला.
“ती सव्वाशें रुपयांची ऑर्डर देणारा तो तरुण निघून गेला घरीं.” विश्वास हंसून म्हणाला.
“आणि ऍडव्हान्स ?” संध्येनें विचारलें.
“कसला ऍडव्हान्स ? अग, तो गप्पाडया होता. त्यानं केली आमची थट्टा. तेव्हांच जरा वाटलं कीं, एवढं कापड याला कशाला ?
परंतु वाटलं, हवं असेल. आम्ही आशाळभूत होतों. परंतु चांगलीच फजिती झाली.” कल्याण म्हणाला.
“विश्वास, तुझा पायगुण असा कसा ?” भाईजींनीं विचारलें.
“परंतु कालपासून आजपर्यंत चोवीस तास त्या आनंदांत तर होतों कीं नाहीं ? मोठया ऑर्डरीचा आनंद उपभोगला. पुष्कळ झाला. विश्वास, वाईट नको रे वाटून घेऊं.” संध्या हंसून म्हणाली.
“रंगाचं म्हणणं एकंदरींत खरं ठरलं.” कल्याण म्हणाला.
“कल्याण, उद्यां कुठं जायचं हिंडायला ? कांहीं तरी ऑर्डरी मिळवायला हव्यातच. थोडे पैसे हवेत. हल्लीं आपण भाईजींचे पैसे संपवून राहिलों आहोंत.” विश्वास म्हणाला.
“माझे पैसे म्हणजे तुमचेच, त्याला संकोच कशाला ?” भाईजी म्हणाले.
“कोण करतो संकोच ? नीट जेवत आहोंत. तुम्हांला राबवीत आहोंत. तुम्ही का मागच्या जन्मींचे आमचे देणेकरी आहांत ?” विश्वासनें विचारलें.
“मागचा जन्म तूं मानतोस, विश्वास ?” संध्येनें विचारलें.
“संध्ये, तूं अगदीं मला शब्दांत पकडायला तयारच असतेस.” विश्वास चिडून म्हणाला.
“चिडला, विश्वास चिडला ! “संध्या टाळया वाजवून म्हणाली.
“कल्याण, आपण हें घर बदलायचं ना ?” भाईजींनीं विचारलें.
“काय घाई आहे ?” कल्याण म्हणाला.
“परंतु मालक घाबरला आहे.” संध्या म्हणाली.
“कल्याण, आपण आतां जागा पाहूं ती चांगली पाहूं. जरा मोठी. चार खोल्या तरी हव्यात. एका खोलींत संध्येची खाट, पाळणा.
एका खोलींत स्वयंपाक. छान पाहूं जागा.” विश्वास म्हणाला.
आपण पुढं सारीं एकत्र राहणार. हरणीहि राहायला येणार. अशा सा-या बेतानंच जागा घेऊं. म्हणजे पुन्हां पुन्हां बदलायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उजेड हवा.” कल्याण म्हणाला.
“परंतु भाडं बरंच पडेल; तें कुठून द्यायचं ?” भाईजी म्हणाले.
“भाईजींना उगीच काळजी. रंगाला सहा रुपये मिळतात. कल्याण व विश्वास यांना रोज सव्वाशें दीडशेंच्या ऑर्डरी, म्हणजे रोज दहा रुपये कमिशन पडलं. पैशाची काय चिंता ? कल्याण, चांगला बंगलाच घ्या हवेशीर.” संध्या हंसून म्हणाली.
“संध्ये, थट्टा करतेस आमची, होय ना ?” विश्वास म्हणाला.
“अरे गंमत, आशेवर जगावं, कल्पनेंत रंगावं. मी तरी हल्लीं आशेवर जगायला शिकत आहें. स्वप्नसृष्टींत रमायला शिकत आहें. स्वप्नसृष्टींत ना अडचण, ना आडकाठी. खरं ना भाईजी ?” संध्या म्हणाली.
“सारं जगच आशेवर चाललं आहे. क्रान्तिकारक आज उपासमारी काढतात, हालअपेष्टा काढतात, त्या तरी आशेच्याच जोरावर. भविष्यकालीन भव्य दर्शन त्यांना शक्ति देत असतं. पुढं जी सुंदर, वर्गहीन, अविरोधी समाजरचना त्यांच्या डोळयांसमोर दिसते. तीमुळं ते सारे कष्ट सहन करतात. आशा म्हणजे अमृत; आशा म्हणजे जीवनाचं जीवन.” भाईजी म्हणाले.
“संध्ये, कोणत्या बाजूला जागा घ्यायची ?” कल्याणनें विचारलें.
“तिकडे पर्वतीच्या बाजूला.” ती म्हणाली.
“तिकडे मलेरिया आहे. डांस आहेत. “विश्वास म्हणाला.
“परंतु ढेंकूण नाहींत ना ?” भाईजींनीं विचारलें.