प्रकरण ६ : नवीन समस्या 52
शत्रूच्या सैन्याची सारी बातमी असे. परंतु ब्रिटिश काय करीत आहेत किंवा काय करणार याची त्यांच्या शत्रूंना मुळीच माहिती नसे. ब्रिटिशांचा पंचमस्तंभ अविरत काम करीत असे आणि आणीबाणीच्या वेळी, लढाई रंगात आली असता, ब्रिटिशांच्या बाजूने लढण्यासाठी आमच्यातील लोक जात, किंवा लढाई सोडूनच देत. काहीतरी असले प्रकार होत आणि ब्रिटिशांचे चांगले फावे. प्रत्यक्ष लढाई सुरू होण्यापूर्वीच बहुतेक लढाया ब्रिटिशांनी जिंकलेल्या असत. प्लासीच्या लढाईच्या वेळेस हेच झाले. आणि हा प्रकार शीख युध्दापर्यंत सारखा सुरू होता. ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्याच लष्करातील एक गोष्ट प्रसिध्द आहे. एका बड्या अंमलदाराने ब्रिटिशांशी आधीच गुप्त करार केला होता आणि लढाईच्या ऐनवेळी तो सेनेसह ब्रिटिशांना जाऊन मिळाला. या फितुरीसाठी शिंद्यांच्याच प्रदेशातील काही भाग देऊन त्याला एक नवीन संस्थानिक बनविण्यात आले. ते संस्थान अद्यापही आहे. त्या माणसाचे नाव फितुरी आणि राष्ट्रद्रोह यांची खूण म्हणून अलीकडच्या काळात किस्लिंगचे नाव ज्याप्रमाणे झाले आहे तद्वतच झाले आहे.
ब्रिटिशांची राजकीय व लष्करी संघटना वरच्या दर्जाची होती. त्यांचे पुढारी कर्तबगार होते, कुशल होते, त्यांच्यात सुसंबध्दता होती. शत्रूला माहिती नसे पण त्यांना सारी असे व हिंदी राजेरजवाड्यांत ज्या स्पर्धा होत्या, जी भांडणे होती, त्याचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला. समुद्रावर अजिंक्य असल्यामुळे त्यांना सुरक्षित पुरवठ्याच्या जागा होत्या व साधनसामग्री वाढवायलाही त्यामुळे सोपे जाई. तात्पुरते पराभूत झाले तरी थोडा काळ गप्प बसून साधनसामग्री पुन्हा तयार होऊन ते चढाई करून येत. प्लासीच्या लढाईमुळे बंगाल त्यांना मिळाला. तेथील अलोट संपत्ती आणि साधनसामग्री यांच्या जोरावर मराठ्यांशी व इतरांशी ते लढू शकले; आणि प्रत्येक नवीन विजयाबरोबर त्यांची साधनसंपत्ती वाढतच होती. हिंदी राजेरजवाड्यांचा पराजय होणे म्हणजे तो सर्वनाश असे. त्यांना मग तरणोपाय नसे.
युध्दे, स्वार्या, लुटालूट यांमुळे मध्य हिंदुस्थान आणि रजपुतान्याचा काही भाग, तसेच दक्षिण व पश्चिम हिंदुस्थानातील काही टापू निर्नायक झाला व सारे अराजक माजून अत्याचार, दु:ख, दैन्य यांनी हे प्रदेश रंजीस आले. मोठमोठ्या फौजा कूच करीत जात, त्यांच्या पाठोपाठ डाकू, दरोडेखोर येत. तेथे राहणार्या दु:खी, कष्टी जनतेचा कोणी विचारच करीत नसे. त्यांना लुटावे, त्यांच्याजवळ असेलनसेल ते न्यावे, या पलीकडे त्या प्रजेची काही वास्तपुस्त कोणी करीत नव्हते. मध्य युरोपची त्रिंशतवार्षिक युध्दामुळे जी स्थिती झाली होती, तीच हिंदुस्थानची झाली. सर्वत्रच दुर्दशा झाली होती. परंतु ब्रिटिशांच्या ताब्यातील किंवा अधिसत्तेखालील प्रदेशात अधिकच हलाखी होती. कल्पनातीत अशी हालअपेष्टा होती. एडवर्ड थॉम्प्सन लिहितो, ''हैदराबाद, औध या मांडलिक संस्थानांतील स्थिती किंवा मद्रासची स्थिती केवळ शहारे आणणारी होती. कल्पनातीत अशी हालअपेष्टा होती. याच्या उलट ज्या प्रदेशावर नाना राज्य करीत होता (नाना फडणवीस-मराठा मुत्सद्दी) तेथे, या आसपासच्या रूक्ष वाळवंटात आसर्याची हिरवळ व पाणी यामुळे सौम्य सुख लागे.''