संध्या 23
“मुलींच्या प्रभातफेरींत हरिणी पुढं असते. ती भित्री नाहीं. ती हातीं झेंडा धरते, गाणीं सांगते.”
“तिचे वडील तिचं फार कौतुक करतात. मी जर झेंडा लावला नाहीं, तर ती उद्या हंसेल. तिचे वडील मला भित्रा म्हणतील. मी लावणारच झेंडा. काय व्हायच असेल तें होवो.”
कल्याण काहीं बोलेना. त्याचे लक्ष एकदम कोठें तरी गेलें. त्याचे डोळे चमकले. विश्वास त्याच्याकडे पाहात राहिला.
“कल्याण, काय रे झालं ? काय आठवलं ? असा एकदम गंभीर कां झालास ?”
“एक आठवण आली.”
“सुखाची कीं दु:खाची ?”
“एका माणसाची. हरिणी प्रभातफेरी काढते. त्याप्रमाणं आणखीहि एक मुलगी काढीत असेल.”
“कुठल्या पेठेंत ?”
“तिकडे लांब ! “
“तुझ्या गांवी ?”
“माझ्या गांवाजवळच्या उडगी गावी. “
“काय त्या मुलीचं नांव ?”
“संध्या.”
“किती सुंदर नाव ! “
“तिला मी लिहीन कीं प्रभातफेरी काढ. झेंडा हातीं घे. गाणी गा. तीहि निर्भय मुलगी आहे. हरिणीपेक्षा ती थोडी मोठी आहे. खेडयातील मुलगी. परंतु मोठी हुशार; कशी बोलते, कशी हसते.”
“कल्याण, हिंदुस्थानांतील मुलीहि निर्भय होऊ लागल्या. आणि आपण मुलांनी का भीत बसायच ? तिकडे कुठसा एका आठ वर्षांच्या मुलीनं लाठीमार सहन केला म्हणतात. आणि शाळेंत मार बसला तर काय करायचं याची आपण चर्चा करीत बसलो आहोत ! तें काहीं नाहीं. मी लावणारच झेंडा. पुण्यांतील विद्यार्थी का भित्रे ? पुण्याच नांव जातां कामा नये. कल्याण, मी जातों. ठरल ह.”
दोघे मित्र गेले. कल्याण व विश्वास याची अभेद्य मैत्री जमली होती. त्यांची मैत्री कशी जमली त्याचा इतिहास मोठा करुणगंभीर आहे. एके दिवशीं ओंकारेश्वराच्या घाटावर विश्वास बसला होता. लहान चौदापंधरा वर्षांचा तो मुलगा. तो त्या दिवशीं अति खिन्न होता. एकाएकीं त्याचे डोळे भरून आले व तो रडूं लागला. मोठा हुंदका आला. त्याने कष्टानें तें पाणी आवरलें व घाबरून सभोंवतीं पाहिलें. तो त्याला तेथें एक तरुण दिसला. तो तरुण त्याच्याकडे सहानुभूतीनें पाहात होता. त्या दृष्टीने विश्वासच्या हृदयाला स्पर्श केला.
“मला रडतांना तुम्ही पाहिलंत ? माझे अश्रु पाहिलेत ?”
“हो.”
“कां पाहिलेत माझे अश्रु ? दुस-याच दु:ख पाहू नये.”
“तें जर कोणी न पाहील, तर ते दूर तरी कस करता येईल ? तुम्ही कां बरं रडत होतेत ? मला सांगा. मलासुध्दां मधून मधून रडू येत.”
“तुम्हीसुध्दा रडतां ?”
“एखाद वेळ.”
“का बरं ?”