प्रकरण ६ : नवीन समस्या 43
औरंगजेब घड्याळाचे काटे मागे करतो
हिंदुराष्ट्राची वाढ. शिवाजी
शहाजहान हा फ्रान्सच्या वैभवशाली चौदाव्या लुई राजाचा समकालीन होता; युरोपात त्रिंशतवार्षिक युध्द मध्ययुरोपला उजाड करीत होते, आणि फ्रान्समध्ये व्हर्सायचा नवीन राजप्रासाद उठत होता, त्याच वेळेस आग्र्याला ताजमहाल आणि मोती मशीद, दिल्लीची जामे मशीद आणि दिवाण-इ-खास व दिवाण-इ-आम हे बादशाही प्रासाद उठत होते. या रमणीय इमारती, त्यांचे ते गंधर्वनगरीचे सौंदर्य म्हणजे मोगल वैभवाचा कळस होता. व्हर्सायपेक्षा दिल्लीचा दरबार व त्यातले मयूरासन अधिक भव्य व वैभवशाली होती. परंतु व्हर्सायप्रमाणे दारिद्र्यात खितपत पडलेल्या, राबवून नि:सत्त्व केलेल्या प्रजेच्या पाठीवर हे वैभव उभारलेले होते. तिकडे मयूरासने होत होती, राजवाडे उठत होते. परंतु गुजराथेत व दक्षिणेत दुष्काळाने कहर केला होता.
दरम्यान इंग्रजांची आरमारी सत्ता वाढत होती, पसरत होती. अकबराला युरोपियनांपैकी फक्त पोर्तुगीज माहीत होते. जहांगीरच्या कारकीर्दीत हिंदी महासागरात ब्रिटिश आरमाराने पोर्तुगीजांचा पराभव केला, आणि १६१५ मध्ये सर थॉमस रो हा इंग्रजांचा-पहिल्या जेम्स राजाचा—वकील म्हणून जहांगीरच्या दरबारात उभा राहिला. वखारी घालण्याची परवानगी मिळविण्यात त्याला यश आले. सुरतेची वखार सुरू झाली, आणि १९३९ मध्ये मद्रासलाही वखार घालण्यात आली. जवळजवळ शंभर वर्षे ब्रिटिशांना कोणी महत्त्व दिले नाही. सारे जलमार्ग ब्रिटिशांच्या हाती होते, त्यांनी पोर्तुगीजांना जवळजवळ हुसकून दिले होते या गोष्टीचे महत्त्व मोगल सम्राटांना किंवा सल्लागारांना वाटले नाही. औरंगजेबच्या कारकीर्दीत मोगल साम्राज्याचा दुबळेपणा जेव्हा दिसून येऊ लागला तेव्हा युध्द करून आपल्या ताब्यातील प्रदेश वाढविण्याचा ब्रिटिशांनी नीट संघटित प्रयत्न केला. ही गोष्ट सन १६८५ मध्ये झाली. औरंगजेबाची सत्ता क्षीण होत चालली होती व त्याला शत्रूंनी घेरले होते तरी त्याने ब्रिटिशांचा पराभव करून यश मिळविले. यापूर्वीच फ्रेंचांनीही हिंदुस्थानात चांगले पाय रोवले होते. युरोपातील उसळून उतू जाणारा उत्साह हिंदुस्थानात आणि पूर्वेकडे येत होता, पसरत होता आणि याच वेळेस हिंदुस्थानची राजकीय व आर्थिक स्थिती नेमकी र्हासाच्या मार्गाला लागली होती.
फ्रान्समध्ये चौदाव्या लुईची दीर्घ कारकीर्द अद्याप चालू होती आणि भविष्यकालीन क्रांतीची बीजे पेरली जात होती. इंग्लंडमध्ये पुढे येणार्या मध्यम वर्गातील लोकांनी राजाचा शिरच्छेद केला होता. क्रॉमवेलचे थोडा काळ टिकणारे लोकसत्ताक राज्य भरभराटले व लुप्त झाले. दुसरा चार्ल्स पुन्हा आला व गेला, आणि दुसरा जेम्स पळून गेला. पार्लमेंटमध्ये आता नवीन व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी होते व राज्यसत्ता नियंत्रित करून पार्लमेंटने स्वत:चे प्रभुत्व प्रस्थापिले होते.