प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 23
अनियंत्रित मध्यवर्ती सत्ता डोक्यावर असताना लोकशाही प्रांतिक सरकारांची स्थिती किती चमत्कारिक होते याचे काही विरोधदर्शक मासले दृष्टोत्पत्तीस आले. राष्ट्रसभेची सरकारे नागरिक-स्वातंत्र्यरक्षणासाठी जागरूक असत, दक्ष असत. प्रांतिक गुप्त हेरांच्या दूरवर पसरणार्या हालचालींना त्यांनी आळा घातला. हेरखात्याचे मुख्य काम राजकीय कार्यकर्त्यांच्या मागोमाग जात राहणे, सरकारविरोधी समजल्या जाणार्या लोकांवर नजर ठेवणे हेच असे. परंतु प्रांतिक हेरखात्यावर आम्ही नियंत्रण घातल्यावर मध्यवर्ती हेर खाते अधिकच जोमाने कार्य करू लागले. आमचे पत्रे तपासली जात एवढेच नव्हे तर मंत्र्यांचा पत्रव्यवहारही कधीकधी फोडून पाहिला जाई. अर्थात हे सारे गुपचूप होत असे. त्याची कबुली कधीही देण्यात आली नाही. गेल्या पंचवीस वर्षांत हिंदुस्थानात किंवा बाहेर असे एकही पत्र मला लिहिल्याचे आठवत नाही की, जे पोस्टात टाकताना वाचले जाईल, त्याची नक्कल केली जाईल असे मला कधी वाटले नाही, व पत्र लिहिताना पत्रे तपासणारा सरकारी गुप्त हेर सदैव डोळ्यासमोर असे. तसेच टेलिफोनवरून बोलतानाही माझे संभाषण मधेच दुसरा कोणीतरी पकडीत याचीही स्मृती मला नेहमी असे. मला येणारी पत्रेही सरकारी तपासनिसाकडून येत, याचा अर्थ असा नाही की अगदी पत्रनपत्र तपासले जाई, कधीकधी असे होई; कधी निवडक पत्रे तपासली जात. युध्द नसतानाही ही परिस्थिती, युध्दकाळात तर दुहेरी तपासणी असे.
सुदैवे करून आमचा सगळा मोकळा कारभार होता. आमच्या राजकीय चळवळीत लपवून ठेवण्यासारखे काही नसे. तरीही आपली पत्रे कोणी फोडील, आपले भाषण कोणी ऐकेल, आपल्यावर कोणाची पाळत आहे असा विचार सारखा मनात येणे ही काही सुखासमाधानाची गोष्ट नाही. अशा गोष्टींची चीड येते; एक प्रकारचा तो जुलूम वाटतो, बोजा वाटतो. वैयक्तिक संबंधातही अडचणी येतात. मनाप्रमाणे सारे लिहिता येत नाही. कारण पाठीमागून सरकारी हेर पाहात आहे ही भावना सारखी मनात असते.
मंत्र्यांनी अपरंपार काम केले. कामाचा इतका ताण पडला की, कित्येकांची प्रकृतीही ढासळली. त्यांच्या तोंडावरचा तजेला, ताजेपणा निघून गेला. ते म्हातार्यांसारखे, अगदी थकून गेलेले असे दिसू लागले; परंतु ध्येयोत्कटतेमुळे ते अविश्रांत काम करीत राहिले. त्यांनी आपल्या सनदी चिटणिसांनाही भरपूर काम करायला लावले. अंधार पडल्यावरही त्यांच्या कचेर्यातून दिवे दिसत असत. १९३९ च्या नोव्हेंबरच्या आरंभी राष्ट्रसभेच्या मंत्र्यांनी जेव्हा राजिनामे दिले, तेव्हा अनेकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. सरकारी बड्या कचेर्या पुन्हा नियमितपणे चार वाजताच बंद होऊ लागल्या. पुन्हा पूर्वीची नबाबशाही सुरू झाली. ते आपल्या आरामशीर प्रशस्त खोल्यांतून शांतपणे पडून राहू लागले. आता जनता तेथे येऊ शकत नसे. कारण कोण त्यांना येऊ देणार ? पुन्हा पूर्ववत जमाना सुरू झाला. आस्ते कदम काम सुरू झाले आणि तिसरे प्रहरी पोलो, टेनिस, ब्रिज वगैरे खेळायला, क्लबातील आनंद उपभोगायला मोकळीक झाली. जणू एक दुष्ट स्वप्न संपले असे त्यांना वाटले आणि जुन्या जमान्यातल्याप्रमाणे उद्योग, खेळ पुन्हा चालू करायला प्रत्यवाय नव्हता. महायुध्द सुरू झाले होते ही गोष्ट खरी. परंतु अद्याप ते तिकडे दूर होते. हिटलरी फौजांनी पोलंडचा फडशा पाडला होता. येथील गोर्या अंमलदारांना ती लढाई अजून खरी वाटत नव्हती. जणू काल्पनिकच होती. त्यांना थोडाच चटका लागणार होता ! सैनिक आपले कर्तव्य करीत होते, लढत होते, धारातीर्थी पडत होते. परंतु येथेही कर्तव्य करायला हवे होते. हिंदुस्थानचा बोजा, गोर्या लोकांना वाटणारे हे ओझे धीरगंभीरपणे, प्रतिष्ठापूर्वक आणि शोभेलशा रीतीने उचलावयाचे कर्तव्य त्यांना पार पाडायचे होते.