प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 36
महाभारत
रामायण-महाभारतांचा काल ठरविणे दुष्कर आहे. हिंदुस्थानात आर्य आपले बस्तान नीट बसवीत होते. आपली स्थिती बळकट करीत होते. अशा काळातील वृत्तांतांचे हे ग्रंथ आहेत. अनेक ग्रंथकारांनी मिळून हे ग्रंथ केले किंवा पाठीमागून त्यात अनेकांनी भर घातली यात संशय नाही. रामायणात एक प्रकारची एकसूत्रता आहे, परंतु महाभारत म्हणजे सर्वसंग्रह. प्राचीन ज्ञानाचा प्रचंड कोश आहे. बौध्द धर्म काळात या दोन्ही ग्रंथांची नीट व्यवस्थित रचना झालेली दिसते, परंतु त्यानंतर त्यांत वेळोवेळी आणखी भर घातली गेली असली पाहिजे.
फ्रेंच इतिहासकार मिचेलेट हा १८६४ मध्ये विशेषेकरून रामायणासंबंधी लिहितो, ''ज्याने ज्याने खूप संकल्प केले आहेत किंवा अपार कर्तृत्व दाखवले आहे त्याने त्याने या खोल पेल्यातून जीवनाचा आणि यौवनाचा खूप मोठा घोट घ्यावा. पश्चिमेकडे सारेच संकुचित. ग्रीस एवढा लहान, की जेथे जीवन गुदमरतो; जुडिया अस्त्र शुष्क ओसाड की तेथे धाप लावून कोरडे पडते, म्हणून मला उत्तुंग आशियाकडे, धीरगंभीर पूर्वेकडे जरा वळू द्या म्हणजे हिंदी महासागराप्रमाणे विशाल, सूर्याच्या प्रभेने देदीप्यमान, ईश्वरी योजनेच्या सुसंगतीत विसंगतीचा लवलेशही राहू न देणारे असे ते धन्य महाकाव्य दृष्टिपथात येऊन त्याचे दर्शन घडते. त्या महाकाव्यात जिकडे तिकडे गंभीर शांतीचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्यक्ष युध्दातही अशी काही अनंत माधुरी, असा काही अमर्याद बंधुभाव आढळतो की, त्यामुळे प्राणिमात्राला व्यापून उरणारा प्रेम, करुणा, दया यांचा एक अथांग अमर्याद सागर पसरलेला दिसतो.''
महाकाव्य या दृष्टीने रामायणाची योग्यता मोठी आहे, आणि लोकांना ते फार आवडतेही; परंतु जगातील असामान्य ग्रंथात मोडण्याजोगे ते खरोखर महाभारत आहे. हा अतिप्रचंड ग्रंथ आहे. परंपरा, आख्यायिका, प्राचीन हिंदुस्थानातील सामाजिक व राजकीय संस्था या सर्वांचा हा ज्ञानकोश आहे. महाभारताची अधिकृत आवृत्ती तयार करण्यासाठी सर्व हस्तलिखितांची छाननी करून, चिकित्सा करून, पाठभेद नक्की करून प्रत तयार करण्यासाठी गेली दहा-बारा वर्षे कितीतरी हिंदी तज्ज्ञ मंडळी सारखी खपत आहेत. त्या प्रचंड कार्याचे काही भाग प्रसिध्द झाले आहेत, परंतु अद्याप बरेच कार्य अपुरे असून पुढे चालू आहे. आजच्या या भयंकर सर्वव्यापी महायुध्दाच्या काळातही रशियन पौर्वात्य पंडितांनी महाभारताचे रशियन भाषेतील भाषांतर प्रसिध्द केले आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे.
महाभारताच्या काळातच विदेशी जाति-जमाती हिंदुस्थानात येऊ लागल्या असाव्या आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या चालीरीतीही आल्या असाव्या. त्यांतील पुष्कळशा चालीरीती आर्यांच्या चालीरीतीपेक्षा अगदी निराळ्या असत. त्यामुळे परस्परविरोधी चालीरीतींची व कल्पनांची एक अपूर्व खिचडी झालेली दिसते. बहुपतित्वाची चाल आर्यांत नव्हती. परंतु महाभारतातील एका प्रमुख नायिकेचे पाच पती आहेत, व ते पाच भाऊ आहेत. हळूहळू देशातील मूळ रहिवासी आणि हे बाहेरुन आलेले नवविजाती यांचा समावेश आर्यांच्या समाजव्यवस्थेत करून घेण्यात येत होता, आणि वैदिक धर्मातही त्याला अनुकूल असे फेरफार करण्यात येत होते. अर्वाचीन हिंदुधर्माचे जे सर्वसंग्राहक असे स्वरूप आज आहे ते त्या वेळेसच सुरू झाले. सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतील. सत्य ही कोणा एका वर्गाची, एका संप्रदायाची मिरास नाही, ही मूळ अनाग्रही दृष्टी असल्यामुळे सर्वांचा समावेश करून घेणे शक्य झाले. सर्व प्रकारच्या परस्परविरोधी आणि भिन्न स्वरूपाच्या विचारप्रणालींना आणि धार्मिक श्रध्देला या धर्मात वाव होता, सर्वांविषयी सहिष्णुता होती.
मूळचा परंपरागत कुलसंस्थापक जो भरत, त्याच्या नावावरून ज्याला भारतवर्ष अशी संज्ञा मिळाली, अशा या विशाल देशाची मूळची एकता सर्वांच्या मनावर ठसविण्याचा महाभारताचा हेतुमय प्रयत्न आहे. या देशाचे पूर्वी आर्यावर्त-आर्यांचा देश-असे नाव होते, परंतु मध्यहिंदुस्थानातील विंध्यपर्वताच्या उत्तरेकडच्या भागालाच ते नाव लावण्यात येत असे. त्या वेळेस विंध्याच्या दक्षिणेकडे आर्य पसरले नसावेत. रामायण म्हणजे आर्यांचा दक्षिण हिंदुस्थानात जो प्रसार झाला त्याचा इतिहास आहे. महाभारतात ज्या आपसातील युध्दाचे वर्णन आहे, ते युध्द ख्रिस्तपूर्व चौदाव्या शतकात झाले असावे अशी समजूत आहे. ते युध्द हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेसाठी बहुधा उत्तर हिंदुस्थानच्यासाठी होते व सबंध हिंदुस्थान मिळून एकच देश आहे या कल्पनेचा आरंभ झाल्याची ती खूण आहे. आजचे अफगाणिस्थान म्हणजे त्या वेळचा गांधार-गांधार शब्दाचाच अपभ्रंश कंदाहार-हा भारताचाच त्या वेळेस भाग धरला जाई. राजा धृतराष्ट्राची पत्नी राणी गांधारी ही गांधार-कन्या होती. आजच्या दिल्लीच्याजवळ प्राचीन अवशेष आहेत तेथे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही शहरे होती, तेथेच भारताची पुढे राजधानी झाली.
भगिनी निवेदिता (मार्गारेट ई. नोबल) महाभारताविषयी लिहिताना सांगतात, ''महाभारतात परकीय वाचकाच्या डोळ्यांत दोन गोष्टी एकदम भरतात. पहिली गोष्ट म्हणजे येथील विविधतेतील एकता; दुसरी गोष्ट म्हणजे येथील श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर अशी एक कल्पना प्रयत्नाने सतत ठेवावी की, त्यामुळे त्यातील पराक्रमशाली परंपरा पाहून हा सर्व देश एका शासनाखाली नांदणारा एक देश आहे हे तत्त्व श्रोत्यांच्या मनाला पटून सर्वांनी एकत्र नांदण्याच्या कल्पनेला मूर्तस्वरूप यावे. *
------------------
* सर एस. राधाकृष्णन् यांच्या 'हिंदी तत्त्वज्ञान' या ग्रंथातून घेतलेला उतारा. इतरही उतारे या व इतर प्रकरणांतून घेतलेले आहेत.
अशी समजूत आहे. परंतु महाभारतात सामाजिक कल्याणावर भर दिलेला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. महाभारत सांगते, ''जे समाजहितास पोषक नसेल, आणि जे करायला तुला लाज वाटत असेल ते कधीही करू नकोस.''