प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 55
बुध्दाची शिकवण
हिंदुस्थानचे स्वरूप बदलून टाकणारे हे जे राजकीय व आर्थिक क्रांतिकारक फेरबदल होत होते, त्यांच्या पाठीमागे बौध्द धर्माने उडवलेली खळबळ, जुन्या मुरलेल्या संप्रदायावर केलेले आघात, व धर्मात मिरासदारी सांगणार्या वर्गाशी चालविलेली भांडणे या घटनेची पार्श्वभूमी सुरूच होती. हिंदूस्थानाला चर्चा आणि वादविवाद यांची फार गोडी आहे. परंतु या शाब्दिक चर्चेपेक्षा जनतेच्या मनावर एका सामर्थ्यसंपन्न, देदीप्यमान विभूतीच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली होती व त्याची स्मृती अद्याप जनतेच्या मनात ताजी होती. त्याचा संदेश जुनाच असला तरी आध्यात्मिक सूक्ष्म चर्चा करण्यात रंगलेल्यांना तो अगदी नवीन, अगदी वेगळा वाटून बुध्दिमंतांच्या कल्पनाशक्तीची त्याने पकड घेतली व जनतेच्या मनोभूमीत हा संदेश खोल शिरला. बुध्द आपल्या शिष्यांना म्हणाले होते, ''सर्व देशांतून जा आणि या धर्माचा प्रचार करा, त्यांना सांगा की राव आणि रंक, उच्च आणि नीच, सारे समान आहेत, एक आहेत; समुद्राच्या सगळ्या नद्या जाऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व जाती या धर्मात एक होतात. हा धर्म सर्व जातींचे ऐक्य-स्थान आहे.'' बुध्दाचा संदेश विश्वव्यापक प्रेमाचा, विश्वकल्याणाचा होता. ते म्हणतात, ''या जगात द्वेषाने द्वेष कधी शमत नसतो, प्रेमानेच द्वेषाचा उपशम होतो.'' ते असेही म्हणाले, ''अक्रोधाने क्रोध जिंका, भलेपणाने दुष्टाला जिंका. ते ध्येय आत्मसंयमाचे, सदाचाराचे होते. युध्दात हजारोंना तुम्ही जिंकून घ्याल; परंतु जो स्वत:ला जिंकतो, त्याचा विजय खरा.'' ''मनुष्य ब्राह्मण किंवा चांडाळ जन्माने होत नाही, स्वत:च्या कृतीनेच होत असतो. पाप्याचाही तिरस्कार करु नये, कारण ज्यांनी पाप केले त्यांना जाणूनबुजून कठोर कोण बोलेल ? कारण तसे करणे म्हणजे त्यांच्या अपराधाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.'' ''दुसर्यावर आपण जय मिळवतो, परंतु त्याचे दुष्परिणामच होतात. तुमच्या विजयातून द्वेष जन्मतो; कारण पराभूत झालेला असंतुष्ट असतो.''
बुध्द हा सारा उपदेश करीत. त्यात धर्माचा धाक किंवा परमेश्वर आणि परलोकाचा उल्लेख नसे. बुध्दी, तर्क आणि स्वानुभव यांचा आधार घ्या असे त्यांचे म्हणणे होते, व तुम्ही स्वत:च्या मनात सत्य शोधा असे ते लोकांना सांगत. ते एकदा असे म्हणाले, ''माझ्याविषयीच्या आदरबुध्दीने माझे म्हणणे स्वीकारु नका; सोने आगीत घालून पारखतात त्याप्रमाणे माझ्या सांगण्याची परीक्षा घ्या.'' जगात सर्व दु:खांचे कारण अज्ञात हे आहे; ईश्वर आहे किंवा नाही, परब्रह्म आहे किंवा नाही, याविषयी बुध्द काही सांगत नाहीत; आहे म्हणत नाहीत, नाही म्हणत नाहीत. ज्याचे ज्ञान शक्य नाही, तो प्रश्न निर्णय न करता तसाच राहू द्यावा असे त्यांचे मत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ''परब्रह्म म्हणजे ज्ञात वस्तूशी संबंध दाखवून वर्णन करता येण्याजोगे जे नाही तसे काहीतरी अगम्य असा अर्थ असेल, तर ज्ञात प्रमाणांनी त्या निरुपाधिक परब्रह्माचे आस्तित्व सिध्द होणे शक्य नाही. ज्ञात वस्तूंशी असंबध्द असे काही आहे, अशा गूढ तत्त्वाचे अस्तित्व आहे, हे ज्ञान आपल्याला व्हावे तरी कसे ? हे सारे विश्व म्हणजे परस्पर संबध्द असे आहे; अनेक संबंधांची साखळी म्हणजे हे विश्व; असंबध्द असणारे, ज्याचा कशाशीच संबंध नाही असे काही असल्यास ते आपल्याला कळत नाही व कळणे शक्य नाही. म्हणून ज्याच्याविषयी आपणास निश्चित ज्ञान असू शकेल, ज्याची आपण नीट कल्पना करु शकू तेवढ्यावरच आपण थांबले पाहिजे.''
तसेच आत्म्याच्या अस्तित्वाविषयीही बुध्द स्पष्टपणे काही सांगत नाहीत. नकार नाही, होकारही नाही. त्या प्रश्नाची चर्चासुध्दा करावयाला बुध्दांची तयारी नाही हे फार चमत्कारिक वाटते. कारण त्या काळात जीवात्मा आणि परमात्मा, अद्वैत, एकेश्वरीवाद आणि इतर आध्यात्मिक सिध्दांत यांनी भारतीय बौध्दिक वातावरण भरुन गेलेले होते. त्यांनी मुद्दाम निग्रहाने सर्व आध्यात्मिक काथ्याकुट्याकडे पाठ फिरवली. परंतु शाश्वत, कार्यकारणात्मक सृष्टीचा काही एक अभंग कायदा आहे, व त्याअन्वये प्रत्येक वेगवेगळ्या स्थितीला कारण त्यापूर्वीची परिस्थिती असते, सद्गुण व सुख, दुर्गण व दु:ख यांच्या जोड्या मुळापासूनच ठरलेल्या आहेत असे ते मानीत.