प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 49
आपण स्वतंत्र राष्ट्र असतो तर आज समान भविष्यासाठी आपण सारे एकजुटीने काम करीत राहिलो असतो आणि समान अभिमानाने समान भूतकालाकडे पाहिले असते. मोगल काळातील सम्राट आणि त्यांचे सहकारी खरोखरच जरी ते नवागत होते तरीही हिंदी भूतकाळाशी एकरूप होऊन त्याचे वारसदार होऊ इच्छित होते. परंतु भवितव्यता निराळीच उभी राहिली, इतिहासाची घटना वेगळीच बनली; मानवी दुबळेपणा आणि धोरण यांचाही त्यात भाग नव्हता असे नाही. जी वास्तविक नैसर्गिक अशी राष्ट्रीय वाढ व्हायची तिला निराळेच वळण लागले. पश्चिमेच्या आघातामुळे, नवीन आर्थिक आणि तांत्रिक बदलामुळे जो एक नवीन मध्यम वर्ग जन्माला येत होता, ते हिंदू असोत वा मुसलमान असोत, त्यांना समान अशी एक पार्श्वभूमी असेल अशी आशा करणे अस्थानी नव्हते. काही अंशी अशी थोडीफार समान भूमी होती; परंतु बहुजनसमाजात तसेच सरंजामशाही, निमसरंजामशाही वर्गात जे भेद नव्हते आणि असलेच तर किरकोळ स्वरूपाचे होते, असे भेद आता उत्पन्न झाले. बहुजनसमाजातील हिंदू-मुसलमानांत फारसा फरक नव्हता आणि जुन्या अमीरउमरावांनी, सरदारदरकदारांनी समान रीतिभाती, समान बर्ताव निर्माण केला होता; समान शिष्टाचार निर्मिले होते. सर्वांची समान संस्कृती होती. समान चालीरीती, समान उत्वस-समारंभ होते. परंतु हे नवसुशिक्षित मध्यम वर्गातील लोक निराळे वागू लागले. नवसुशिक्षित हिंदु-मुसलमानांची निराळी मनोरचना होऊ लागली. आणि पुढे त्याला आणखीच फाटे फुटत गेले.
आरंभी मुसलसमानांत हा नवीन मध्यम वर्ग नव्हताच. पाश्चिमात्य शिक्षण त्यांनी टाळले होते. उद्योगधंदे, व्यापार यापासून ते दूर राहिले होते; सरंजामशाही विचारसरणीला ते चिकटून होते. त्यामुळे हिंदूंना पुढे जायला संधी मिळाली, आणि या संधीचा त्यांनी उपयोग करून घेतला. ब्रिटिशांचे धोरणही पंजाबखेरीज इतरत्र हिंदूंना अनुकूल आणि मुसलमानांना प्रतिकूल होते. पंजाबात मुसलमानांनी इतर ठिकाणाहून अधिक पाश्चिमात्य शिक्षणात भाग घेतला. परंतु ब्रिटिशांनी पंजाबचा कबजा घेण्यापूर्वीच अन्यत्र हिंदूंना आधीच पुढे जायला सापडले, आणि पंजाबातही हिंदू-मुसलमान दोघांनाही समान संधी होती, तरी हिंदूंना आर्थिक दृष्ट्या अधिक अनुकूलता होती. हिंदु-मुसलमान वरिष्ठ वर्ग आणि हिंदु-मुस्लिम बहुजनसमाज दोघांतही विदेशी-द्वेषाची भावना होती. १८५७ चे स्वातंत्र्ययुध्द दोघांनी पुकारले होते, परंतु या ज्वाला दडपून टाकताना मुसलमानांना अधिक भोगावे लागले असे त्यांना वाटे आणि काही अंशी ते खरे होते. दिल्लीच्या साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाच्या सार्या कल्पना आणि स्वप्ने आता कायमची नष्ट झाली. ब्रिटिश येण्यापूर्वीच ते साम्राज्य वास्तविक खतम झालेले होते. मराठ्यांनी त्या साम्राज्याचा भंग केला होता आणि ते दिल्लीचे स्वामी होते. रणजितसिंह पंजाबात राज्य करीत होता. ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाची मोगली सत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी जरुरी उरलेली नव्हती. दक्षिणेतीलही मोगली सत्ता नष्ट झाली होती. तथापि दिल्लीच्या राजवाड्यात अद्याप तो छायारूप सम्राट अस्तित्वात होता. तो जरी आरंभी मराठ्यांचा आणि नंतर ब्रिटिशांचा मिंधा आणि बंदा होता तरी विख्यात घराण्याचे प्रतीक म्हणून अजूनही त्याच्याकडे पाहण्यात येत होते. साहजिकच स्वातंत्र्ययुध्दाच्या वेळेस या प्रतीकाचा फायदा घेण्याचा त्या युध्दातील लोकांनी प्रयत्न केला; बादशहा तयार नव्हता, तो दुबळा होता, तरीही त्याच नावाने द्वाही फिरविली गेली. स्वातंत्र्ययुध्दाचा मोड म्हणजे त्या प्रतीकाचाही शेवट होता.