संध्या 125
भाईजी त्या पुस्तकांचा अनुवाद करूं लागले. पहाटे तोंड वगैरे धुऊन लिहायला बसत. आठ वाजेपर्यंत लिहीत. मग मंडईंत जाऊन भाजी वगैरे घेऊन येत. नवानंतर ते शेगडी पेटवीत. स्वयंपाक करीत. दुपारींहि ते लिहीत. त्यांना खूप आनंद वाटत होता. चेह-यावर तो दिसत होता. भाईजींच्या वृत्ति पटकन् प्रकट होत असत. लपवालपवी त्यांच्याजवळ नसे. त्यांना ती साधतहि नसे.
“भाईजी, हल्लीं तुमचं तोंड फुललेलं दिसतं.” संध्या म्हणाली.
“होय. हल्लीं माझा प्रत्येक क्षण कामांत जात आहे. ज्या दिवशीं मला वेळाचा हिशेब देतां येतो, त्या दिवशीं संध्ये, मी अत्यंत आनंदी असतों. त्या दिवशीं मी अधिक जेवतों. जेवण्यांत त्या दिवशीं रस वाटतो, चव वाटते.”
त्यांचें असें बोलणें चाललें होतें, इतक्यांत पोस्टमननें कांहीं तरी लठ्ठ टाकलें व तो गेला.
“काय आहे ग, संध्ये ?”
“ही ती एजन्सी आली. हे फॉर्म वगैरे आहेत.”
“कसली एजन्सी ?”
“लुधियाना येथील कापडाची. हे कापडाचे नमुने आहेत. त्यांना ऑर्डरी मिळवून द्यायच्या. आपणांला कमिशन मिळतं. कल्याणनं त्यांच्याशीं पत्रव्यवहार चालवला होता. आतां तो आला कीं एजन्ट होईल. बरं होईल.”
“हें कापड खपतं वाटतं ?”
“हो. मागं कल्याणच्या एका मित्राला ब-याच ऑर्डरी मिळत. तो मित्र दुसरीकडे गेला, म्हणून कल्याणनं अर्ज केला होता. चांगलं झालं. परंतु कल्याण कधीं येईल, भाईजी ? त्याचं पत्रहि नाहीं.”
“येईल हो संध्ये, चिंता नको करूं.”
“तुम्हांला खरंच का वाटतं, कीं ते येतील सारे ?”
“हो, वाटतं.”
आणि एके दिवशीं रात्रीं खरेच ते सारे आले. संध्या, रंगा, विश्वास, भाईजी सारीं झोंपलेलीं होतीं आणि दरवाजावर विश्वास, विश्वास अशा हांका ऐकूं आल्या. संध्या एकदम जागी झाली.
“विश्वास, रंगा, जा रे दार उघडा; कल्याण आला, जा.”
विश्वास व रंगा उठले. रंगा धांवतच गेला. त्यानें दरवाजा उघडला. कल्याण, बाळ वगैरे सारे आले. खोलींत आले. संध्या एकदम कल्याणजवळ गेली. त्यानें तिच्या पाठीवर थोपटलें. संध्येनें त्याच्या खांद्यावर मान ठेवली. तिला बोलवत नव्हतें. तिचें हृदय भरून आलें होतें.
“संध्ये, चल, तुझ्या अंथरुणावर बसूं.”
थोडा वेळ सारे मित्र बसले. सारे थकलेले होते. लौकरच सारे अंथरुणें पसरून झोंपी गेले. संध्येला झोंप लागेपर्यंत कल्याण तिच्याजवळ बसला होता. तिला झोंप लागल्यावर तोहि एका सतरंजीवर एक चादर पांघरून झोंपीं गेला.