संध्या 139
“संध्ये, तें कृष्णाच्या मुरलीचं कानडी गाणं म्हण ना. त्यांतील अर्थ समजला नाहीं तरी तें गोड वाटतं.” भाईजी म्हणाले. संध्येनें तें अट्टुकट्टु गाणें म्हटलें. विश्वास हंसूं लागला.
“विश्वास, हंसतोस काय ?” भाईजी म्हणाले.
“या द्राविडी भाषा म्हणजे तारायंत्री भाषा आहेत.” विश्वास म्हणाला.
“तारायंत्री म्हणजे ?” रंगानें विचारलें.
“कडकट्ट कडकट्ट सारखं चालत असतं. या भाषांतून टकारांतील अक्षरं जास्त. ट ड ण यांची रेलचेल; ढ नाहीं मात्र फारसे आढळत; ळहि पुष्कळ असतात.” विश्वास म्हणाला.
“परंतु द्राविडी भाषेंतीलच आंध्र भाषा; ती भाषा जगांतील सर्व भाषांहून अधिक गोड आहे असं प्रख्यात भाषापंडित मॅक्स्मुल्लर म्हणत असत.” भाईजी म्हणाले.
“घंटाचं संगीत आहे या भाषांतून. शंकराच्या देवळांतील घंटा घण्घण् एकदम वाजाव्यात, तशा ह्या भाषा.” विश्वासचें तुणतुणें सुरूच होतें.
“मात्र, द्राविडी भाषा अधिक नादमय व संगीतमय आहेत. तामीळ भाषेंतील गाणीं ऐकतांना अंगावर रोमांच येतात. तीं गाणीं स्वस्थ बसून ऐकवतच नाहींत; अर्थ कळला नाहीं तरी तीं गाणीं ऐकून नाचावं असं वाटतं. त्रिचनापल्लींच्या तुरुंगांत असतांना आम्हांला हा अनुभव येत असे.” भाईजी म्हणाले.
“भाईजी नेहमी दुस-यांचं चांगलं म्हणतील.” विश्वास म्हणाला.
“भाईजी खरं तें बोलतील.” संध्या म्हणाली.
“तूं त्यांची बाजू घेशीलच; तुझी चूल ते सांभाळतात, उद्यां मूलहि म्हणशील हो त्यांना सांभाळा म्हणून.”
“तेच पाळण्यांत घालतील बाळ. पाळण्याची दोरी प्रथम तेच लांबवतील. “हंस रे माझ्या मुला” गाणं म्हणतील. आमचं सारं प्लॅनिंग ठरलेलं आहे. नाहीं का, भाईजी ?” संध्येनें हंसून विचारलें.
“संध्ये, आतां झोंपूं. मला जांभया येऊं लागल्या. माझे डोळे मिटूं लागले. नाहीं तर तुम्ही बसा बोलत.” कल्याण म्हणाला.
“सारींच झोंपूं.” संध्याहि म्हणाली.
सर्व मंडळी झोंपली. विश्वासला झोंप नव्हती. हरिणीच्या परीक्षेच्या निकालाची त्याला चिंता होती. त्या निकालावर किती तरी गोष्टी अवलंबून होत्या. त्याचें हरिणीशीं होणारें लग्न, हरिणीला मिळणारी नोकरी, सा-या गोष्टी त्या परीक्षेच्या निकालावर होत्या. तो बाहेरच्या गॅलरींत फे-या घालीत होता.
“विश्वास, नीज आतां; हरिणी होईल पास” भाईजी म्हणाले.
“भाईजी, आमच्या लग्नाला तुम्ही थांबा हां.” विश्वास म्हणाला.
“थांबेन हो, विश्वास. परंतु तुम्हांला मी काय देऊं ? विश्वास, तुझ्याविषयीं मला किती वाटतं. परंतु काय आहे माझ्याजवळ ? तुझ्या लग्नांत द्यायला मजजवळ कांहीं नाहीं, कांहीं नाहीं.”