संध्या 31
शेवटीं ते दोन्ही देह उचलण्यांत आले. सारी क्रिया झाली. तो दिवस गेला. दुसरे दिवस चालले. काळ थोडाच थांबतो ! परंतु आतां कर्नाटकींच्या घरांत आनंद नव्हता. सारा आनंद आजी जणूं घेऊन गेली. सर्वांना हंसविणारी, खेळविणारी, धीर देणारी, पवित्र पावन वृध्द काकू निघून गेली. घरांतील कारभार आतां पुंडलिक पाही. भीमराव मूळचेच विरक्त. ते अधिकच उदासीन झाले. ते एकदां जेवू लागले. सायंकाळीं जेवत नसत. भीमेच्या तीरावर जाऊन या भंगुर संसाराचा विचार करीत. एखादे वेळेस ते अलीकडे बरोबर संध्येला घेऊन जात.
त्या दिवशीं अशीच दोघे भीमातटाकीं बसलीं होतीं. भीमराव म्हणाले,
“संध्ये, तूं आजीची आवडती होतीस”
“होय बाबा, आजीनं मला किती तरी शिकवलं. किती तरी दिलं. आजी देवमाणूस होती. बाबा, काकांवर आजीचं किती प्रेम ! सख्ख्या आईचंहि मुलांवर इतकं प्रेम नसेल. काकांच्या मागं आजीला क्षणभरहि राहवलं नाहीं.”
“असं प्रेम या दुनियेंत दुर्मिळ असतं. प्रेमाची ही पराकाष्ठा. आपण प्रेम प्रेम म्हणून बोलतो. परंतु त्या प्रेमासाठीं स्वत:ला शून्य कोण करील ! प्रिय व्यक्तीच्या जीवनांत स्वत:ला कोण मिसळेल ? प्रेमासाठीं प्राण कोण देईल ?”
“माझा कल्याण देईल. तो म्हणतो, मी देशासाठीं मरेन. त्याचं देशावर खरं प्रेम आहे. नाहीं, बाबा ?”
“संध्या, हा कोण कल्याण आहे जो तुला इतका आवडतो ?”
“कल्याण कोणाला आवडणार नाहीं ?”
“संध्ये, तुझं आतां लग्न करायला हवं.”
“नको बाबा. आजी गेली नाहीं तों लग्नाच्या गोष्टी काय करतां ?”
“संध्ये, मीहि लौकरच जाईन. मलाही लौकरच बोलावण येईल.”
“असं कां म्हणतां, बाबा ?”
“मनाला आंतून वाटतं खर; संध्ये, तुझ लग्न पाहायला मी नसेन. परंतु जप हो. नीट राहा. तुझा संसार सुखाचा होवो.”
“बाबा, आज गंगा शांत दिसत आहे, नाहीं ? आणि तिचं पाणी लालसर झालं आहे. सूर्याचे रंग तिच्यांत मिसळले आहेत.”
“संध्ये, दुस-याच्या जीवनाचा रंग तुझ्या जीवनाच्या नदींत असाच मिसळेल. तुझं जीवन शांत सुंदर दिसेल; रंगित, तरंगित, रमणीय दिसेल. संध्ये, मलाही देवाकडचं लौकरच बोलावण आलं तर ? तर सावध राहा. सारीं समाधानानं राहा. कदाचित् तुम्हांला वेगळं राहावं लागेल. आनंद माना. संध्ये, तूं कांहीं आतां अगदीं लहान नाहींस. मुलींना लौकर समजतं. तुझ्याजवळ मी बोलत आहें अशा गोष्टी मुलांजवळ बोलायच्या नसतात. परंतु संध्या आतां लहान मूल नाहीं. संध्या देवता आहे. संध्ये, तुझे लहान वय, परंतु किती तुला समज, कसं तुझं बोलणं ! देव तुला सुखी ठेवो. तुला अनुरूप पति देवो. ज्याला माझी संध्या मिळेल, त्याचं जीवन धन्य होईल. ये, जवळ बैस माझ्या.”
संध्या पित्याजवळ बसली. भीमरावांनीं प्रेमानें तिच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमा शांतपणें वाहत होती. खळखळ नाहीं, कांही नाहीं. भीमेचें पात्र तेथे गंभीर होतें. पिता व पुत्रीहि गंभीर होतीं. जीवनाच्या व मरणाच्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या.
“संध्ये, पाहा हे भीमेचं पात्र. इथं खळखळ नाहीं. कारण इथं पात्र उथळ नसून खेल आहे. तूंहि उथळ नको होऊंस. धीरगंभीर हो. तुझ्या हृदयाचा डोह अथांग असू दें. तिथं अनंत पाणी असूं दे. ती पाहा संध्याकाळची शोभा. संध्याकाळची वेळ जरा गंभीरच असते. तुझं नांव संध्या. प्रात:संध्या सूर्याला जन्म देते. सायंसंध्या अनंत तारकांना जन्म देते. दोन्ही संध्या पवित्र, गंभीर व गूढ. अनंताचं दर्शन घडवणा-या. संध्ये, तूं अशीच हो. मर्यादित संसारांत राहून अमर्याद हो. बंधनांत राहून बंधनातीत हो. संसारांत राहून संन्यासिनी हो. या लहानशा देहांत राहून विश्वाला मिठी मारायला शीक. संध्ये, तुझ्याकडे पाहून कधीं मला फार वाईट वाटतं, तर कधीं अपार आनंद होतो. कां तें कळत नाहीं.”
“पिता शांत राहिला. संध्या मुकेपणानें तें प्रवचन ऐकत होती. आजपर्यंत भीमराव तिच्याजवळ असे कधींहि बोलले नव्हते आणि आज अशा खोल गोष्टी बोलत होते. दोघें स्तब्ध होतीं. आता अंधार होऊं लागला.
“संध्ये, चल घरीं. काळोख होईल.”