संध्या 85
आणि तो क्षण आला. संध्येच्या नांवाचा पुकारा झाला. जेलची ती दिंडी उघडली गेली. संध्या आंत गेली. भेटीच्या जागीं आली. तेथे खुर्चीवर कल्याण बसला होता. तो उठला. संध्येनें हात पुढें केले. त्यानें ते हातीं घेतले. संध्या खुर्चीवर बसली. दोघांचे हात कांहीं वेळ हातांत होते. पुढें दूर झाले. कोणी बोलतना. एकमेकांकडे दोघें बघत होतीं. डोळयांनी बोलत होतीं. तोंडावरील आविर्भावांनीं बोलत होतीं. पुन्हा संध्येचा हात कल्याणनें हातांत घेतला. कल्याण हात कृश झाला होता. कल्याण वाळला होता.
“कल्याण !” शेवटीं वाचा फुटली. संध्येनें हांक मारली.
“बरा आहें आतां मी. आतां झपाटयानं सुधारेन. काळजी नको करुंस. इथले अधिकारी माझ्या परिचयाचे आहेत. या जेलमध्यें मी पूर्वी होतों. त्यामुळं बरं आहे. त्रास नाहीं. तूं काळजी नको करूं.”
“तूं बाहेर कधीं येशील ?”
“अद्याप चार महिने आहेत.”
“म्हणजे १२० दिवस.”
“सेकंद केलेस तर किती होतील ?”
“कल्याण, तुझ्याशिवाय एकेक क्षण म्हणजे युगासारखा वाटतो. किती रे दिवस दूर राहूं ?”
“परंतु मी तुझ्याजवळ आहें.”
“हें रे कसलं समाधान ? अन्नाच्या दुरून दर्शनानं का पुष्टि मिळते ?”
“परंतु फोनोचं गाणं जरा दुरूनच मधुर लागतं.”
“फार दूर असूं तर ऐकायलाहि येणार नाहीं.”
“संध्ये, आमचं सतीणं वाण आहे.”
“कल्याण, हीं फळं तुला देऊं ?”
“परवानगी विचारली पाहिजे.”
संध्येनें जेलरसाहेबांना विचारलें. आजा-यासाठीं ठेवा असें तिनें विनविलें. संमति मिळाली.
“कल्याण, एक मोसंबं माझ्या हातांनीं सोलून देऊं ?”
“दे.”
संध्या मोसंबें सोलीत होती. बोलणें चालू होतें. विश्वास, हरिणी, बाळ, लक्ष्मण सर्वांची माहिती तिनें दिली. बाहेरची इतरहि हकीकत तिनें सांगितली. मोसंब्याच्या फोडी कल्याणनें मटकावल्या. विश्वासच्या आजारीपणाची हकीकत ऐकून कल्याण सचिंत झाला.
“कल्याण, तूं सुटलास म्हणजे लग्न कर. म्हणजे तुमची सर्वांची जेवणाची ददात जाईल. तुझ्या मित्रमंडळाची मी स्वयंपाकीण बनेन.”
“संध्ये, स्वयंपाकाला तरी कांहीं पाहिजे ना ? स्वयंपाक शब्दांचा थोडाच होत असतो ?”