संध्या 161
“भाईजींचं काय मत ?”
“ते आमच्या पक्षाचे थोडेच आहेत !”
“मग त्यांचा कोण पक्ष ?”
“ते स्वत:ला गांधीवादी म्हणवतात. ते काँग्रेसचे एकनिष्ठ उपासक आहेत. ते म्हणतात कीं, “मला काँग्रेसची आशा आहे. गरिबांची, श्रमणा-यांची बाजू अधिक उत्कटपणं काँग्रेस घेतल्याशिवाय राहणार नाहीं.” त्यांची श्रध्दा आमच्याजवळ नाहीं.”
“ते काय करणार आहेत ?”
“त्यांनीं काँग्रेसच्या वैयक्तिक सत्याग्रहासाठीं सत्याग्रही म्हणून नांव नोंदवून ठेवलं आहे. जर त्यांचं नांव पसंत झालं, तर ते सत्याग्रह करतील.”
“होईल का त्यांचं नांव पसंत ?”
“कदाचित् होईल. मीं त्यांना पुष्कळ सांगितलं, कीं तुम्ही सुंदर पत्रकं लिहून द्या. आम्ही तीं छापून वांटूं. तुमचीं पत्रकं शेतकरी वाचतील. तुम्ही सोपं व हृदयस्पर्शी लिहाल. त्यांत पांडित्य नसलं, शास्त्रीयता नसली, तरी सहृदयता व उत्कटता असेल. श्रमणा-या जनतेला चेतावणी असेल. त्यांचीं हृदयं तुमची लेखणी पेटवूं शकेल. कां जातां तुरुंगांत ? पण ते ऐकतना. मी त्यांच्याशीं भांडलों, रागावलों. मला वाटलं होतं कीं भाईजी वश होतील. मला आजपर्यंत अहंकार होता, कीं भाईजींनीं इतर कोणाचं न ऐकलं, तरी ते माझं ऐकतील. परंतु माझा अहंकार शेवटीं गळला. भाईजी कांहीं केवळ परशरण नाहींत. कांहीं बाबतींत ते कोणाचंहि ऐकणार नाहींत असं दिसून आलं. मला वाईट वाटलं. परंतु भाईजींबद्दलचा आदरहि वाढला. पूर्वी मला त्यांच्याविषयीं प्रेम वाटे; परंतु तितका आदर नसे वाटत. वाटे, कीं भाईजी असे कसे मवाळ, मृदु प्रकृतीचे. परंतु त्यांच्यांतहि कणखरपणा आहे. केवळ गुलाम ते नाहींत. ते लौकरच आतां जातील व त्यांचं नांव येतांच ते सत्याग्रह करतील.”
“परंतु नांव येईपर्यंत ते काय करणार ?”
“ते म्हणाले मी गावांगांव प्रचार करीत जाईन. हातांत घेईन एक झाडू, खांद्यावर तिरंगी झेंडा, खिशांत कांहीं औषधं, असा हिंडत राहीन. गांव झाडावा, कोणी आजारी असला तर औषध द्यावं, रात्रीं सभा घ्यावी. पुन्हां दुसरा गांव. तोंडानं स्वातंत्र्याचीं गाणीं म्हणत जावं. प्रचाराचीं गाणीं. असा त्यांचा कार्यक्रम आहे.”
“आणि तूं काय करणार ? कल्याण काय करणार ?”
“आम्ही भाईजींबरोबर हिंडून शेतक-यांत संबंध जोडणार होतों. ठिकठिकाणीं गट बांधणार होतों. परंतु भाईजींची आतां आशा नाहीं. तेव्हां आम्ही दोघेच हिंडूं. पायींच हिंडत जाऊं.”
“आणि संध्या ?”
“संध्या व तूं एकत्र राहाल व आम्हांलाहि थोडी मदत कराल असं वाटत होतं. परंतु आतां काय ? तुला नोकरी नाहींच मिळत.”
“विश्वास, मी शिकवणी करीन. एक मुलगी मला विचारीत होती.”
“परंतु ती एक शिकवणी कितीशी पुरणार ? संध्या जर माहेरीं गेली व तूंहि तुझ्या घरीं आईकडे राहिलीस व शिकवणी केलीस, तर आहे थोडी आशा. त्या शिकवणीचे पैसे तूं आम्हांला देऊं शकशील. परंतु संध्या आईकडे राहणार नाहीं.”
“आणि मीहि माझ्या आईकडे नाहीं राहणार. मी आतां स्वतंत्रच राहीन. तुम्ही गेलेत तर शिकवणी करीन, एकदां जेवेन. परंतु आईकडे नाहीं राहणार. इतके दिवस आईकडे राहण्यांत संकोच वाटत नसे. परंतु आतां तिथं राहायला संकोच वाटेल. एकदम परकेपणा जणूं वाटतो.”
“हरणे, तूंहि नाहीं तर तुरुंगांत चल. गांवोगांव लढयाचीं गीतं गात जा. जावं खेडयांत, द्यावी दवंडी, करावी सभा, म्हणावीं गाणीं. काय हरकत आहे ? कॉलेजांत शिकून आणखी काय होणार ? नोकरी मिळाली असती, तर तीच करणार होतीस ना ? मला तर असंच वाटतं. संध्याहि जर बरी झाली, तर तूं व संध्या दोघी निघा प्रचाराला.”