प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 87
आपली संस्कृती म्हणजे युरोपचे अनुकरण करणे होऊ नये, त्याविषयी आपण युरोपवर विशेष अवलंबून राहू नये अशी सावध राहण्याची सूचना इमर्सनने शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेला केली होती. इमर्सनचे म्हणणे असे की, अमेरिका म्हणजे काही वेगळ्याच नव्या लोकांचा देश असल्यामुळे त्यांनी युरोपमधील आपल्या भूतकालाकडे अधिक पाहात राहू नये, आपल्या नव्या देशातील विपुल जीवनातून त्यांनी नवी स्फूर्ती घ्यावी. ''आपला परावलंबित्वाचा काळ, इतर देशांपासून ज्ञान मिळविण्याचे आपले फारा वर्षांचे शिष्यत्व आता संपत आले आहे. जीवनात घुसत असलेल्या आपल्या भोवतालच्या लाखो लोकांना, परकीयांनी त्यांच्या देशात वाढवून गोळा करून स्वत: उपभोगून शिल्लक राहिलेल्या शुष्क उरल्यासुरल्यावर सतत जगविणे शक्य नाही. या आपल्या देशातच असे काही प्रसंग नवे येतात, असे काही नवे कार्य निघते की त्यांचे गुणगान अवश्य झाले पाहिजे, त्यांचे स्वयंस्फूर्त महत्त्व आपोआप कळते... काही रीती, कृती, शब्द, असे आहेत की, त्यातून नवे निर्माण होते... आणि या रीती, कृती, शब्द यांचा उगम पाहू जाता ते जुन्या रूढीमुळे किंवा जुन्या शास्त्रवचनांच्या आधारे प्रचलित झालेले नसून योग्य व चांगले असेल ते जाणण्याची जी मनाची अंत:प्रवृत्ती तिच्यातून अंत:स्फूर्तीने त्यांचा प्रचार झाल्याचे आढळते.'' तसेच त्याने 'स्वावलंबन' नावाच्या निबंधात म्हटले आहे, ''इटली, इंग्लंड, इजिप्त, हे देश देवासारखे पूज्य मानून यात्रा करण्याच्या वृत्तीने तेथे प्रवास करण्याचे जे खूळ अद्यापही सर्व सुशिक्षित अमेरिकन लोकांत पसरलेले आहे त्याचे कारण त्यांच्यात स्वसंस्कृतीचा अभाव आहे. इंग्लंड, इटली किंवा ग्रीस या देशांना लोकांच्या कल्पनेत जे पूज्यस्थान प्राप्त झाले ते ज्यांच्या कर्तृत्वाने मिळाले. त्यांनी पृथ्वीच्या अक्षाप्रमाणे स्वत:च्या ठायीच स्थिर राहून आपले कार्य केले आहे. आपली पौरुषवृत्ती असेल तेव्हा आपल्याला कळत असते की, आपले योग्य स्थान कर्तव्यक्षेत्रातच. आत्मवृत्ती म्हणजे प्रवासवृत्ती मुळीच नाही, सुज्ञ असेल तो नेहमी स्वत:च्या ठायीच वर्तत असतो आणि आवश्यक म्हणून किंवा कर्तव्य म्हणून त्याला प्रसंगी आपल्या घराबाहेर किंवा परकीय क्षेत्रात जावे लागले तर कोठेही गेला तरी त्याची वृत्ती घरी असल्यासारखी आत्मसंतुष्टच असते. त्याच्या मुद्रेवरचा भाव पाहून लोकांना असे वाटले पाहिजे की, ज्ञानाचा व नीतीचा हा जाईल तेथे प्रचार होईल, हा एखाद्या नगराला किंवा व्यक्तीला भेट देईल तर ती सार्वभौमाच्या वृत्तीने देईल, आपण कोणी एक आगंतुक आहोत किंवा आपल्याला कोणाची सेवा केली पाहिजे या वृत्तीने नव्हे.''
इमर्सन पुढे म्हणतो, ''मनुष्यात आत्मसंतुष्ट वृत्ती स्थिर झालेली असली व आपल्याजवळ आहे त्याहून अधिक मोठे असे काही अन्यत्र सापडेल या आशेवर तो बाहेर देशात जात नसला, तर कला, ज्ञानप्राप्ती किंवा परोपकार याकरिता कोणी पृथ्वीपर्यटन करू म्हटले तरी त्याला उगीच काहीतरी क्षुद्र वृत्तीने विरोध करण्याचा माझा उद्देश नाही. नुसत्या करमणुकीकरिता म्हणून किंवा प्रवासाला आपल्याबरोबर नेले त्याहून काही वेगळे मिळावे म्हणून जो कोणी प्रवास करतो तो स्वत:पासून दूरदूर जात असतो, आणि स्वत: तरुण असूनही जुन्यापुराण्या गोष्टीत त्याला वार्धक्य येते. तो थीब्स् किंवा पामिरा येथे असला म्हणजे त्याची स्वत:ची इच्छाशक्ती, त्याचे मन, तेथल्या त्या जुन्या जीर्ण अवशेषासारखेच जुने, जीर्ण होऊन जाते. तो त्या भंगलेल्या अवशेषाकडे जातो तो स्वत:बरोबर भंगलेले अवशेष घेऊनच.
''पण प्रवास करण्याचे ज्याला त्याला लागलेले हे वेड आपल्या सर्वच बौध्दिक क्रिया दूषित करणार्या दुसर्या एका अधिकच खोल रुजलेल्या मनोविकृतीचे लक्षण आहे.... आपण इतरांचे नुसते अनुकरण करीत असतो... आपली घरे परदेशातील लोकांच्या धर्तीवर आपण बांधीत सुटतो, व त्या घरातील कपाटे परदेशी कलाकुसरीने सजवतो. आपली मते, आपली अभिरुची, आपल्या बुध्दीची अंगोपांगी, यांना आपण सर्वस्वी आधार घेतो तो भूतकाळात केव्हातरी, दूरदेशी कधीतरी जे होऊन घडून गेले त्याचा आणि त्या आधारावरच आपण त्यांचे अनुकरण करीत राहतो. जगात ठिकठिकाणी कला उत्कर्ष पावली. तिची निर्मिती एकाच सर्वव्यापी आत्मतत्त्वाने केली. कलावंताने कलेकरिता मूळ प्रतिमेचा शोध चालविला तो स्वत:च्या अंतर्यामी. आपल्याला काय करावयाचे आहे व त्याकरिता काय सांभाळले पाहिजे, काय केले पाहिजे याचा त्यांनी स्वत: विचार चालवला... स्वत्वाचा आग्रह धरा, परकीयांची नुसती नक्कल कधीही करू नका. तुम्ही स्वत: जन्मभर सतत कष्ट करीत राहिला तर त्यामुळे जे तुम्हाला प्राप्त झाले त्याचे तुमच्या त्या शक्तिसर्वस्वासह स्वत:चे तुमचे असे दान तुम्ही लोकांना केव्हावी करू शकता; पण इतरांपासून तूम्ही अकलेची उचल केलेली असली तर तुम्ही स्वत: विचार करून ती मिळवलेली नसल्यामुळे तिच्यात तुमचे स्वत:चे असे फार तर आयत्या वेळी निम्मे काय ते येते.''