संध्या 156
“कल्याण, माझ्या ट्रंकेंत देव होता. तो फेंकला नाहींस ना ?”
“संध्ये, नाहीं हो, फेंकला. ठेव तुझा देव. ज्ञानविज्ञानाचा स्वच्छ असा दिवा तुला मिळाला, म्हणजे मग ह्या देवाचा भ्रामक दिवा तूं हातीं धरणार नाहींस.”
“परंतु भाईजी म्हणत कीं, “ज्ञानविज्ञानाचा दिवा तरी कुठं सर्व प्रश्नांवर प्रकाश पाडतो ? असे राजयोगी आहेत, कीं जे इच्छेनं एकदम गुलाबाचीं फुलं निर्माण करतात. वाटेल ती वस्तु निर्मितात. विवेकानंदांनीं अशा सत्यकथा दिल्या आहेत. जर या सत्यकथा असतील, तर सारा तुमचा मार्क्सवाद थंडावतो, कोलमडतो,” असं भाईजी सांगत.”
“परंतु आज दहा हजार वर्ष मानवजात मरत आहे. असे कोणी राजयोगी दुनियेची उपासमार कां थांबवीत नाहींत ? इतके का दुष्ट आहेत ते ? लाखों लोक दुष्काळांत मेले, यांनीं धान्याचीं पोती कां निर्माण केलीं नाहींत ? त्यांच्याजवळची ही सिध्दि जर सर्व जनतेच्या कामीं येत नसेल, तर ती काय कामाची ? आणि अशीं फुलं कां होतात, पेढे कसे निघतात, यावरहि शास्त्र उद्यां प्रकाश पाडील. तेवढयानं कांहीं देव म्हणून कोणी आहे असं सिध्द होत नाहीं. ज्याच्या नांवानं रडावं, ज्याला प्रार्थना करावी, असा कोणी दयामय, प्रेममय प्रभु आहे असं नाहीं सिध्द होत. लहानपणीं आईबाप असावेत असं मुलाला वाटतं. त्याप्रमाणं मानवजातीच्या बाल्यावस्थेंत असा कोणी तरी जगाचा मायबाप असेल असं वाटतं व त्या विचारानं एक प्रकारचं संरक्षण वाटतं, समाधान वाटतं. परंतु वाढतीं मुलं शेवटीं आईबापांचं बंधन झुगारतात, त्याप्रमाणं मानवसमाजहि ही देवाची अडगळ, ही मानीव अडगळ एक दिवस दूर करील.”
“कल्याण, अजून कोटयवधि लोक देव मानतात. अद्याप मानवजात का बाल्यावस्थेंतच आहे ?”
“हो, बाल्यावस्थेंतच आहे. माणसं लहान मुलांप्रमाणंच एकमेकांजवळ पदोपदीं भांडत आहेत, एकमेकांना बोचकारीत आहेत. समाजवाद सर्वत्र नीट स्थापन झाला, म्हणजे मानवसमाज बाल्यांतून प्रौढ दशेला आला असं म्हणूं. मग सर्वांची नीट वाढ होऊं लागेल. सर्वांचा विकास होऊं लागेल. संध्ये, काय हें मी बोलत बसलों ?”
“बोल रे. तूं माझ्याजवळ अशा गोष्टी कधींसुध्दां बोलत नाहींस. परंतु भाईजी बोलत असत. परंतु म्हणायचे, “संध्ये, मला नाहीं हें सारं कळत. कल्याण, विश्वास, बाळ यांना अधिक माहिती आहे.” कल्याण, मी घरीं आलें म्हणजे अशीं आपण बोलत बसूं. आज तुला माझ्याविषयीं अपार सहानुभूति वाटत आहे म्हणून तूं बोलत बसलास, खरं ना ?”
“तसं नाहीं, संध्ये; सहज निघाल्या गोष्टी; बोललों; मुद्दाम ठरवून का बोलायचं असतं ? सहज बोलणंचालणं निघतं, तें मौजेचं असतं. त्यांत एक प्रकारचा मधुर आनंद असतो. अकपट, सात्त्वि आनंद. संध्यें, जातों आतां मी.”
“जा, भाईजी वाट पाहात असतील. मी अजून सध्यां इथं एकटी आहें म्हणून बरं. नाहीं तर इतरांना आपल्या बोलण्याचा त्रास झाला असता.”
“आपण हळूहळूच बोलत होतों.”
“तरी कल्याण, तुमचं तें हळू बोलणं. भाई लोकांचं हळू बोलणं ! तुम्हांला “हळू” शब्द माहीत नाहीं.”
“जातों हं, संध्ये.”
कल्याण गेला. आज संध्येला खूप आनंद झाला होता. ती एकदम उठली व तेथें जरा हिंडूं लागली. बाहेर गॅलरींत येऊन
कल्याणकडे पाहात होती. सायकलवरून कल्याण जात होता. कल्याणला काय माहीत, कीं संध्याराणी गॅलरींत येऊन त्याच्याकडे पाहात होती !