प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 19
आजसुध्दा- आजच्या धनयुगातही संतांना मान देण्याच्या परंपरेचा प्रभाव कायम आहे आणि त्यामुळेच ब्राह्मण नसलेले गांधी आज हिंदुस्थानचे अद्वितीय नेते होऊन अधिकाराची सत्ता किंवा पैशाचा जोर जवळ नसतानाही कोट्यवधी लोकांची हृदये हलवू शकतात. विचार करून करून ठरविलेले किंवा अंत:स्फूर्तीने ठरलेले कोणते ध्येय राष्ट्रापुढे आहे ते समजून घ्यावयाला, ते राष्ट्र कोणत्या प्रकारच्या पुढार्याला मानते ते पाहावे, या कसोटीपेक्षा जास्त चांगली कसोटीच नाही.
हिंदी संस्कृतीतील मध्यवर्ती कल्पना, या हिंदी-आर्य संस्कृतीतील प्राणमय कल्पना धर्म ही आहे. इंग्रजीतील धर्मवाचक शब्दाने प्रतीत होणार्या अर्थापेक्षा ह्या धर्म शब्दात निराळा अर्थ आहे. धर्म म्हणजे एखादा संप्रदाय किंवा पंथ अशा अर्थाने येथे तो शब्द योजलेला नाही. हिंदी संस्कृती धर्ममय आहे, धर्म ही तिची केन्द्री कल्पना आहे असे जेव्हा म्हणण्यात येते तेव्हा येथील धर्म या शब्दाचा अर्थ ॠणे असा आहे. स्वत:संबंधी व राष्ट्रासंबंधी सर्व ॠणे फेडणे ही कल्पना येथे आहे. हा धर्म व्यापक ॠताचाच एक भाग असे. ॠत म्हणजे विश्व आणि विश्वांतर्गत सारे वस्तुजात यांच्या कर्माचे नियमन करणारे सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ नीतितत्व. या विश्वात जर काही एक व्यवस्था असेल तर मनुष्याने त्या व्यवस्थेतील आपले स्थान नीट ओळखले पाहिजे, त्या व्यवस्थेशी अविरोधाने वागले पाहिजे; स्वत:च्या जीवनाचा विश्वातील व्यवस्थेशी मेळ राखला पाहिजे. जर मनुष्य आपले कर्तव्य करील, आणि आपल्या सर्व व्यवहारात नैतिक दृष्ट्या बरोबर वागेल तर त्याचा योग्य तो परिणाम होणारच अशी धर्माची आधारभूत कल्पना होती. हिंदी संस्कृतीत हक्क ही वस्तू नाही, हक्कावर असा भर नाही. प्राचीन काळी सर्वत्रच ही दृष्टी दिसते, परंतु अर्वाचीन काळ म्हणजे हक्कांचे युग आहे. प्राचीन काळ आणि अर्वाचीन काळ यांच्यातील हा महत्त्वाचा फरक आहे की आजच्या काळात सर्वत्र व्यक्तींचे हक्क, समूहांचे हक्क, राष्ट्रांचे हक्क अशा विविध हक्कांवर भर आहे.