प्रकरण ५ : युगायुगांतून 59
यित्सिंग स्वत: उत्तम संस्कृत पंडित होता. संस्कृत भाषेची स्तुती करून तो म्हणतो की उत्तरेकडे, दक्षिणेकडे अनेक दूरच्या देशांतही संस्कृत भाषेला मान आहे. तो लिहितो, ''दिव्य भूमीतील चिनी लोकांनी, आणि दिव्य ज्ञानाचे माहेरघर जो आर्यदेश—त्यातील लोकांनी संस्कृत भाषेचे खरे नियम अधिकाधिक शिकविण्याचे काम सुरू ठेवावे; भाषेचे खरे नियम सर्वांना नीट कळतील असे करण्याची कितीतरी जरुरी आहे.''*
चीन देशात त्या वेळेस संस्कृतचा अभ्यास पुष्कळच होत असावा असे वाटते. चिनी भाषेत संस्कृत वर्णविचार नेण्याची काही चिनी विद्वानांनी खटपट केली होती. टँग राजवटीच्या सुमारास शौवेन म्हणून एक भिक्षू होऊन गेला, तो असे प्रयत्न करणार्यांपैकी एक होता. चिनी भाषेत अक्षरवर्णमाला करण्याचा त्याने उद्योग चालविला होता.
हिंदुस्थानात बौध्दधर्माला अवकळा आल्यावर हिंदुस्थान आणि चीन यांच्यामधील पांडित्याचा सांस्कृतिक व्यापार जवळजवळ थांबला. मधूनमधून हिंदुस्थानातील बौध्द धर्माची पवित्र तीर्थे पाहण्याला काही चिनी यात्रेकरू येत असत, परंतु अकराव्या शतकात आणि नंतर हिंदुस्थानात राजकीय प्रक्षोभ होऊ लागले, तेव्हा शेकडो बौध्दभिक्षू हस्तलिखित ग्रंथांची गाठोडी घेऊन नेपाळात गेले, आणि हिमालय ओलांडून ते पुढे तिबेटात गेले. जुन्या हिंदी वाङ्मयाचा बराचसा भाग अशा रीतीने तिबेटात आणि चीनमध्ये गेला, आणि अलीकडे संशोधकांना ते वाङ्मय काही मूळ स्वरूपात, तर काही भाषांतरित असे उपलब्ध झाले आहे. कितीतरी प्राचीन हिंदी ग्रंथ-केवळ बौध्दधर्माचेच नव्हेत तर ब्राह्मण धर्माचेही, तसेच ज्योतिष, गणित, आयुर्वेद इत्यादी विषयांवरचे-चिनी, तिबेटी भाषांत भाषांतरित रूपाने अद्याप टिकले आहेत. चीनमधील 'सुंग-पाओ' ग्रंथालयात असे जवळजवळ आठ हजार ग्रंथ आहेत, आणि तिबेट तर भरलेला आहे. हिंदी, चिनी आणि तिबेटी विद्वानांमध्ये बरेच सहकार्य होते. या सहकार्याचे एक उदाहरण म्हणजे बौध्दधर्मातील पारिभाषिक संज्ञांचा एक 'संस्कृत-तिबेटी-चिनी' कोश अद्याप उपलब्ध आहे. नवव्या किंवा दहाव्या शतकातील हा कोश असावा. या कोशाचे 'महाव्युत्पत्ती' असे नाव आहे.
चीनमधील छापलेले जे अत्यंत प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांत संस्कृत पुस्तके आहेत. ती इसवी सनाच्या आठव्या शतकापासूनची सापडतात. लाकडी ठशावर हे ग्रंथ छापले जात. दहाव्या शतकात चीनमध्ये सरकारी मुद्रण समिती संघटित केली गेली, आणि मग -----------------
* हे उतारे जे. ताकाकुसू यांनी केलेल्या यित्सिंगच्या ग्रंथाच्या भाषांतरातील आहेत. 'हिंदुस्थान व मलाया येथील बौध्दधर्माचे आचारात दिसलेले स्वरूप; त्याचा इतिहास. (ऑक्सफर्ड : १८९६)