प्रकरण ५ : युगायुगांतून 54
भारत आणि चीन
बौध्दधर्मामुळे हिंदुस्थान आणि चीन एकमेकांच्या जवळ आले; आणि मग संबंध पुष्कळ वाढला. अशोकाच्या आधीही असे संबंध होते की काय ते माहीत नाही, काही दर्यावर्दी व्यापार असेल असे वाटते, कारण चीनमधून रेशीम हिंदुस्थानात येत असे. परंतु जमिनीच्या मार्गानेही दळणवळण असावे असे वाटते; फार प्राचीन काळीही लोकांची इकडून तिकडे, तिकडून इकडे ये-जा सुरू असावी, कारण हिंदुस्थानच्या पूर्व सीमांवरील प्रदेशात मंगोलियन तोंडवळा बराच आढळतो. नेपाळात मंगोलियन चेहरेपट्टी विशेष आढळते. आसाम (प्राचीन कामरूप) आणि बंगाल या प्रांतांतही मंगोलियन तोंडवळा काही कमी नाही. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या अशोकाच्या संदेशवाहकांनीच पहिली वाट पाडली असे म्हटले पाहिजे, आणि बौध्दधर्माचा चिनात प्रसार होताच ही यात्रा मग सारखी सुरूच राहून जवळजवळ एक हजार वर्षे चिनी आणि भारतीय पंडित व यात्रेकरू परस्परांच्या देशांत जात-येत होते. गोबीचे मैदान, मध्य आशियातील मैदाने आणि डोंगरपठारे तसेच हिमालय—हे सारे ओलांडून जावे यावे म्हणून हा प्रवास मोठा कष्टाचा, धोक्याचा व फार लांबचा पडे. कितीतरी हिंदी व चिनी यात्रेकरू वाटेतच मरून जात. एकदा तर शेकडा नव्वद यात्रेकरू वाटेतच मरण पावले असा उल्लेख आहे. पुष्कळजण शेवटी पोचल्यावर परत न जाता तेथेच वस्ती करून, तेथलेच नागरिक होऊन जात. चीनमध्ये जायला आणखी एक जवळचा परंतु तितकाच धोक्याचा मार्ग होता. हा मार्ग समुद्रावरून इंडोचायना, जावा, सुमात्र, मलाया आणि निकोबार बेटे यावरून होता. या मार्गाचाही पुष्कळ उपयोग केला जाई. एखादेवेळेस कोणी जमिनीवरून येत आणि समुद्रावरून जात. बौध्दधर्म आणि भारतीय संस्कृती सार्या मध्य आशियाभर तसेच इंडोनेशियाच्या भागातही पसरली होती. या सार्या विशाल प्रदेशात ठायीठायी विहार होते, अभ्यासकेंद्रे होती. त्यामुळे हिंदी किंवा चिनी यात्रेकरूंना वाटेत विसाव्याची जागा मिळे, समुद्रमार्गे वा भूमिमार्गे कसेही जाणे असो, ठिकठिकाणच्या मठांतून, विद्यापीठांतून आश्रय मिळे, यात्रेकरूंचे तेथे स्वागत होई. कधी कधी चिनी पंडित जावा-यवद्वीपाकडील हिंदी वसाहतीत काही महिने मुक्कामही करीत व हिंदुस्थानात येण्यापूर्वी तेथे ते संस्कृत शिकून घेत.
चीनमध्ये पहिल्याने जाणारा भारतीय पंडित कश्यप मतंग हा होय. इ.स. ६७ मध्ये तो चीनला पोचला. त्या वेळेस मिंग टि हा सम्राट होता व बहुधा त्याच्या आमंत्रणावरूनच कश्यप मतंग गेला असावा. लो नदीच्या तीरावरील लोयांग या नगरीत त्याने वस्ती केली. त्याच्याबरोबर धर्मरक्षही होता, आणि पुढच्या काळात बुध्दभद्र, जिनभद्र, कुमारजीव, परमार्थ, जिनगुप्त, बोधिधर्म इत्यादी नामांकित पंडित चीनला गेले. या प्रत्येकाच्या बरोबर भिक्षूंचा किंवा शिष्यांचा मेळावा असे. असे म्हणतात की एकेकाळी इसवी सनाच्या सहाव्या शतकात एका लो-यांग प्रांतातच तीन हजार भारतीय बौध्दभिक्षू आणि दहा हजार भारतीय कुटुंबे नांदत होती.
हे जे हिंदी पंडित चीनमध्ये जात ते बरोबर संस्कृत ग्रंथ घेऊन जाऊन त्या ग्रंथांचे चिनीत भाषांतर करीतच व शिवाय स्वत: चिनी भाषेत स्वतंत्र ग्रंथही ते लिहीत. चिनी सारस्वतात त्यांनी बरीच भर घातली आहे, चिनी भाषेत त्यांनी काव्यरचनाही केली. इ.स. ४०१ मध्ये कुमारजीव हा चीनमध्ये गेला. त्याने विपुल लिहिले आहे. त्याचे ४७ ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्याची चिनी भाषाशैली मोठी सुंदर होती असे म्हणतात. नागार्जुनाच्या चरित्राचा त्याने चिनी अनुवाद केला आहे. जिनगुप्त हा सहाव्या शताकाच्या उत्तरार्धात चीनमध्ये गेला. त्याने ३७ संस्कृत ग्रंथांचे चिनीत भाषांतर केले. त्याच्या विद्वत्तेची ख्याती दूरवर पसरली ती इतकी की टँग घराण्यातील एक सम्राट त्याचा शिष्य झाला.