संध्या 1
त्या गांवचें नांव उडगी. भीमेच्या तीरावर तें वसले होतें. गांवची वस्ती चारपांच हजार असेल. त्या गांवांत कर्नाटकी यांचे घर मोठें प्रसिध्द होतें. त्या घरांत तिघे भाऊ एकत्र राहात होते. वडील भाऊ नारायणराव, मधले भीमराव, कनिष्ठ पुंडलिक. नारायणराव मोठे कर्तबगार होते. सारा गांव त्यांना मान देई. सारे भाऊ चांगले लिहिणारे वाचणारे होते; घरीं वर्तमानपत्रें येत, मासिकें येत; चांगली चांगलीं पुस्तकेंहि भरपूर होतीं. एक प्रकारचें सुसंस्कृत वातावरण त्या घरांत होतें.
या त्रिवर्गाचे आईबाप लहानपणींच निवर्तले होते. त्यावेळीं मोठी आणीबाणीची स्थिति होती. घरांत कोणी कर्तें पुरुष माणूस नव्हतें. विधवा चुलती भागीरथीकाकू हीच काय ती घरांत. परंतु तिनें धैर्यानें घर संभाळलें. या मुलांना तिनें वाढविलें. शेतीभाती तिनें पाहिली. आतां मुलें मोठीं झालीं होती. तिघांची लग्नें झाली होती. घरांत तीन सुना वावरत होत्या. त्यांचीं मुलेंबाळें होतीं. घराला भरल्या गोकुळाची शोभा होती. भागीरथीबाईला हें सारें भाग्य पाहून धन्य वाटे. केल्या कष्टाचें चीज झालेले पाहून कृतार्थ वाटे.
भागीरथीकाकूचें नारायणरावांवर विशेष प्रेम होते. जणूं तिला तो स्वत:चा मुलगा वाटे. ती आतां थकली होती. म्हातारी झाली होती. तरीहि स्वयंपाक तीच करी. आपल्या हातची भाजीभाकर नारायणाला मिळावी असें तिला वाटे.
एके दिवशीं नारायणराव तिला म्हणाले, “काकू, तूं आतां म्हातारी झालीस. तूं स्वस्थ कां बसत नाहींस ? विश्रांति कां घेत नाहींस ? घरांत आतां तुझ्या सुना आहेत. त्या करतील सारें काम. त्या करतील स्वयंपाक. तूं कशाला चुलीजवळ बसतेस ? तूं आम्हांला वाढवलंस, लहानाचं मोठं केलंस. आईबापांची आठवण तूं आम्हांला होऊं दिली नाहींस. तळहाताच्या फोडाप्रमाणं तूं आम्हांला जपलंस. काकू, तुझे किती उपकार, किती प्रेम ! किती कष्ट तूं काढलेस. आतां नको हो श्रमूं. तूं आमच्या मुलांना खेळव. त्यांना गोष्टी सांग. रामनाम म्हण. तुझा आशीर्वाद आम्हांला दे. तूं प्रेमानं आमच्याकडे पाहिलंस कीं आम्हांला सारं मिळतं. तूं काम करूं लागलीस, दुपारवेळीं चुलीजवळ बसलीस, म्हणजे मला कसं तरी होतं. नाहीं ना करणार आतां काम, नाहीं ना बसणार चुलीजवळ ?”
“नारायणा, अरे स्वयंपाक केल्यानं मला त्रास का होतो ? वेडा आहेस तूं ! तुम्हांला माझ्या हातचं वाढतांना मला आनंद होत असतो. माझा हा आनंद दूर नको करूं. तूं घरीं नसलास म्हणजे कांही मी नाहीं करीत स्वयंपाक. त्यावेळी माझी विश्रांति असते. परंतु तूं घरीं आलास म्हणजे मीच करीन स्वयंपाक. माझ्या हातच्या भाकरीचा तुला कंटाळा का आला ?”
“काकू, असं काय विचारतेस ? जन्मोजन्मीं तुझ्या हातची भाकर मिळाली तरी कंटाळा येणार नाहीं. अमृताचा का कधीं वीट येतो ? परंतु चुलीजवळ तूं बसलीस म्हणजे मला वाईट वाटतं. जन्मांत थोडी तरी विश्रांति नको का ?”
“नारायण, काम केलेल्या माणसाला विश्रांतिच कंटाळवाणी वाटते. रिकामं बसणं म्हणजे त्याला मरण वाटतं. काम म्हणजेच त्याची विश्रांति. काम म्हणजेच राम. पण तुला वाईट वाटत असेल, तर नाहीं हो मी करणार स्वयंपाक. तुला आनंद वाटो. माझं काय ?”