प्रकरण ३ : शोध 13
भारताची विविधता आणि एकता
भारतातील विविधता कल्पनातीत आहे. ती एकदम दिसते. ती शोधायला नको. कोणालाही ती एकदम समोर सर्वत्र दिसेल. बाह्य आकारात फरक आहेत असे मानसिक सवयी व वैशिष्ट्यांतही फरक आहेत. वरवर पाहिले तर सरहद्दीवरचा पठाण आणि दक्षिणेकडील तमिळी यांच्यात सामान्य असे काहीही आढळणार नाही. दोघांच्या रक्तात काही समान अंश कदाचित असला तरी दोघांचे भिन्न मानववंश; त्यांचा तोंडावळा निराळा, त्यांचा बांधा निराळा; खाणे-पिणे, पेहराव अर्थात भाषा निराळी. वायव्येकडील सरहद्द प्रांतात मध्यआशियाचे वारे लागले आहे व काश्मिरातल्याप्रमाणे सरहद्द प्रांतातीलही पुष्कळशा चालीरीती हिमालयाच्या पलीकडील देशांची आठवण करून देतात. पठाणांतील लोकनृत्ये व रशियन कोसॅक लोकनृत्ये यांत विलक्षण साम्य आहे. परंतु हे सारे भेद असूनही पठाणावर भारताची पडलेली छाप अगदी चुकूनसुध्दा चुकणार नाही इतकी स्पष्ट आहे व तितकीच ती तामिळ लोकांतही सहज आढळते. यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. कारण सीमाप्रांत आणि स्वत: अफगाणिस्थान एके काळी हजारो वर्षे भारतातच मोडत होते. मुसलमानी धर्माचा उदय होण्यापूर्वी अफगाणिस्थानात व मध्य आशियातही तुर्की व इतर जातिजमाती राहात असत. त्या सार्यांचा त्या वेळेस बुध्दधर्म होता. आणि बुध्दधर्माच्या पूर्वी रामायण-महाभारताच्या काळी हे सारे हिंदूच होते. प्राचीन भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र या सीमाप्रांतात बहरले होते. अद्यापही या प्रदेशात जिकडे तिकडे प्राचीन अवशेष दिसतील; मठ, विहार दिसतील; याच प्रदेशात विश्वविश्यात तक्षशिला विद्यापीठ होते. दोन हजार वर्षांपूर्वी त्याची कीर्ती शिगेला पोचून सर्व हिंदुस्थानातून व आशियाच्या निरनिराळ्या भागांतून विद्यार्थी तेथे येत. धर्म बदलल्यामुळे फरक होतात ही गोष्ट खरी; परंतु त्या प्रदेशातील लोकांची घडत आलेली, वाढत आलेली विशिष्ट मनोवृत्ती ही संपूर्णपणे धार्मिक फरकामुळे बदलू शकत नाही.
पठाण व तामिळ मनुष्य ही अगदी दोने टोके आपण घेतली. या दोहोंच्या दरम्यान सारे येतात. सर्वांचे विशेष स्वभावधर्म आहेत; सर्वांची विशिष्ट स्वरूपे आहेत. परंतु सगळे शेवटी हिंदी म्हणून, भारतीय म्हणून जगापासून उमटून पडतात. बंगाली, महाराष्ट्रीय, गुजराथी, तामिळी, तेलगू, ओरिया, असामी, कानडी, मल्याळी, सिंधी, पंजाबी, पठाणी, काश्मिरी आणि मध्यहिंदुस्थानातील हिंदुस्थानी भाषा बोलणारे, या सर्व लोकांनी आपापले विशिष्ट स्वभावधर्म शेकडो वर्षे झाली तरी ठेवले आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते. प्राचीन वर्णनातून, लेखातून, वाङ्मयातून त्यांच्या ज्या गुणदोषांचे वर्णन आहे ते गुणदोष आजही त्यांच्यात दिसून येतात. आपण असे असूनही शतकानुशतके ते सारे हिंदी म्हणून भारतीय म्हणून राहिले आहेत, जगले आहेत. सर्वांचा तोच राष्ट्रीय वारसा; सर्वांचे तेच नीतिशास्त्र; तोच मनोधर्म. हा जो भारतीय वारसा त्यात काही एक शक्तिशाली प्राणमय तत्त्व येते; त्याचा आविष्कार लोकांच्या राहणीत व संसाराकडे आणि संसारातल्या अडीअडचणींकडे पाहण्याच्या तत्त्वज्ञानी वृत्तीत दिसून येतो. प्राचीन हिंदुस्थान चीनप्रमाणे एक स्वतंत्र जगच होते, व त्याची एक जी विशिष्ट संस्कृती, एक जीवनपध्दती होती ती राष्ट्राच्या सर्व संसाराला आपले रूप देई. परकीय वळणाचे लोंढे पुरासारखे अनेकदा आले. त्यांचा भारतीय संस्कृतीवर पुष्कळदा परिणाम झाला, पण शेवटी ते सर्व या संस्कृतीने पचवून आत्मसात केले. संस्कृतींचे संघर्ष सुरू होताच त्यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न ताबडतोब केला जाई. संस्कृतीच्या उष:कालापासून भारतीय बुध्दी अनेकांतून एकदा निर्माण करण्याचे काही एक अस्पष्ट स्वप्न पाहण्यात गुंग राहिलेली आहे. ती एकदा म्हणजे नुसते बाह्यरूप एक साच्याचे असावे किंवा श्रध्दा ठरीव सिध्दान्तावरच ठेवावी अशा हुकमी आग्रहाने सक्तीने लादलेली एकता करावी अशी योजना नव्हती. यापेक्षा फार खोलवर पोचणारी, अधिक मूलग्राही एकता या संस्कृतीत योजलेली होती. आणि या संस्कृतीच्या परिसरात भिन्न रूढी, विविध आचार, व अनेक प्रकारची भक्ती यांना वाव होता. इतकेच नव्हे, तर अशा विविध प्रकारांना मान्यता व उत्तेजनही दिले जाई.