संध्या 67
“विश्वास, जरा कमी लाव कल्हई. इतकी नको लावायला.” ती मुलगी म्हणाली.
“चांगली लावूं दे. म्हणजे पुन्हां भांडीं द्याल.”
“अरे, बेताची लावावी; म्हणजे लौकर भांडीं पुन्हां द्यावीं लागतील. हें अर्थशास्त्र अद्याप तुला समजून घ्यावं लागेल.”
“हें अर्थशास्त्र तूं शिकव.”
संपलीं भांडीं. कल्याण व विश्वास यांनीं ती नीट पुसून त्या त्या घरीं नेऊन दिलीं. त्यांनीं झाडाखालची घाण दूर केली. त्या मुलीचे आभार मानून दोघे मित्र निघाले. दोघांच्या खांद्यावर पोतीं होतीं. कपडयांना डाग पडले होते. चेहरे दमलेले दिसत होते. परंतु एक प्रकारचा दिव्य आनंद त्यांना झाला होता.
पहिला दिवस तर बरा गेला. दोघे मित्र खोलींत गेले. आंघोळ करून हॉटेलांत जाऊन दोन आण्यांची राइस प्लेट खाऊन आले. कल्याणचें बोट जरा भाजलें होतें. परंतु काळजी करण्यासारखें नव्हतें. सकाळीं ते रोज कोठें तरी कल्हईच्या कामाला जात. रात्रीं अभ्यासमंडळ घेत. इतर काम करीत. दुपारीं वाचीत.
एके दिवशी त्यांना जरा चमत्कारिक अनुभव आला. रोजच्याप्रमाणें दोघे मित्र “कल्हई लावायच्ये का कल्होय्” असें आळीपाळीनें ओरडत जात होते. वाटेंत एक मोठा वाडा होता. विश्वास त्या वाडयांत शिरला. इकडे तिकडे पाहात होता. इतक्यांत मालक तेथें आला.
“कोण रे तूं ? काय पाहिजे ?”
“कांहीं नाहीं. कल्हईला भांडी आहेत का ?”
“कल्हईला भांडीं का घरांत शिरून मागतात ? तूं कोणी तरी भामटया दिसतोस. पोषाख दिसतो आहे स्वच्छ. कल्हई लावणा-यांचा पोषाख असा असतो का रे ? मला शिकवतोस होय ? चल, तुला फरासखान्यांत नेतों. हल्लीं फार सुळसुळाट झालाय् या चोरांचा. चल, नांव काय तुझं ? खरं सांग.”
“अहो, खरंच आम्ही कल्हई लावणारे आहोंत.”
“ही लफंगेगिरी आहे.”
इतक्यांत कल्याण खांद्यावर पोतें वगैरे घेऊन तेथें आला व दारांतच “कल्हई लावायच्ये का कल्होय्” ओरडला.
“तो पाहा माझा मित्र. आम्ही दोघे हा धंदा करतों. कपडे जरा स्वच्छ आहेत. कारण आम्ही विद्यार्थी आहोंत. पोटासाठीं हा धंदा करतों. घरांत शिरलों, चूक झाली. आम्ही अजून अननुभवी आहोंत.”
“जा, पुन्हां अशी चूक करूं नका.”
कल्याण व विश्वास बाहेर पडले. त्यांना आतां हंसूं आवरेना. गंमतच झाली. आज एकंदरींत दुर्दिनच होता. भांडीं मिळालीं नाहींत. हिंडून हिंडून दोघे घरीं आले. खोलींत सचिंत बसले. त्यांना भूक लागली होती. परंतु जवळ कांही नव्हतें. ते तसेच झोंपले. तिस-या प्रहरीं जागे झाले. कोणी बोलेना. खोलीचें भाडेंहि दोन महिन्यांचें थकलें होतें. ते हातांत पुस्तक घेत, परंतु पुन्हां खालीं ठेवीत. विश्वास खोलींत फे-या घालीत होता. मध्येंच खिडकींतून बाहेर पाही. काय चाललें होतें त्याच्या मनांत ?
“कल्याण, माझ्या मनांत एक विचार आला आहे.”
“कशाविषयी ?”
“पोट भरण्याविषयी.”
“आतां कोणता धंदा करायचा ?”
“गंमतीचा.”
“म्हणजे ?”
“माझ्या पूर्वीच्या घराजवळ ओंकारेश्वराचं देऊळ आहे.”
“मग ?”