प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 31
महाकाव्ये, इतिहास, आख्यायिका, पुराणे, दंतकथा
रामायण आणि महाभारत या दोन प्राचीन महाकाव्यांना त्यांचे आजचे स्वरूप प्राप्त व्हायला बहुधा शेकडो वर्षे लागली असावीत. पुन:पुन्हा त्यांच्यात भर घालण्यात येतच होती. या दोन्ही ग्रंथांमध्ये इंडो-आर्यन लोकांच्या आरंभीच्या काळाचा इतिहास, त्यांचे दिग्विजय ते सर्वत्र पसरत होते, व राज्ये स्थापित होते, तेव्हा त्यांची आपसातील यादवी वाढून झालेल्या युध्दांचा वृत्तांत आहे, परंतु तो त्या घटनांच्या वेळी लिहिलेला नसून नंतरच्या काळात केव्हातरी लिहिला जाऊन एकेजागी संग्रहित केला आहे. या दोन ग्रंथांनी बहुजनसमाजाच्या मनावर हजारो वर्षे जो सतत खोल परिणाम केला आहे, तसा जगाच्या इतिहासात अन्यत्र एखाद्या ग्रंथाने केलेला आढळणार नाही. जरी अतिप्राचीन काळी ते तयार केले गेले असले तरी आजही जनतेच्या चालू जीवनावर त्यांचा प्रभाव पडतो आहे, त्यांची स्फूर्ती जिवंत आहे. मूळ संस्कृतमधून हे ग्रंथ फार थोडे लोक वाचतात. परंतु भाषांतरे, रूपांतरे, कथापुराणे, आख्यायिका, परंपरा या मार्गांनी व अनंत प्रकारे हे ग्रंथ व यांतील हकीकती जनतेच्या जीवनात एकरूप होऊन गेली आहेत. जनतेचे जीवनवस्त्र रामायण-महाभारतांनी ओतप्रोत भरलेले आहे.
सांस्कृतिक विकासाच्या वेगवेगळ्या पायर्यांवरच्या म्हणजे अगदी वरच्या पंडितापासून अगदी खालच्या निरक्षर-अडाणी गावकर्यापर्यंतच्या भिन्न रुचीच्या अनेकांचे समाधान एकाच साधनाने करण्याची हातोटी हिंदी लोकांना साधलेली आहे. त्या पध्दतीचा नमुना म्हणजे हे ग्रंथ आहेत. अनेक प्रकारच्या भेदांमुळे, उच्चनीच वर्णांमुळे विस्कळीत पडलेला विविध समाज एकत्र ठेवून, त्यांची अनेक दिशांना फिरलेली तोंडे एकाच दिशेला वळवून या सर्वांच्याकरता सर्वांची मिळून एकच वीरवृत्तीची परंपरा, नैतिक जीवनाचा एकच आदर्श निर्माण करण्याची या प्राचीन भारतीयांजवळ जी काही किमया होती ती काय होती ते आज आपल्याला समजावयाला या ग्रंथांचा थोडाफार उपयोग होतो. सर्वांचा दृष्टिकोण एकच असावा, सर्वांना तो समोरचा देखावा सारखाच दिसावा अशी सर्वत्र एकवृत्ती निर्माण करण्याचा या ग्रंथांनी मुद्दाम प्रयत्न केला. यामुळे पुढच्या काळात समाजात अनंत भेद पडूनही ही एकवृत्ती जिवंत राहिली. इतकेच नव्हे तर, तिच्यासमोर भेदवृत्तीला अंधारात दबून बसावे लागले.
युरोप-अमेरिकेतील लहान मुलांना अद्भुत-रम्य नवलकथा किंवा शूरांनी केलेल्या धाडसाच्या गोष्टी सांगतात, तशाच या रामायण-महाभारतातल्या कथा माझ्या आईने किंवा घरातल्या दुसर्या वडील बायकांनी मला सांगितल्या हीच माझी सर्वांत जुनी अगदी लहानपणची पहिली आठवण आहे. त्या कथांमधूनच मला अद्भुतरम्य व साहस म्हणजे काय ते कळले. शिवाय दरवर्षी रामलीला वगैरे उघड्यावर सर्व लोकांकरता केले जाणारे समारंभ असत तेथेही मला दरवर्षी घरची मंडळी नेत. तेथे लोकांच्या झुंडी उत्सव पाहायला व मिरवायला जमत. या प्रकारातले नाट्य अगदी ओबडधोबड असे, पण कथा सर्वांच्या माहितीची व प्रसंग उत्सवाचा असल्यामुळे इतक्या बारकाईने कोणी पाहात नसे.
अशा रीतीने हिंदी परंपरा, हिंदी पौराणिक गोष्टी हळूहळू माझ्या मनात शिरल्या आणि माझ्या मनातल्या कल्पनेच्या इतर नानाविध प्राण्यांशी त्या एकरूप झाल्या. त्या गोष्टी खरोखरच तशा प्रत्यक्ष घडल्या म्हणून महत्त्वाच्या असे मला कधी वाटल्याचे आठवत नाही. उलट त्यातील मंत्र, त्यांतील चमत्कार यांच्यावर मी टीकाही करीत असे. परंतु कल्पनासृष्टीतील अरबी भाषेतील सुरस कथा, पंचतंत्रातील गोष्टी यांच्याइतक्या याही मी मानीत असे. पंचतंत्रातील पशुपक्ष्यांच्या गोष्टींपासून आशिया-युरोपातील देशांनी कितीतरी उचलले आहे. *
-------------------------
* पंचतंत्राची जी अनेक भाषांतरे, रूपांतरे आशियातील व युरोपातील भाषांत झाली त्यांचा इतिहास गुंतागुंतीचा, दीर्घकालीन व मोठा चित्तवेधक आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात संस्कृतमधून प्रथम पहलवी भाषेत इराणचा राजा खुश्रू अनुशिखान याच्या आज्ञेवरून ते भाषांतर करण्यात आले होते. त्यानंतर लवकरच इ.स. ५७० मध्ये सीरियन भाषेत एक भाषांतर झाले आणि पुढे अरबी भाषेतही तर्जुमा झाला. अकराव्या शतकात पुन्हा नव्याने सीरियन, अरेबिक आणि पर्शियन भाषांत नवी भाषांतरे झाली. पर्शियन भाषेतील हा नवा तर्जुमा 'कालिया-दमन' नावाने सुविख्यात झाला. या भाषांतराच्या द्वारा पंचतंत्र युरोपात गेले, अकराव्या शतकाच्या शेवटाला सीरियन भाषेतून पंचतंत्राचे ग्रीक भाषेत भाषांतर झाले व थोड्या दिवसांनी हिब्रू भाषेतही अनुवाद करण्यात आला. पंधराव्या व सोळाव्या शतकांत युरोपातील अनेक भाषांत—लॅटीन, इटॅलियन, स्पॅनिश, जर्मन, स्वीडिश, डॅनिश, डच, आईसलँडिश, फ्रेंच, इंग्रजी, हंगेरिय, तुर्की आणि स्लाव्ह जातींच्याही अनेक भाषांत ही भाषांतरे-रूपांतरे अवतरली. अशा रीतीने पंचतंत्रातील या गोष्टी युरोपातील आणि आशियातील वाङ्मयात मिळून गेल्या.