प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 2
जर्मनी-'वायमार'च्या प्रजासत्ताक राज्यघटनेप्रमाणे राज्यव्यवस्था चाललेला जर्मनी हा राष्ट्रसंघाचा पूर्ण अधिकार असलेला सभासद झाला होता व प्रसिध्द लोकार्नोचा तह म्हणजे युरोपात सतत चिरकाल टिकणार्या शांततेचा अग्रदूत आहे, ब्रिटरच्या मुत्सद्दीपणाचे ते विजयचिन्ह आहे अशा थाटाने त्या तहाचा गाजावाजा झाला होता. ह्या सार्या घटनांचा दुसरा एक असा अर्थ लावण्यात येत होता की, ह्या प्रकारामुळे सोव्हिएट रशिया मुद्दाम अलग ठेवला जातो आहे, त्या देशाविरुध्द युरोपातील इतर राष्ट्रांची संयुक्त आघडी उभारली जाते आहे. ह्या सुमारास रशियाने आपल्या देशातील राज्यक्रांतीचा दहावा वाढदिवस नुकताच साजरा केला होता व तुर्कस्थान, इराण, अफगाणिस्तान, मंगोलिया वगैरे अनेक पौर्वात्य देशांशी मैत्रीचे संबंध जोडले होते.
या सुमारास चीनमधील राज्यक्रांतीची पावले लांब लांब पडत पडत तेथे राज्यक्रांतीची खूपच प्रगती होऊन तेथील राष्ट्रीय सरकारच्या सैन्याने निम्मा चीन व्यापला होता व तसे करता करता त्यांना समुद्रकिनार्यावर व अंतर्गत देशात परदेशीय, विशेषत: ब्रिटिश, हितसंबंधी लोकांच्या ताब्यात असलेल्या अनेक ठाण्यांत लढाईही करावी लागली होती. त्यानंतर ह्या विजयी क्रांतिकारक पक्षात आपसात कलह माजून कुओमिन्टांग पक्षात दोन परस्परविरोधी तट पडले होते.
जागतिक परिस्थिती असहाय्यपणे जाता जाता अखेर महायुध्दाची पाळी येणार व त्या महायुध्दात इंग्लंड व फ्रान्स यांच्या नेतृत्वाखाली युरोपमधील राष्ट्रांचा एक पक्ष व सोव्हिएट रशिया व त्याची पौर्वात्य मित्र राष्ट्रे यांचा दुसरा पक्ष होणार असा रंग दिसू लागला. अमेरिकन संयुक्त संस्थानांचे राष्ट्र या दोन्ही पक्षांपासून अलग राहिले होते. साम्यवादाचा अमेरिकेला फार तिटकारा असल्यामुळे त्यांना रशियाचे वावडे होते, ब्रिटिशांचे धोरण व ब्रिटिशांची आर्थिक व औद्योगिक बाबतीत अमेरिकेशी असलेली स्पर्धा यामुळे ब्रिटन असलेल्या पक्षाला मिळणे त्यांना शक्य नव्हते. ह्या दोन्ही कारणांव्यतिरिक्त तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अमेरिकेतील लोकमत आपण कोणाच्या भानगडीत पडू नये व कोणाला आपल्या राष्ट्राच्या कामात हात घालू देऊ नये असे होते व युरोपमध्ये चाललेल्या झोंबाझोंबीत ओढले जाण्याची त्यांना भीती वाटे.
असा सारा देखावा दिसत होता त्यात हिंदुस्थानातील लोकांच्या मताचा कल अपरिहार्यपणे सोव्हिएट रशिया व पौर्वात्य राष्ट्रे यांच्याकडे होता. समाजसत्तावादाला अनुकूल लोकांची संख्या वाढत होती, हे खरे, पण एकंदरीत लोकमत रशिया व पौर्वात्य राष्ट्रांना अनुकूल असले तरी साम्यवाद सरसकट लोकांना पसंत पडत होता असा त्याचा अर्थ नव्हे. चीनमधील क्रांतिकारक पक्षाचा विजय म्हणजे हिंदुस्थानच्या आगामी स्वातंत्र्याला व आशियावर युरोपने केलेल्या आक्रमणाचा नि:पात करण्याच्या कार्याला झालेला एक शुभ शकुन अशा उत्साहाने हिंदी लोकांनी त्या विजयाचे स्वागत केले. हिंदुस्थानाच्या पूर्वेकडील डच ईस्ट इंडीज (जावा, सुमात्रा वगैरे बेटे) व इंडोचायना, तसेच हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील आशियातील राष्ट्रे व इजिप्त या देशांमध्ये चाललेल्या राष्ट्रीय चळवळीबद्दल आमच्या हिंदुस्थानात जिज्ञासा अधिकाधिक वाढू लागली. सिंगापूरचे साधे रूप बदलून त्याला एका प्रचंड सिंधुदुर्गाचे रूप देणे, व सीलोनमधील त्रिंकोमाली या बंदराचा विस्तार वाढवणे या घटनांचा अर्थ असा दिसे की, आपली साम्राज्यशाहीची घडी नीटनेटकी बसवून पक्की करण्याकरिता व सोव्हिएट रशिया आणि पौर्वात्य देशांत वाढत असलेली राष्ट्रीय वृत्ती यांना चिरडून टाकण्याकरिता ब्रिटन युध्दाची तयारी करीत आहे व त्या आगामी युध्दात ब्रिटनला जी काही ठाण्यांची मजबुती करावयाची आहे त्यांपैकी ही दोन ठाणी होत.