प्रकरण ६ : नवीन समस्या 7
हरून-अल्-रशीदचे वजीर बरमॅक कुटुंबातले होते. ते घराणे वजनदार असून हिंदी विद्या व शास्त्रे यांच्या अभ्यासाला त्यांनी पुष्कळ प्रोत्साहन दिले. बरमॅक कुटुंब हे मूळचे बौध्दधर्मी होते आणि मागून इस्लामी झाले असे म्हणतात. हरून-अल्-रशीद आजारी पडला आणि हिंदुस्थानातून माणक नावाच्या वैद्याला बोलावण्यात आले. माणक बगदादचाच पुढे नागरिक होऊन राहिला व एका मोठ्या रुग्णालयाचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली. माणकशिवाय बगदादमध्ये राहणार्या आणखी सहा भिषग्वरांची नावे अरबी लेखकांनी दिली आहेत. ज्योतिषशास्त्रात हिंदी व अलेक्झांड्रिया येथील ज्योतिषापेक्षा अरबांनी अधिक वाढ केली. नवव्या शतकात अल्-ख्वारिसमी नावाचा मोठा ज्योर्तिविद् आणि गणिती होऊन गेला; बाराव्या शतकातील जगद्विख्यात कवी उमर खय्याम हाही मोठा गणिती व ज्योतिषी होता. वैद्यकात अरबी वैद्य व शस्त्रक्रिया करणारे सार्या आशिया व युरोपखंडभर विख्यात झाले. बुखारा येथील अबिसेना किंवा इब्नसिना याला वैद्यराज म्हणण्यात येई. इ.स. १०३७ मध्ये तो मरण पावला. अबू नस्त्र फराबी हाही एक अतिथोर अरब विचारवंत व तत्त्वज्ञानी होऊन गेला.
तत्त्वज्ञानात भारतीय विचारांचा परिणाम फारसा झालेला दिसत नाही. विज्ञान व तत्त्वज्ञान यासाठी अरबांचे ग्रीकांकडे लक्ष अधिक होते. अलेक्झांड्रिया येथील परंपरेकडेही होते. अरबी मनोबुध्दीवर प्लेटो आणि त्याच्याहीपेक्षा विशेषत: अरिस्टॉटल यांचा खूपच परिणाम झाला. इस्लामी शाळा-महाशाळांतून मूळच्या ग्रीक ग्रंथांपेक्षा त्यांच्यावरील अरबी भाषेतील भाष्ये, महाभाष्ये यांचा अद्यापही अभ्यास केला जातो. अलेक्झांड्रिया येथील नवप्लेटोवादाचाही परिणाम अरबांवर झाला. ग्रीक तत्त्वज्ञानातील भौतिक व जडवादी संप्रदायही अरबांकडे आला व भौतिकवाद, बुध्दिप्रामाण्यवाद यांचा उदय झाला. बुध्दिवादी लोकधर्मातील तत्त्वांची व आज्ञांची भौतिकरीत्या छाननी करू लागले; स्वत:च्या बुध्दीने त्यातील अर्थ विवरू लागले. भौतिक व जडवाद्यांनी धर्मच जवळ जवळ झुगारून दिला. आश्चर्य वाटते ते याचे की तत्कालीन बगदादमध्ये या सर्व परस्परविरोधी विचारसरणींच्या चर्चेला पूर्ण मोकळीक होती. धर्मश्रध्दा व बुध्दी यांच्यातील हा संघर्ष, हा झगडा बगदादपासून इतरत्रही सर्व अरब दुनियेभर पसरून स्पेनलाही तो पोचला. ईश्वराच्या स्वरूपाची चर्चा होऊ लागली, जे गुण सामान्यत: त्याला लावण्यात येतात ते लावता येणार नाहीत असे सांगण्यात येऊ लागले. कारण हे गुण मानवी आहेत. ईश्वर दयाळू आहे, न्यायी आहे असे म्हणणे म्हणजे ईश्वराला दाढी आहे असे म्हणण्याप्रमाणेच अधार्मिक आणि रानटी आहे असेही सुचविले गेले.
बुध्दिप्रामाण्यवादातून अज्ञेयवाद आणि संशयवाद बळावले. परंतु पुढे बगदादचे वैभव अस्ताला जाऊ लागले; तुर्की सत्ता उदयाला आली आणि बौध्दिक जिज्ञासेची, संशोधनाची ही वृत्तीही कमी होत गेली. परंतु अरबी स्पेनमध्ये ती जिज्ञासा अजून जिवंत राहिली होती. आणि अरबी तत्त्वज्ञानातील अतिविख्यात असा जो अॅव्हेरॉस ऊर्फ इब्न रश्द बाराव्या शतकात होऊन गेला तो, जवळजवळ पाखंडी बनला. आपल्या काळातील नाना धर्मांविषयी तो एकदा म्हणाला की, ह्या धर्मात जे सांगितले आहे ते पोरासोरांकरता किंवा खुळ्या भोळसट लोकांकरता सांगितले आहे. इतरांनी त्याचे आज्ञापालन करणे शक्य नाही. खरोखर इब्न रश्द याने असे शब्द उच्चारले की न उच्चारले हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी हा तत्त्वज्ञानी कशा प्रकारचा होता ही गोष्ट तरी या दंतकथेवरून, परंपरागत गोष्टीवरून दिसून येते. स्वत:च्या मतासाठी त्याला छळ सोसावा लागला. कितीतरी बाबतीत तो एक असामान्य पुरुष होता. स्त्रियांना सार्वजनिक जीवनात भाग घ्यायला पूर्ण मोकळीक असावी असे विचार त्याने मांडले आहेत. स्त्रिया आपले काम योग्य बजावतील अशीही त्याने ग्वाही दिली आहे. ज्यांचे रोग दु:साध्य आहेत अशी माणसे नाहीशी करावीत, समाजावर उगीच त्यांचा बोजा असतो असेही त्याने सुचविले होते.