प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 2
अलीकडील हिंदी इतिहास—म्हणजे ब्रिटिश आमदानीचा इतिहास—हा आजच्या, रोजच्या घडामोडींशी इतका संबध्द आहे की, त्या इतिहासातील घटनांचा अर्थ करताना आजच्या रागद्वेषाचा, भावनांचा, पूर्वग्रहांचा आपल्या मनावर तीव्र परिणाम होत असतो. इंग्रज काय, किंवा हिंदी लोक काय, दोघेही चुका करणे शक्य आहे. अर्थात त्यांच्या या चुका विरुध्द दिशांनी होतील. जे काही कागदोपत्री लेखी पुरावे मिळतात आणि ज्यांच्या साहाय्याने इतिहास लिहिला जातो, ते सारे पुरावे ब्रिटिश साधनांतूच मिळणार आणि साहजिकच त्यांचा दृष्टिकोण त्यात मांडलेला असणार. पराजयामुळे आणि सारीच उलथापालथ, अस्मानी सुलतानी होत असल्यामुळे हिंदी दृष्टिकोणाने लिहिलेले वृत्तान्तच उपलब्ध नाहीत, जे काही असतील ते १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दात नष्ट झाले. त्यातून काही थोडे जे वाचले ते काही घराण्यांच्या, वाड्यांच्या तळघरांत खोल दडवून ठेवण्यात आले आणि परिणामाच्या भीतीमुळे त्यांना कोणी प्रसिध्दी देत नव्हते. हे कागदपत्र हिंदुस्थानभर विखुरलेले होते, कोणाला त्यांचा थांगपत्ता नव्हता आणि किडा-मुंग्यांनी आणि कसरीने हजारोंचा नाश झाला. बर्याच उशीरा का होईना काहींचा शोध लागला आणि कितीतरी ऐतिहासिक गोष्टींवर नवीन प्रकश पडला. ब्रिटिशांनी लिहिलेल्या हिंदी इतिहासातही फेरफार करणे अवश्य झाले आणि ब्रिटिश दृष्टिकोणाहून, संपूर्णपणे विभिन्न अशी नवीन हिंदी दृष्टी जन्माला आली. या दृष्टीच्या पाठीमागे परंपरा व आठवणी यांचाही ढीग पडला होता. फार प्राचीन काळच्या त्या आठवणी नव्हेत, तर जवळच्या काळातील, आजोबा-पणजोबांच्या काळातील. तो काळ ज्यांनी पाहिला होता, त्या वेळच्या घडामोडींना जे पुष्कळदा बळी पडलेले होते अशांच्या या आठवणी होत्या, अशांची ही परंपरा होती. इतिहास म्हणून या परंपरेला तितकी किंमत नसेल, परंतु आजच्या हिंदी मनोभूमीची पार्श्वभूमी काय आहे ते समजून घ्यायला या गोष्टींची मदत होईल, आणि म्हणून त्यांना महत्त्व आहे. हिंदुस्थानात ब्रिटिशांना जो खलपुरुष वाटला तो हिंदी लाकांना बहुधा वीरपुरुष वाटतो आणि ज्यांना ब्रिटिशांनी आनंदाने गौरविले, ते हिंदी लोकांना बहुधा देशद्रोही आणि पंचमदळी वाटतात. अशांच्या वंशजांनाही तो कलंक कायम चिकटला आहे.
अमेरिकन क्रांतीचा इतिहास इंग्रजांनी आणि अमेरिकनांनी वेगवेगळ्या रीतीने लिहिला आहे; आणि आजही जुनी रागद्वेष शमले असताही, दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्री असूनही, एका पक्षाचा वृत्तान्त दुसर्याला आवडत नाही. आपल्या आजच्या काळातही मोठमोठ्या नामांकित इंग्रज मुत्सद्दयांना लेनिन एक राक्षस आणि दरोडेखोर वाटला; परंतु कोट्यवधी लोक याला उध्दारकर्ता आणि आजच्या युगातील सर्वांत मोठा पुरुष असे मानतात. या उदाहरणावरून हिंदी विद्यार्थ्यांना इंग्रजांनी लिहिलेला, या देशाच्या गतेतिहासाची साधेल तिकडून, जमेल त्या प्रकारांनी नालस्ती करून लिहिलेला हिंदुस्थानचा इतिहास वाचताना किती चीड येत असेल याची कल्पना येईल. या इतिहासातून आम्हांला ज्यांची स्मृती प्रात:स्मरणीय वाटते, त्यांची बदनामी असे; आणि ब्रिटिशांच्या राज्याची पदोपदी भरमसाठ स्तुती असे.
गोपाळ कृष्ण गोखले आपल्या नेहमीच्या सौम्य परंतु उपरोधिक रीतीने एकदा लिहितात की, हिंदुस्थानचा ब्रिटिशांशी संबंध आणण्यात त्या विश्वशक्तीचा काही अतर्क्य हेतू असावा. त्या अतर्क्य हेतूमुळे असो वा ऐतिहासिक भवितव्यतेच्या काही प्रणालीनुसार असो अगदी दोन विभिन्न असे मानववंश एकत्र आणले गेले हे खरे. परंतु हे दोन मानवी प्रवाह एकत्र आणायचे होते तर खर्या अर्थाने तरी ते आणायला हवे होते. परंतु तसे तर कधी झाले नाही. ते क्वचितच परस्परांच्याजवळ गेले, आणि जो काही त्यांचा संबंध आला तो अप्रत्यक्ष असाच होता. जे इंग्रजी शिकले अशा काही मूठभर लोकांच्या मनावर इंग्रजी वाङ्मयाचा आणि राजकीय विचारांचा काय परिणाम झाला असेल तेवढाच, परंतु तो राजकीय विचारही जरी इंग्लंडच्या इतिहासाच्या संदर्भात क्रांतिकारक असला तरी हिंदुस्थानातील त्या वेळच्या परिस्थितीत त्याला सत्यता नव्हती. हिंदुस्थानात आलेले ब्रिटिश राजकीय किंवा सामाजिक क्रांतिकारक नव्हते. ते प्रतिगामी होते, इंग्लंडमधील अती अनुदार अशा एका सामाजिक वर्गाचे ते प्रतिनिधी होते, आणि युरोपातील अत्यंत सनातन वृत्तीचा देश म्हणून इंग्लंडची प्रसिध्दी आहेच.