प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 34
कोणाला माहीत नसलेला हिटलर एक दिवस जर्मनीचा सर्वश्रेष्ठ पुढारी म्हणून जगापुढे आला तेव्हापासून वंशश्रेष्ठतेविषयी, जर्मन राष्ट्रच श्रेष्ठ, जर्मन लोकच उच्च, आर्यन लोकच उत्तम ही मीमांसा आपण खूप ऐकली आहे. त्या विचारसरणीचा अनेकांनी धिक्कार केला आहे आणि संयुक्त राष्ट्रांचे पुढारीही आज त्या विचारसरणीचा धिक्कार करीत आहेत. प्राणिशास्त्रज्ञ सांगतात की, अमुक एक मानववंश श्रेष्ठ ही दंतकथा आहे. अमुक एक मानववंश सर्वश्रेष्ठ या म्हणण्यात मुळीच अर्थ नाही. परंतु ब्रिटिश सत्ता येथे सुरू झाल्यापासून वंशश्रेष्ठतेच्या तत्त्वाचा अनुभव आपणांस सारखा येऊ लागला आहे, ब्रिटिश सत्तेच्या पाठीमागे 'आम्ही श्रेष्ठ. आमची इंग्रज जात, गोरी जात श्रेष्ठ' हीच विचारसरणी आरंभापासून आतापर्यंत सदैव उभी आहे. याच विचारसरणीच्या पायावर तेथील राज्यरचना उभारण्यात आली; साम्राज्यवादात वंशश्रेष्ठतेची कल्पना मुळी गृहीतच असते. ही वंशश्रेष्ठतेची कल्पना सांगताना राज्यकर्त्यांनी काही आडपडदा न ठेवता स्पष्ट भाषेत ती जाहीर केली. त्यांनी वापरलेल्या भाषेपेक्षाही त्यांनी त्याच्या उच्चाराच्या जोडीला चालविलेला आचार हे जास्त ठासून सांगत आला आहे, व वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या राष्ट्र या नात्याने हिंदुस्थानचे आणि व्यक्ती या नात्याने हिंदी लोकांचा अपमान, विटंबना, तिरस्कार करण्यात येत आहे. आम्हाला तोंड भरून सांगण्यात येई, ''आम्ही इंग्रज साम्राज्यशाही वंशाचे आहोत; तुमच्यावर राज्य करण्याचा, तुम्हाला दास्यात ठेवण्याचा प्रभूने आम्हाला ताम्रपट दिलेला आहे.'' आम्ही काही तक्रार केली तर 'साम्राज्य भोगणार्या वंशाच्या व्याघ्रवृत्तीचा' आम्हाला लगेच प्रत्यय दाखविला जाईल. मी स्वत: हिंदी आहे आणि हे सारे लिहिताना मला शरम वाटत आहे, कारण हे सारे आठवले की वाईट वाटते. पण सर्वांत अधिक दु:ख याचे होते की, अशा अपमानास्पद स्थितीत इतकी वर्षे आम्ही मुकाट्याने राहिलो. अशी वागणूक सहन करण्यापेक्षा, पुढे काहीही होवो पण वाटेल त्या रीतीने प्रतिकार करणे मी अधिक पसंत केले असते. ते काही असो. हिंदी लोकांनी आणि इंग्रजांनी या गोष्टी ध्यानात घेणे बरे असे मला वाटते. कारण हिंदुस्थानशी इंग्लंडचा जो संबंध आहे त्याच्या पाठीमागील पार्श्वभूमी ही अशी आहे. मनोरचनेचे महत्त्व असते आणि वांशिक स्मृती लवकर मरत नाहीत.
मी एक नमुनेदार उतारा देतो. त्यावरून सर्वसाधारण इंग्रज मनुष्य हिंदुस्थानात कसा वागे, कसा विचार करी याची कल्पना येईल. १८८३ मध्ये इल्बर्ट बिलाच्या वेळेस गोर्यांनी चळवळ केली. त्या वेळेस हिंदुस्थान सरकारचा परराष्ट्रमंत्री सेटन केर म्हणाला : ''हिंदुस्थानातील तमाम इंग्रजांच्या मनात जी एक आवडती, पक्की बसलेली कल्पना आहे, तिला या बिलामुळे धक्का बसणार आहे. हिंदुस्थानातील इंग्रज मनुष्य, मग तो उच्च असो वा नीच असो; मळेवाल्याच्या लहानशा बंगल्यात राहणारा त्याचा मदतनीस असो, किंवा मोठ्या शहरात लखलखाटात राहणारा इंग्रज संपादक असो, एखाद्या प्रांताचा कमिशनर असो किंवा दिल्लीचा व्हाईसरॉय असो; सर्व इंग्रजांच्या मनात एकच भावना सदैव असते की, आम्ही अशा मानववंशात जन्म घेतला आहे की ज्यांनी सदैव जिंकीत जावे व राज्य करीत राहावे अशीच प्रभूची इच्छा आहे.'' *
----------------------
* एडवर्ड थॉम्प्सन आणि जी.टी. गॅरेट यांनी आपल्या ''Rise and Fulfilment of British Rule in India'' या पुस्तकात उद्धृत केलेला उतारा.